Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आत्मा पाहण्यासाठी मुलानेच घेतला आई- बापाचा जीव..

आत्मा पाहण्यासाठी मुलानेच घेतला आई- बापाचा जीव..

अनेक लोकांना भुतांविषयी कुतूहल असतं. भुतं असतात का? आणि असतात तर कशी दिसतात? याविषयी बऱ्याच लोकांना विविध प्रश्न पडतात. असे लोक हॉरर सिनेमे आवडीने पाहतात. पण भूत कसं दिसत? हे जाणून घेण्यासाठी एखाद्याने हॉरर कृत्य केल्याचे तुम्ही ऐकले आहे का? बऱ्याच वर्षांपूर्वी केरळमध्ये एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना घडली होती. ज्याच्याविषयी आजही वाच्यता केली असता अंगावर काटा येतो. आत्मा कसा दिसतो? याविषयी कुतूहल असणाऱ्या एका मुलाने आपल्याच संपूर्ण कुटुंबाला ठार मारले होते. मुख्य म्हणजे, या मुलाला आपण केलेल्या कृत्याचा तिळमात्र पश्चाताप नव्हता. चला सविस्तर माहिती घेऊया.

देशात आजपर्यंत अनेक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. यापैकी एक म्हणजे केरळचे नंथनकोड हत्याकांड. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. दिनांक ९ एप्रिल २०१७ रोजी केरळच्या तिरुवनंतपुरममधील नंथनकोड भागात ही घटना घडली. नंथनकोडमधील एका घरात एकाचवेळी एक दोन नव्हे तर ४ मृतदेह आढळून आले. मुख्य म्हणजे, या हत्या मृत कुटुंबाचा भाग असणाऱ्या मुलानेच केल्या होत्या. ज्याचा त्याला पश्चाताप देखील नव्हता. या हत्याकांडातील मृतांमध्ये निवृत्त प्राध्यापक ए. राजा थंकम ( वय वर्ष ६०), त्यांची पत्नी डॉ. जीन पद्मा (वय वर्ष ५८), मुलगी कॅरोलीन (वय वर्ष २६) आणि ललिता नावाच्या एक नातेवाईक (वय वर्ष ७०) यांचा समावेश आहे. प्राध्यापक थंकम यांचा मुलगा केडल जीनसन राजाने (वय वर्ष ३०) त्यांचा खून केल्याचे हे वृत्त आहे. थंकम यांनी दोन्ही मुलांना डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवले होते. मुलगी कॅरोलीनने शिक्षण पूर्ण केले आणि ती भारतात परतली. मात्र मुलगा केडल परदेशातचं होता. या ठिकाणी त्याला आत्मा कसा दिसतो? मेल्यानंतर आत्मा कसं काम करतो? आत्म्याला पाहता येत का? अशा विचित्र गोष्टींचे कुतूहल वाटू लागले. हे कुतूहल घेऊन तो भारतात परतला आणि याची उत्तर शोधण्यासाठी त्याने आपल्याच कुटुंबियांना ठार केले.


परदेशात शिक्षण घेत असताना केडल स्किझोफ्रेनियाचा रुग्ण बनला होता. त्यामुळे एखाद्या विषयाचं खूळ त्याच्या डोक्यात बसलं की बसलं. आत्मा कसा दिसतो आणि कसा काम करतो? या प्रश्नांनी त्याच्या मनात घर केलं. यामुळे तो सतत आत्म्यांविषयी बोलायचा, अभ्यास करायचा. सतत आत्म्याचा विचार करायचा. दरम्यान त्याचा अभ्यासातला रस निघून गेला. अखेर तो कसंबसं शिक्षण संपवून भारतात घरी परतला. विदेश सुटला मात्र कुतूहल संपलं नव्हतं. भारतात आल्यानंतरही आत्म्यांवर त्याच संशोधन सुरु होतं. या दरम्यान तो घरच्यांशी फारसा बोलायचा नाही का घरातून बाहेर पडायचा नाही. दिवसरात्र आपल्या खोलीत असायचा. कोणालाही खोलीमध्ये येऊन द्यायचा नाही. त्याची मानसिक स्थिती दिवसेंदिवस खालावत होती. त्यामुळे घरच्यांनी त्याला मानसोपचार तज्ञांकडे नेले. मात्र त्याने डॉक्टरांना सुद्धा तेच प्रश्न विचारले. त्याच्यावर उपचार सुरु झाले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. उपचार घेऊनही केडलमध्ये सुधारणा झाली नाही. मग त्याच्या पालकांनी विचार केला की, कालांतराने त्याच्या डोक्यावरील भूत उतरेल. पण तसं झालं नाही.

