अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये जाणार का? जतचे आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले...
काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम व आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याबाबत चर्चा सुरू आहे. डॉ. विश्वजीत यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सावंत यांनी सध्या मी काँग्रेसमध्ये असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील दोन्ही आमदार तूर्त तरी काँग्रेसमध्ये असल्याचे चित्र दिसते.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला आहे. चव्हाण यांच्या या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप घडला. अशातच चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने त्यांच्यासोबत सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजीत कदम आणि जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचे हे नाव जोडले गेले, त्यामुळे सांगली जिल्ह्यातही तर्कवितर्काना उधाण आले. कदम यांनी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नसल्याचे सांगितले. त्यानंतर आमदार सावंत यांनीही खुलासा केला.
आमदार सावंत म्हणाले, माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार असल्याबद्दल अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आमच्याबद्दल काही लोकांकडून गैरसमज पसरवला जात आहे. मात्र त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. सध्या मी काँग्रेसमध्येच आहे, तूर्त काँग्रेसमध्ये राहूनच काम करणार आहे. गेल्या साडेचार वर्षात जत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. तालुक्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाशी भांडत आहे. परंतु आमचा पाणी प्रश्न राज्य सरकारला सोडवायचा नाही.जतला तालुक्याला निधी देण्याची सरकारकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे जत मतदारसंघात सरकारविरोधात लोकांची नाराजी आहे. मतदारसंघातील लोकांना विश्वासात न घेता कुठलेही पाऊल टाकणार नाही. कुठलाही गैरसमज पसरवू नका, असे आवाहन आमदार सावंत यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.