Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तासगावात दोन ज्युनिअर भिडू भिडणार ; संघर्षाचा वारसा रोहित आणि प्रभाकर यांच्यात...

तासगावात दोन ज्युनिअर भिडू भिडणार ; संघर्षाचा वारसा रोहित आणि प्रभाकर यांच्यात...


तासगाव:  कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात दिवंगत उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील (आबा) आणि विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचा संघर्ष संपूर्ण राज्याने पहिला आहे. मात्र आता तोच संघर्षाचा वारसा पुढच्या पिढीकडे अर्थात दोन ज्युनियर पाटलांमध्ये देखील पहायला मिळत आहे. त्यासाठी दोघेही मैदानात उतरले आहेत. 
आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित आणि संजयकाकांचे पुत्र प्रभाकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन्ही युवा नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवत असल्याचे चित्र दिसत आहे. यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. प्रथम लोकसभेच्या निवडणुका होतील. तत्पूर्वी तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात आता विधानसभा निवडणुकीसाठी टशन सुरू झाले आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी राजकारणात चांगला नावलौकिक मिळवला असला तरी त्यांना मतदारसंघात मोठा संघर्ष करायला लागायचा. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष झाला होता. आबांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना 2016 च्या विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात आली. त्यानंतर 2019 ला त्यांनाच पुन्हा संधी मिळाली.

मात्र आता 2024 ला त्यांचे पुत्र रोहित पाटील हे विधानसभेची निवडणूक लढतील, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हा संघर्ष आता पुढे जाताना दिसू लागला आहे. खासदार संजय पाटील कृष्णा खोरे विकास महामंडळावर असल्यापासून सिंचन योजनांसाठी पाठपुरावा करीत होते, आता रोहित पाटील यांनी टेंभू योजनेसाठी उपोषण करून सरकारला कोंडीत पकडून योजनेला मंजुरी मिळवली.

दरम्यान खासदार पाटील यांनी स्वतःच्या मुलासाठी आईची धडपड सुरू असल्याचा आरोप केला होता. आता प्रभाकर पाटील आणि रोहित पाटील हे देखील एकमेकांवर राजकीय पलटवार करीत आहेत. प्रभाकर पाटील यांनी रोज संपर्कदौरा सुरू केला आहे. खासदार फंड व शासनाच्या विविध योजनांमधून ठेकेदारांना काम देणे, लोकांची कामे करणे, स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक सभेत प्रभाकर पाटील हे रोहित पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत.

रोहित पाटील यांची कर्तव्य यात्रा...

निवडणुकांचा अंदाज घेऊन रोहित पाटील यांनी देखील आता तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात 'कर्तव्य यात्रा' काढून मतदारांचा संपर्क वाढवला आहे. रोज एका गावात जाऊन तिथे लोकांना भेटणे, लोकांचे प्रश्न समजून घेणे, एखाद्या गावात मुक्काम करणे, अशी ही यात्रा निघाली आहे. याच यात्रेतून निवडणुकीची साखरपेरणी सुरू झाली आहे.

खासदार गटाकडून प्रभाकर उजळणार ?

खासदार गटाकडून आता संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हेच भाजपकडून आगामी विधानसभा निवडणूक लढतील, असे जाहीर करून गेल्या दीड - दोन वर्षात तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार संपर्क वाढवला आहे. समाजमाध्यमात देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे आजपर्यंत राजकारणापासून लांब राहिलेले प्रभाकर हे उजळणार असल्याचे दिसत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.