अशोक चव्हाणांच्या वडिलांनी देखील काँग्रेस फोडली होती
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन शकले केली आणि पाकिस्तान-बांगलादेश अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली. या मोठ्या कामगिरीमुळे इंदिरा गांधी या निर्विवाद शक्तीशाली नेत्या बनल्या. त्यांची लोकप्रियता शिखरावर गेली होती. या काळात त्यांनी काँग्रेसमधीलच जुन्या नेत्यांना बाजूला करण्यास सुरुवात केली. आपल्या मर्जीतल्या लोकांना इंदिरा गांधींनी पदं दिली. महाराष्ट्रात देखील इंदिरा गांधी यांचा प्रभाव पाहण्यास मिळाला. वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर इंदिरा गांधी यांचे विश्वासू म्हणून शंकरराव चव्हाण यांना संधी मिळाली.
वसंतराव नाईकांनी राजकीय सन्यास घेतला
सत्तरच्या दशकात एक कठोर प्रशासक म्हणून चव्हाण यांची किर्ती होती. नगराध्यक्ष ते मुख्यमंत्री अशी झेप त्यांनी कारकीर्दीत घेतली होती. पण, या काळात त्यांचे काँग्रेसमध्येच अनेक विरोधक तयार झाले होते. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार सम्राटांना त्यांनी अंगावर घेतलं होतं. शंकरराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्यामध्य धुसफूस सुरु झाली होती.शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळातून वसंतरावांना वगळण्यात आले होते. हा वसंतरावांचा सरळसरळ अपमान होता. त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आणि राजकीय सन्यास घेतला. पण, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि काही काळातच इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. त्यानंतर इंदिरा गांधी यांची देशात हुकूमशाही सुरु झाली. प्रशासकीय कामात सरकारचा प्रचंड हस्तक्षेप वाढला. अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
इंदिरा गांधींवर जनता नाराज
आणीबाणीच्या काळात शंकररावांनी मंत्रालयाच्या कारभारात शिस्त आणली. पण, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. सरकारी अधिकाऱ्यांकडून अनेक कामे होईनाशी झाली. लोकांमध्ये नाराजी वाढली होती. याचा परिणाम देशातील निवडणुकीत दिसून आला. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात २८ जागा गमवाव्या लागल्या. इंदिरा गांधी यांच्या काँग्रेससाठी हा धक्का होता.
वसंतराव नाईक यांनी संधी ओळखली आणि ते पुन्हा राजकारणात सक्रीय झाले. यावेळी त्यांनी शंकरराव चव्हाण यांना धारेवर धरले. टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पराभव चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे झाला असं त्यांनी ठासून सांगितलं. मुख्यमंत्री पद गमावलेला शंकरराव यांनी पक्षातील टोकाचा विरोध पाहून इंदिरा गांधींना फोन करुन त्यांच्या परिस्थितीची जाणीव करुन दिली.
इंदिरा गांधींच्या संमतीने पक्ष फोडला
इंदिरा गांधी यांना देखील देशपातळीवर मोठा विरोध सुरु झाला होता. काँग्रेसची अनेक शकले पडली होती. अशा गोंधळात चक्क इंदिरा गांधींनी शंकरराव चव्हाण यांना पक्ष सोडून नवा पक्ष काढण्याची परवानगी दिल्याचं सांगितलं जातं. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. यावेळी नगरचे बाळासाहेब विखे पाटील देखील त्यांच्यासोबत होते.१९७८ च्या निवडणुकीमध्ये शंकरराव चव्हाण यांचा दारुण पराभव झाला. त्यांचे दोनच आमदार निवडून आले. पुढे ते शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये सामील झाले. पुढे शंकरराव चव्हाणांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं. त्यांनी गृह, संरक्षण, अर्थ अशी महत्त्वाची पदे सांभाळली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.