सांगलीतील तिसऱ्या संशयिताला अटक, पाच दिवस पोलिस कोठडी संतोष कदम खून प्रकरण, संशयितांची संख्याही वाढण्याची शक्यता
सांगली : सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याचा खून आर्थिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कुरूंदवाड पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री दोघांना ताब्यात घेऊन अटक केली होती. शुक्रवारी रात्री उशीरा यातील तिसऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. या तीनही संशयितांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान या खून प्रकरणात आणखी काही संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
तुषार महेश भिसे (वय २०, रा. काळीवाट, सांगली) असे अटक केलेल्या तिसऱ्या संशयिताचे नाव आहे. त्यापूर्वी कुरूंदवाड पोलिसांनी नितेश दिलीप वराळे (वय ३०, रा. सिद्धार्थ परिसर, सांगली), सूरज प्रकाश जाधव (वय २१, रा. गाढवनगर, गावभाग, सांगली) या दोघांना अटक केली आहे. मृत संतोष कदम याने नितेश वराळे याला महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून त्याच्याकडून पैसे घेतले होते. बरेच दिवस झाले तरी नोकरी मिळाली नसल्याने वराळे याने त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. गुरुवारी पैसे परत देतो असे सांगून संतोष नितेशला घेऊन आलास येथे गेला होता. त्यानंतर शुक्रवारी दुपारी संतोषचा मृतदेहच कुरूंदवाड-नांदणी रस्त्यावर कारमध्ये सापडला.
ही घटना घडल्यानंतर कुरूंदवाडचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह कोल्हापूरचे एलसीबीचे पथक संशयितांचा शोध घेत होते. मोबाईल कॉल डिटेल्स आणि आलास येथील जेसीबी चालकाकडील चौकशीनंतर गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी वराळे आणि जाधव यांना ताब्यात घेतेले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तिसरा संशयित तुषार पिसे याचाही या खुनात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशीरा भिसे याला अटक करण्यात आली. तिघांनाही पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या तिघांकडे वेगवेगळी चौकशी केल्यानंतर आणखी काही संशयितांची नावे समोर आली आहेत. पोलिस त्यांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. त्यामुळे संतोष कदम खून प्रकरणात संशयितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.