Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो: अफलातून कहाणी!वाचा

चोरच जेव्हा न्यायाधीश बनतो: अफलातून कहाणी!वाचा 


तो एक अट्टल चोर होता. देशभरात त्याच्या नावावर चोरीचे शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. आठ राज्यांतील पोलिस या चोराच्या मागावर होते; पण तो काही त्यांच्या हाती लागत नव्हता. एक दिवस हा चोर आपल्या करामतीने चक्क जिल्हा न्यायाधीशांच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि जवळपास दोन महिने न्यायाधीश बनून धमाल उडवून दिली. अशा या अट्टल आणि तितक्याच करामती चोराच्या एकापेक्षा एक धमाल करामतींची अफलातून कहाणी…

धनीराम मित्तल…भारतातील सगळ्या चोरांचा बाप शोभेल, असा हा इसम…याला म्हणायचे तरी काय म्हणायचे…माणूस म्हणावा, तर माणसाचा एकही गुण त्याच्यात नव्हता…त्याला चोर म्हणावा, तर हजारो चोर्‍या करूनही त्याला एकदाही शिक्षा झाली नव्हती…कारण तो स्वत:च कायद्याचा पदवीधर म्हणजे वकील होता…स्वत:चा खटला स्वत:च लढायचा आणि निर्दोष सुटायचा! एकदा तर या बहाद्दराने कमालच केली, बोगस कागदपत्रांच्या आधारे हा स्वत:च न्यायाधीाश बनला आणि स्वत:सह अडीच हजारभर गुन्हेगारांना त्याने मुक्त केले. अशा या धनीरामची कहाणीही तितकीच उत्कंठावर्धक आहे.

बोगस स्टेशन मास्तर!

हरियाणातील भिवानी नावाच्या गावात 1939 मध्ये त्याचा जन्म झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला; पण नोकरी मिळेना. म्हणून धनीराम एका आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करू लागला. याच ठिकाणी तो बनावट ड्रायव्हिंग लायसन्ससह सगळी बनावट कागदपत्रे बनवायला शिकला. शैक्षणिक पात्रतेच्या दाखल्यासह झाडून सगळी बनावट कागदपत्रे बनविण्यात हा वस्ताद होता.

स्वत:चीच बनावट कागदपत्रे बनवून याने या बनावट कागदपत्रांच्या आधारे 1968 ते 1974 अशी सहा वर्षे हरियाणातील एका रेल्वे स्टेशनचा स्टेशन मास्तर म्हणून काम केले. गंमत म्हणजे एवढ्या वर्षांत रेल्वेलाही त्याच्या बनवेगिरीचा थांगपत्ता लागला नव्हता. अखेर शेवटी धनीरामलाच त्याच्या या नोकरीचा कंटाळा आला आणि काहीतरी भव्यदिव्य करण्यासाठी म्हणून त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

अट्टल मोटार चोर!

त्यानंतर धनीरामने महागड्या मोटारी चोरायचा धंदा सुरू केला. मोटार चोरायची आणि बनावट कागदपत्रे तयार करून ती कुणालातरी विकून बक्कळ पैसा मिळवायचा, असा धनीरामचा धंदा होता. त्याने आपल्या कारकिर्दीत हजारहून अधिक महागड्या मोटारी चोरल्याचा संशय आहे. देशभरातील आठ राज्यांमध्ये त्याने या चोर्‍या केल्या होत्या. त्यामुळे आठ राज्यांतील पोलिस त्याच्या मागावर होते. त्याला या चोर्‍यांबद्दल तब्बल 94 वेळा अटक झाली; पण स्वत: वकील असलेला धनीराम स्वत:चा खटला स्वत:च लढायचा आणि कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन स्वत:ला निर्दोष सिद्ध करायचा. 2016 साली त्याला शेवटची अटक झाली. त्यावेळी त्याचे वय 77 वर्षांचे होते. धनीरामला एवढ्या वेळा अटक झाली होती की त्याला अटक करणारे पोलिस आणि न्यायाधीशही त्याच्या ओळखीचे झाले होते.

अफलातून कारनामा!

पण, संपूर्ण जगाच्या पाठीवरील कोणत्याही गुन्हेगाराला जमली नाही, अशी एक अफलातून कामगिरी धनीरामने करून दाखविली आणि आपण जगातल्या सगळ्या चोरांचे बाप असल्याचे दाखवून दिले. एक दिवस वर्तमानपत्र वाचत असताना धनीरामला समजले, की हरियाणातील झज्जर शहरातील अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशाविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ही चौकशी सुरू केली होती.

न्यायाधीश धनीराम!

अचानक एक दिवस संबंधित न्यायाधीशांच्या टेबलवर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारच्या नावाने एक पत्र आले. त्या पत्रात म्हटले होते की, सध्या सुरू असलेल्या विभागीय चौकशीमुळे तुम्हाला दोन महिन्यांसाठी रजेवर जाण्याची विनंती केली जात आहे. आदेशाप्रमाणे ते न्यायाधीश रजेवर गेले. ते गेल्यानंतर लगेचच पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांच्या कार्यालयाला दुसरे पत्र प्राप्त झाले. या पत्रात म्हटले होते की, झज्जरच्या अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांना दोन महिन्यांच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याने चालू असलेल्या खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी आम्ही नवीन अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशाची नियुक्ती करत आहोत.

ठरलेल्या तारखेला नवीन न्यायाधीश हजर झाले आणि त्यांनी आपले काम सुरू केले. जवळपास 40 दिवस हे नवे न्यायाधीश या ठिकाणी काम करीत होते. या चाळीस दिवसांत या महाशयांनी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत झोकून देऊन काम केले आणि तब्बल 2470 दोषींना जामीन मंजूर केले. त्याचप्रमाणे काही आरोपींना किरकोळ शिक्षाही सुनावली. या नवीन न्यायाधीशामुळे दोषींना खूप आनंद झाला.

न्यायालयही हैराण!

चाळीस दिवसांनंतर अचानक हे नवीन न्यायाधीश गायब झाले. त्यामुळे न्यायाधीशांच्या कार्यालयाने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारशी संपर्क साधून सांगितले की, त्यांचे नवीन न्यायाधीश सापडत नाहीत, गायब झालेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली. उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार ही सगळी भानगड बघून हैराण झाले. त्यांनी सांगितले की, झज्जरच्या अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांना रजेवर पाठवण्याचे कोणतेही पत्र त्यांच्याकडून नाही. अखेर या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यावर जे सत्य पुढे आले ते बघून सगळ्यांनीच कपाळावर हात मारून घेतला.

चौकशीनंतर असे समजले की, धनीराम मित्तल हाच महाभाग गेली चाळीस दिवस अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश म्हणून काम करीत होता. त्यामुळे त्या चाळीस दिवसांत त्याने दिलेले सगळे निकाल रद्दबातल ठरवण्यात आले आणि सर्व दोषींवर नव्याने खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले.

प्रांजळपणाने कबुली!

या प्रकरणी नंतर धनीरामला अटक करून चौकशी केली असता तो म्हणाला, की हे केवळ कुतूहलासाठी केले आहे. तो कायद्याचा विद्यार्थी असल्याने त्याने किरकोळ गुन्हे करणार्‍या दोषींना जामीन दिला. बलात्कारी किंवा खुन्यांना मात्र आपण जामीन दिला नाही किंवा निर्दोष सोडले नाही, असेही त्याने प्रांजळपणाने कबूल केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.