शेकडो जणांचा हल्ला अंगावर घेतला : कोण आहे ती रणरागिणी?
पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शुक्रवारी पुण्यात हल्ला झाला होता. 'निर्भय बनो' सभेला जात असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना टर्गेट केलं. याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह ४३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हल्ला झाला तेव्हा एक तरुणी हल्लेखोरांना रोखून निखिल वागळेंच्या गाडीला संरक्षण देत होती. मोठ्या धिरानं आणि हिमतीने ती भाजप कार्यकर्त्यांना सामोरं जात होती. आवश्यक तिथं कार्यकर्त्यांना बाजूला लोटत होती.
निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला झालेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी किती निडरपणे हल्ला परतवून लावतेय, हे दिसतंय. या तरुणीचं नाव आहे भक्ती कुंभार. भक्ती ही शरद पवार गटाची पदाधिकारी आहे. तिच्याकडे पुणे शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.
निखिल वागळे हे सभास्थळी जात असताना अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यावेळी शेकडो तरुणांना रोखण्यासाठी भक्ती धावली. तिने मोठी हिंमत दाखवत वागळेंच्या गाडीला संरक्षण दिलं. जो कोणी गाडीवर हल्ला करण्यासाठी येई त्याला ती बाजूला लोटत होती. मोठमोठ्याने ओरडत सगळ्यांना बाजूला सारत होती.भक्ती कुंभारच्या हिंमतीचं सर्वांनीच कौतुक केलं आहे. निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ल्याचा व्हिडीओ शनिवारी दिवसभर व्हायरल झाला होता. सोशल मीडियात भक्तीच्या शौर्याचं कौतुक केलं. स्वतः खासदार सुप्रीया सुळे यांनी तिला शाबासकी दिली. पोलिस बघ्याची भूमिका घेत असताना भक्तीने प्रसंगावधान दाखवून निखिल वागळे आणि असिम सरोदे यांना संरक्षण दिलं, ही मोठी गोष्ट असल्याचं सुळे म्हणाल्या.
दरम्यान, शुक्रवारी पुण्यात निखील वागळेंच्या गाडीची तोडफोड झाली. अंगावर शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला. तसेच निर्भय बनो कार्यक्रम स्थळी दगडफेक देखील करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी रात्री पुण्यातील वातावरणात तणाव निर्माण झाला होता. वागळेंना पोलिसांनी सभा न घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, वागळे सभा घेण्यावर ठाम होते. हल्ला झाल्यानंतर निखील वागळे, असिम सरोदे, विश्वंभर चौधरी यांनी राष्ट्रसेवा दलाच्या कार्यलयात सभा घेतली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.