जया प्रदा फरार घोषित; अभिनेत्रीला शोधून हजर करण्याचे पोलिसांना आदेश
मुंबई : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांच्याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जया प्रदा एका प्रकरणासाठी चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशातील जिल्ह्यातील एका न्यायालयाने अभिनेत्रीवर 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश त्यांना दिले होते. मात्र वारंवार आदेश देऊनही अभिनेत्री कोर्टात दाखल न झाल्यानं त्यांना कोर्टानं फरार घोषित केलं आहे.
जया प्रदा यांच्याविरोधातील प्रकरणाची सुनावणी एमपीएमएलए स्पेशल कोर्टमध्ये सुरू आहे. या प्रकरणी गेल्या अनेक तारखांना जयाप्रदा न्यायालयात हजर राहिल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एक दोन नाही तर सात वेळा अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. पण तरीही त्या कोर्टात हजर राहिल्या नाहीत. यानंतर रामपूर पोलीस अधीक्षकांना वारंवार पत्र लिहून जयाप्रदा यांना हजर करण्याचे आदेश देण्यात आले. पण तरीही त्या आल्या नाहीत.
आता न्यायालयाने मंगळवारी कठोर भूमिका घेत माजी खासदार आणि अभिनेत्री जया प्रदा यांना फरार घोषित केलं आणि त्यांच्याविरुद्ध कलम ८२ सीआरपीसी अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षकांना डेप्युटी एसपीच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून जया प्रदा यांना 6 मार्च 2024 रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
ही गोष्ट 2019 सालची आहे. त्यावेळी जयाप्रदा 19 एप्रिल रोजी रामपूरच्या स्वारा पोलीस स्टेशन हद्दीतील नूरपूर येथे पोहोचल्या होत्या. मात्र याच काळात लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होती. यावेळी त्यांनी रस्त्याचे उद्घाटनही केले होते, त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतरच त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे रामपूरमधून खासदार राहिलेल्या जयाप्रदा यांची राजकीय कारकीर्द 1994 मध्ये तेलुगू देसम पक्षातून सुरू झाली. जयाप्रदा 1996 मध्ये आंध्र प्रदेशमधून पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. यानंतर 2004 मध्ये त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या आणि दोनदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता या प्रकरणामुळं जया यांचं राजकीय भवितव्य अडचणीत आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.