सांगलीत डॉक्टरला १९ लाखांचा गंडा
सांगली : येथील एका डॉक्टरला, तुम्ही चीनला पाठविलेल्या कुरिअरमध्ये बेकायदा वस्तू आहेत. त्याची चौकशी सीआयडी करणार असल्याची भीती दाखवून १९ लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी डॉ. निकेत कांतिलाल शहा (रा. शहा हॉस्पिटल, शंभरफुटी रस्ता, डी मार्टजवळ, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डॉ. निकेत शहा यांचे शंभरफुटी परिसरात हॉस्पिटल आहे. दि. ३ रोजी त्यांना एक फोन आला. समोरील व्यक्तीने आपण डी.एच.एल. कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही चीन येथे जे कुरिअर पाठविले आहे, त्यामध्ये बनावट वीस पासपोर्ट, व्हिसा, लॅपटॉप आणि चायनीज करन्सीचा समावेश असल्याचे सांगितले.. या सर्व वस्तू बेकायदा आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी मुंबई सीआयडी आणि अंधेरी पोलिस ठाण्याकडून होणार असल्याचे सांगितले.
दि. ९ पर्यंत वारंवार डॉ. शहा यांना फोन करून सीआयडी चौकशीची भीती घालण्यात आली. भामट्याने डॉ. शहा यांना एक अॅप मोबाईलवर डाऊनलोड करण्यास सांगितले. डॉ. शहा यांनी हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्या माध्यमातून भामट्याने डॉ. शहा यांच्या बँक खात्याची सर्व माहिती मिळविली. सीआयडी तपासाची भीती घालून भामट्याने डॉ. शहा यांना त्यांच्या खात्यावरील सर्व रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून स्वतःच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. अर्ध्या तासात तपासणी करुन ती रक्कम पुन्हा तुमच्या खात्यात पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यावर विश्वास ठेवून डॉ. शहा यांनी त्यांच्या खात्यातील १९ लाख ७ हजार रुपयांची रक्कम भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यात ऑनलाइन माध्यमातून पाठविली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. शहा यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.