मोदींची सत्ता घालविल्याशिवाय थांबणार नाही - निखिल वागळे
पक्ष फोडणे ही भाजपची स्ट्रटेजी असून, पंतप्रधान मोदी व शहा यांना रोखल्याशिवाय आणि त्यांची सत्ता घालवल्याशिवाय आता आपण थांबणार नाही, असे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ठणकावून सांगितले. इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा आजची अघोषित आणीबाणी अतिशय धोकादायक आहे, त्यामुळे मोदी सरकारला मत देऊ नका, असे आवाहन करीत पूर्वीचे देवेंद्र फडणवीस चांगले होते; ते आता खलनायक झाले आहेत, हे माफिया पोसणारे गृहमंत्री आहेत, असा हल्लाबोल वागळे यांनी केला.
नगर लोकशाही बचाव मंच आयोजित 'निर्भय बनो, लढा लोकशाहीचा… अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा' या कार्यक्रमात वागळे बोलत होते. अध्यक्षस्थानी नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, निशा शिवूरकर (संगमनेर), किरण काळे, सुजित क्षेत्रे, प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, विलास उबाळे, अनिस चुडीवाला, मनोज गुंदेचा, संजय झिंजे आदी उपस्थित होते.
सध्याचे राज्यकर्ते हेच आपल्या देशाचे मोठे शत्रू आहेत. लोकांमध्ये दहशत निर्माण करणे ही त्यांना सवय लागलेली आहे. त्यामुळे 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असे सांगत निखिल वागळे म्हणाले, 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी जन्माला घातलेले पक्ष तुम्ही फोडता ते फक्त पैशांसाठी,' असा सवाल त्यांनी केला.
आज भाजपाची मते व त्यांच्या मित्र पक्षांची मते ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त नाहीत. त्यामुळे मोदी व शहा यांची चाललेली हुकूमशाही नष्ट करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आले पाहिजे. कसं बोलावं, हे आपल्याला सांगतात आणि नोटीसही बजवायला लागले आहेत. मग टी. राजा तसेच राणे यांचा मुलगा, स्वतŠ राज्याचे गृहमंत्री हे कशा पद्धतीने बोलतात. मग त्यांना कोणी नोटीस दिली आहे का, असा सवाल वागळे यांनी केला. दरम्यान, नगरमधील गुंडगिरीच्या विरोधामध्ये आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच आमदार संग्राम जगताप यांच्यावर पोलीस कारवाई करीत नसतील तर त्यांची मिलीभगत आहे, असा आरोप त्यांनी केला.
पुण्याचे पोलीस भाजपचे गुलाम
आम्ही 'निर्भय बनो' अभियान चालू केले. त्यावेळी आम्हाला विरोध सुरू झाला. यापूर्वी माझ्यावर अनेक हल्ले झाले. परवा पुण्यामध्येही हल्ला झाला. हल्लेखोर भाजपवाले आहेत. तरीही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही, असे सांगत पुण्याचे पोलीस भाजपचे गुलाम आहेत, असा हल्लाबोल वागळे यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.