Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विशाल पाटलांच्या उमेदवारीचा उद्या मुंबईत फैसला

विशाल पाटलांच्या उमेदवारीचा उद्या मुंबईत फैसला

लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून, सांगलीची जागा काँग्रेसला निश्चित झाल्याचे स्पष्ट आहे. प्रदेश काँग्रेसने लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांची प्राथमिक यादी तयार करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक गुरुवारी (ता. 22) मुंबईत बोलवली आहे. त्यावेळी सांगलीतून विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून त्यांचे नाव दिल्लीला पाठवले जाणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यासह काही मित्र पक्षांची महाविकास आघाडी आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. काही जागांच्या अडचणी आहेत. त्यावर महाविकास आघाडीचे नेते तोडगा काढत आहेत, पण काँग्रेसने आपल्या हक्काच्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

यासाठी मतदारसंघनिहाय समन्वयक व निरीक्षक नेमण्यात आले आहेत. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची प्राथमिक यादी २२ फेब्रुवारीच्या पक्षाच्या छाननी समितीच्या बैठकीत निश्चित केली जाईल. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्यासह राज्यातील बडे नेते या बैठकीला उपस्थित राहतील.

सांगली लोकसभेसाठी जागा काँग्रेसला निश्चित झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या ठिकाणी विशाल पाटील यांच्या नावावर राज्यस्तरीय समितीकडून गुरुवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही यादी दिल्लीत काँग्रेसच्या निवडणूक समितीला दिली जाईल. तेथून उमेदवारांच्या घोषणा होणार आहे. सध्या उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच विशाल पाटील लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. मतदारसंघात विविध भागात जाऊन महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांच्या ते भेटी घेत आहेत.

अशोक चव्हाणांची सूत्रे पृथ्वीराज चव्हाणांकडे....

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या विविध समित्यांवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते. मात्र, ते भाजपवाशी झाले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीबाबतच्या विविध समित्यांवर आता त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.