Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चक्क! बोकडाने घेतला नऊ जणांचा 'बळी'; गृहविभागाचा जोरदार दणका

चक्क! बोकडाने घेतला नऊ जणांचा 'बळी'; गृहविभागाचा जोरदार दणका


पोलिस ठाण्याच्या हद्दीतच बोकडाचा बळी देण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात बोकडाचा बळी दिल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. आता या प्रकरणात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, इतर आठ पोलिस कर्मचाऱ्यांची मुख्यालयी बदली करत जोरदार दणका देण्यात आला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे, तेच अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा भयंकर प्रकार दोन दिवसांपूर्वी उदगीरमध्ये उघडकीस आला. उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे आणि अपघातांचे प्रमाण वर्षभरात वाढल्यामुळे त्यावर उपाय म्हणून चक्क पोलिस स्टेशनच्या गेटवरच बोकड कापण्यात आले होते. या बोकड बळी प्रकाराचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि पोलिसांची नाचक्की झाली.

विशेष म्हणजे या बळी दिलेल्या बोकडाची बिर्याणी बनवून पोलिस स्टेशनमधील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यावर एका फार्महाऊसवर जाऊन सायंकाळी तावही मारला होता. या संतापजनक प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आपल्या पोलिस ठाण्यात कसा जातीयवाद केला जातो, गटबाजी चालते असा खुलासा करत आपलीच इभ्रत चव्हाट्यावर आणली.

अखेर या प्रकाराची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश देत दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश काल दिले होते. त्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर 24 तासातच एका पोलिस अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले. तर या बोकड प्रकरणात दोषी आढळलेल्या आठ पोलिस कर्मचाऱ्यांची मुख्यालयी बदली करण्यात आली आहे.

एकाचवेळी एवढ्या जणांवर कारवाई झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. बोकडाचा बळी दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संबंधित अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. गृहमंत्री फडणवीस यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, त्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत यांना घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार उदगीर ग्रामीणचे पोलिस  उपनिरीक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे. तर आठ पोलिस अमलदारांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. याशिवाय पोलिस निरीक्षकांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहे.

म्हणे नवीन चारचाकी घेतली म्हणून पार्टी..

दरम्यान, पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत यांनी या बोकड बळी प्रकरणात आज एक व्हिडिओ प्रसारीत करत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नवी चारचाकी खरेदी केल्यामुळे काही सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर बोकड कापल्याचे सांगितले. सगळ्या सहकाऱ्यांनी नंतरसोबत जेवणही केले. त्यामुळे माध्यमांमध्ये आलेले वृत्त किंवा प्रसारित झालेले फोटो आणि बोकडाचा बळी दिल्याचा दावा चुकीचा आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकर वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.