Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दहशतवाद्यांचा पोलीस स्टेशनमध्ये घुसून गोळीबार, १० पोलीस कर्मचारी ठार

दहशतवाद्यांचा पोलीस स्टेशनमध्ये घुसून गोळीबार, १० पोलीस कर्मचारी ठार

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यादरम्यान पाकिस्तानात अनेक ठिकाणी हिंसाचार आणि दहशतवादी घटना सातत्याने घडत आहेत. बलुचिस्तानमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटाच्या आठवणी अजूनही ताज्या असतानाच, पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी खैबर पख्तुनख्वामधील डेरा इस्माईल खान शहरातील पोलीस स्टेशनला लक्ष्य करून मोठा हल्ला केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिसुल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात दहा पोलीस ठार झाले, तर ६ जण जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दहशतवादी हल्ल्यात १० पोलीस शहीद

अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी पहाटे दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणली. या दरम्यान अज्ञात दहशतवाद्यांनी प्रथम स्नायपर गोळीबार केला आणि नंतर चौधवन पोलीस ठाण्यात प्रवेश केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आणि हातबॉम्बही फेकले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये स्वाबीच्या एलिट पोलिस युनिटच्या सहा पोलिसांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे, जे निवडणुकीदरम्यान स्थानिक पोलिसांना मदत करण्यासाठी परिसरात तैनात होते.


रस्त्यांवर शोधमोहीम सुरू

या हल्ल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. दक्षिण वझिरीस्तान आदिवासी जिल्हा आणि डेरा गाझी खानकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात असून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

बलुचिस्तानच्या नुष्की जिल्ह्यातही झाला स्फोट

रविवारी, ४ फेब्रुवारी रोजी बलुचिस्तानच्या नुष्की जिल्ह्यात पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या (ECP) कार्यालयाबाहेर एक बॉम्बस्फोट झाला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, ECP कार्यालयाच्या गेटबाहेर झालेल्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून गुन्हेगारांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.