Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला

पुणे : पुण्यात वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलेला आरोपी पळून गेल्याची घटना समोर आलीय. मार्शल लुईस लिलाकर असं आरोपीचं नाव असून त्याला सायबर गुन्ह्यात अटक केली होती. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला त्याने धमकी दिली होती. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोशल मीडियावर रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना मार्शल लुईसने धमकावलं होतं. या प्रकरणी लिलाकरला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले होते. त्यावेळी तो पोलिसांच्या तावडीतून निसटून पळून गेला.

सायबर पोलीस स्टेशनमध्ये मार्शलवर गुन्हा दाखल झाला होता. त्याला ९ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. पहाटे छातीत दुखत असल्याचं सांगितल्यानंतर त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलं होतं. सायबर स्टाफच्या मदतीने त्याला ससून रुग्णलायत आणले होते. तिथे ओपीडीमधून सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मार्शल पळून गेला. गेल्या काही महिन्यांपासून पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरण, शरद मोहोळची हत्या, गुंडांचा सोशल मीडियावर दहशत पसरवण्याचा प्रयत्न, गोळीबाराची घटना यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडालीय. आता आरोपीने ससून रुग्णालयातून धूम ठोकलीय.


मार्शल लुईस लिलाकर पळून गेल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर मार्शल लुईसचा शोध पोलीस घेत आहेत. गुंड शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी न्यायालयात पुरवणी जबाबात आपल्याला धमकावलं जात असून हत्येचे सूत्रधार मारणे आणि शेलार यांच्याकडून जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं.

कुख्यात गुंड शरद मोहोळची त्याच्या पुण्यात सुतारदरा इथल्या घराजवळच हत्या केली होती. भरदिवसा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता. यात शरद मोहोळचा मृत्यू झाला. मोहोळ हत्या प्रकरणी दोन वकिलांसह आतापर्यंत १७ जणांना अटक केली गेलीय. यात प्रमुख सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांचाही समावेश आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.