कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजू नका; सरकारने संयम ठेवलाय: एकनाथ शिंदे
राज्यातील मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड मत मांडले. "कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे तशीच जनतेचीही आहे. त्यामुळे सगळ्यांनीच संयम पाळायला हवा. कुणीही कायदा हातात घेऊ नये. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी प्रामाणिक भावना मनात ठेवून लढ्यात उतरले होते तेव्हा आम्ही त्यांच्याशी सामंजस्याने चर्चा केली. पण ते वारंवार मागण्या बदलताना दिसतात. मराठा आंदोलनाचे ५६ मोर्चे आधीही झाले पण कुठेच हिंसाचार झाला नव्हता. यावेळी आंदोलकांनी जाळपोळ केली, आताही आक्रमक होताना दिसत आहेत. कायद्यापेक्षा कुणीही स्वत:ला मोठं समजू नये. सरकारने संयम ठेवला आहे, संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आंदोलनकर्त्यांना रोखठोक मत मांडत इशारा दिला.
"राजकीय पदावरील लोकांबाबत अर्वाच्य भाषेत बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. देवेंद्र फडणवीसांबाबत अचानक त्यांनी आरोप करणे हे, त्यांना कुणी करायला सांगितलंय का? प्रत्येकाने आपापल्या मर्यादेत राहायला हवे. तुमच्या आक्रमकतेचा समाजाला त्रास होता कामा नये.कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. जर काही लोकांना वाटत असेल की त्यांच्या गोष्टी सरकारला कळत नाहीत तर तसे मुळीच नाही. गृहविभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे लोक जबाबदार असतील, त्यांना सरकार पाठिशी घालणार नाही", असेही शिंदे यांनी अधोरेखित केले.
"कुठल्याही समाजाला त्रास होऊ नये, अशी आंदोलने करायला हवीत. सरकार कुठे कमी पडतंय ते दाखवा, त्यात सुधारणा करू. पण काही लोकं अराजकता पसरवण्याचेच काम करताना दिसतात. मराठा समाज संयमी आहे. पण त्यांच्या आंदोलनाला कुणी गालबोट लावण्याचं काम करत असेल, तर त्यांच्यापासून मराठा तरुणांनी सावध राहायला हवं. मी नेहमी संयमी भूमिका घेतली. त्यांना दोन वेळा भेटायला गेलो. पण आता त्यांची भाषा राजकीय वाटू लागली आहे. हे सगळं त्यांच्याकडून कुणीतरी बोलून घेतं असल्याचा मला संशय येऊ लागलाय. सरकार म्हणून आम्ही या सगळ्याबद्दल माहिती घेत आहोत", असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.