एके दिवशी त्याने एक विचित्र निर्णय घेतला. त्याने विचार केला की, एखाद्याला डोळ्यांदेखत मारलं तर त्याच्या शरीरातून आत्मा बाहेर पडेल आणि तो आपल्याला पहायला मिळेल. म्हणून त्याने आपल्याच कुटुंबियांच्या हत्येचा कट रचला. यात त्याने पहिली निवड आईची केली आणि ६ एप्रिल रोजी केडल, त्याची आई आणि ललिता तिघंच घरात असताना त्याने डाव साधला. आई झोपली असताना तो खोलीत गेला आणि त्याने तीक्ष्ण हत्यारानं आपल्याच जन्मदातीवर वार केले. आई हातापाया पडू लागली मात्र तो काही थांबला नाही. खोलीतून आरडाओरडा ऐकून ललिता तिथे पोहोचल्या. समोरचं चित्र पाहून त्या क्षणभर स्तब्ध झाल्या. त्यांच्या तोंडून किंचाळ्या निघाल्या.


केडलने ललिता यांच्याकडे मागे वळून पाहिले. त्यानंतर पुन्हा आईकडे नजर वळवली आणि तोपर्यंत आईचा श्वास थांबला होता. त्याला वाटलं मागे वळून पाहताना उशीर झाला असेल आणि तोपर्यंत आत्मा निघून गेला असेल. म्हणून त्याने ललिता यांच्याकडे पाऊल टाकलं आणि आईसारखेच त्यांच्यावरसुद्धा वार केले. पण त्याला ललिता यांचाही आत्मा कुठेच दिसला नाही. त्यामुळे केडल अस्वस्थ झाला. दोन्ही हत्या झाल्यानंतर ३ ते ४ तासांनी त्याचे वडील राजा थंकम आणि बहीण कॅरोलीन घरी परतले. आई आणि ललिता यांचा आत्मा दिसला नाही कदाचित वडिलांचा आत्मा दिसेल, म्हणून त्याने वडिलांवर सपासप वार केले आणि त्यांनाही संपवलं. पण अजून केडलला आत्मा दिसला नाही आणि प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. शेवटी त्याने बहिणीलाही मारून टाकलं आणि त्यानंतर ३ दिवस तो या मृतदेहांसोबत घरातच राहिला. आज नाही तर उद्या या शरीरातून आत्मा बाहेर पडेल अशा विचाराने तो मृत शरीरावर लक्ष ठेवून होता.

मात्र ९ एप्रिलला मृतदेहांमधून वास येऊ लागताच तो घाबरला. आपण अडकू म्हणून त्याने मृतदेहांचे छोटे छोटे तुकडे केले आणि नंतर घराला आग लावून स्वतः पळून गेला.आगीत होरपळणारे घर पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आत मानवी शरीराचे तुकडे जळताना दिसले. जळून मृत्यू झाला असता तर शरीराचे तुकडे नसते, हा विचार करून पोलिसांना अधिक तपासणी केली. ज्यामध्ये या व्यक्तींचा मृत्यू जळून झालेला नाही तर त्याआधीच त्यांची हत्या करण्यात आली होती हे समोर आले.

घरातील माणसांची माहिती घेताच एक व्यक्ती गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. केडलच्या वर्तनाबाबतही शेजाऱ्यांनी माहिती दिली. यावरून पोलिसांना त्याचा संशय आला. काही दिवसांतच पोलिसांनी केडलला ताब्यात घेतले. केडलने गुन्हा कबूल केला. धक्कादायक बाब म्हणजे, आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देताना त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होते. पश्चात्ताप सोडाच त्याला दुःख देखील वाटत नव्हते. मात्र आत्मा कसा दिसतो? ते पाहण्याकरिता आपण हे कृत्य केल्याचे तो वारंवार सांगत होता. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर सादर केले आणि न्यायालयानं त्याला तुरुंगात धाडले. आज या घटनेला बरीच वर्ष लोटली आहेत. मात्र आजही केरळमधील या हत्याकांडाविषयी कुणी वाच्यता केली तर विचार करताना थरकाप उडतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.