Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून अंदाधुंद गोळीबार, पोलीस स्टेशनमध्येच झाडल्या गोळ्या

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून अंदाधुंद गोळीबार, पोलीस स्टेशनमध्येच झाडल्या गोळ्या


उल्हासनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला आहे. कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गोळीबारात दोघे जण जखमी झाले असल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून शिंदे गटाचे तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात मोठी गर्दी केली आहे. या गोळीबाराच्या घटनेत शिंदे गटाच्या कार्यकर्ता जखमी झाला आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादावरुन गोळीबार झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यात वाद झाला. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी फायरिंग केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघे जखमी झाले असल्याचं वृत्त आहे.

या गोळीबारात शिवसेनेचे महेश गायकवाड हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे.

महेश गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील पदाधिकारी आहेत. महेश गायकवाड आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यात काही गोष्टींवरुन वाद झाला असल्याचं वृत्त आहे. त्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.