अशोक चव्हाणांनंतर देशमुख बंधू भाजपाच्या वाटेवर?
लातूर : काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसचा हात सोडून भाजपावासी झाले आहेत. वर्षभरापासून चव्हाण भाजपात जाण्याच्या चर्चा सुरू होत्या. पण अखेरीस त्यांनी 13 फेब्रुवारीला भाजपात प्रवेश केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे ती लातूरचे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या भाजपा प्रवेशाबाबतची. कारण काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्याबाबत आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दिवंगत विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचे दोन्ही चिरंजीव अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी लातूरमध्ये आपले आणि काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम ठेवले आहे. परंतु, ईडी आणि सीबीआयच्या भीतीमुळे देशमुख बंधूही भाजपात जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा रंगलेली आहे. तर देशमुख बंधुंच्या भाजपा प्रवेशाने भाजपाला लातूर जिल्ह्यात आपला जम बसवता येणार आहे. कारण लातुर जिल्ह्यात भाजपाचे तीन आमदार असले तरी जिल्ह्यावर आजही देशमुखांचे वर्चस्व कायम आहे. जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दोन, भाजपाचे तीन आमदार आहेत. तर, एकाच घरातील देशमुख बंधू काँग्रेचे आमदार आहेत. ज्यामुळे या जिल्ह्यात भाजपाचे पारडे जड असले तरी प्रभाव मात्र देशमुख बंधुंचाच आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने लातूर जिल्ह्यातून तीन उमेदवार विजयी करून आणलेले असले तरी, भाजपाला मात्र राज्याच्या राजकारणात वेगळा ठसा निर्माण करता आलेला नाही. जिल्ह्यात भाजपाचे तीन आमदार असूनही पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे आहे. तर, लातूरच्या भाजपा आमदारांची मंत्रीपदाची स्वप्नही अधुरीच राहिली आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेचे संजय बनसोडे यांना क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र तेही उदगीर मतदार संघापुरते मर्यादित राहत असल्याचेच दिसून येते. पण मंत्रिपद नसतानाही आणि विरोधात असूनही देशमुख बंधू संपूर्ण जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम ठेवून आहेत. त्यामुळे भाजपाला अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना पक्षात घेणे हे फायद्याचेच ठरणार आहे.
त्यामुळे आता ज्याप्रमाणे अशोक चव्हाणांना भाजपात प्रवेश देऊन नांदेडमध्ये भाजपाला बळकट करण्याचे काम करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातही भाजपाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न करण्यात येऊ शकतो. परंतु, काही दिवसांपूर्वी, सीबीआय, ईडी, सीआयडी अशी वादळे येत जात असतात. मात्र लातूरची (बाभळगाव) गढी जागेवरून हलणार नाही. या गढीवर काँग्रेचा झेंडा नेहमी फडकत राहील, असे आमदार अमित देशमुख यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता देशमुख बंधू येणाऱ्या काळात काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.