दारूड्याला समजविण्याचा प्रयत्न आला अंगाशी; पिता-पुत्रावर चाकूने वार
पुणे : दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ज्येष्ठाला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी तरुण वडिलांना घेऊन गेला असता 'तुला पण तुझ्या बापासोबत संपवून टाकतो', असे म्हणून पिता-पुत्रांच्या पोटात चाकूने सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दत्तनगरमधील टेल्को कॉलनीत रविवारी रात्री ९ वाजता घडली.
या घटनेत नवनाथ आनंदा कुलथे (वय ४६, रा. दत्तनगर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी संग्राम शिंदे (वय ४८, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) याला अटक केली आहे. याबाबत गौरव नवनाथ कुलथे (वय २४, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी हे एकाच गल्लीत राहतात. संग्राम हा दोन महिन्यांपूर्वी गल्लीत दारू पिऊन गोंधळ घालत होता.
तेव्हा फिर्यादीचे वडील नवनाथ कुलथे यांनी त्याला रागावून, समजावून सांगण्यात प्रयत्न केला होता. त्याचा राग मनात धरून संग्राम याने रविवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांना शिवीगाळ केली होती. हे गौरव याला समजल्यावर रात्री तो वडिलांना घेऊन जाब विचारण्यासाठी संग्राम याच्याकडे गेला होता. त्यावेळी संग्राम याने तुला आताच संपवून टाकतो, असे म्हणत त्याने फिर्यादीच्या वडिलांच्या पोटात चाकूने सपासप अनेक वार केले. त्यांना वाचविण्यासाठी गौरव पुढे गेला असता तुला पण तुझ्या बापासोबत आजच संपवून टाकतो, असे म्हणून त्यांच्याही पोटात चाकूने वार करून जखमी केले. पोलिसांनी संग्राम शिंदे याला अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.