Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज यांची पाठ फिरताच पुन्हा टोल वसुली सुरू

राज यांची पाठ फिरताच पुन्हा टोल वसुली सुरू

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी नाशिक दौरा आटोपून मुंबईकडे परत जात असताना त्यांच्या वाहनांचा ताफा मुलुंड चेक नाका येथील वाहतूक कोंडीत सापडला. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. राज यांचा ताफा टोल नाक्यावरून पुढे जाईपर्यंत मुंबईकडे जाणारी आणि ठाण्याकडे येणारी वाहने टोल कर्मचाऱ्यांनी टोल न घेता सोडली. मात्र, त्यांची पाठ फिरताच पुन्हा टोल वसुली सुरू झाली.

ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे यांनी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि साडेसातच्या सुमारास ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्या वाहनांचा ताफा मुलुंड येथील टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडीत अडकला. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतानाही टोल नाक्यावरील कर्मचारी टोल वसुली करीत होते. यामुळे संतप्त झालेले राज गाडीतून उतरून टोल नाक्यावर गेले. 


वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना टोल कसले वसूल करता, अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूंची वाहने टोल न घेता काही मिनिटे सोडली. मात्र, राज यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होताच पुन्हा टोल वसुली व रांगा लागल्याचे चित्र टोलनाक्यावर दिसले. राज ठाकरे मागील दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर होते. दौरा आटोपून शुक्रवारी ते मुंबईला परतत होते. यावेळी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात थांबले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.