'पंचायत' फेम अभिनेत्री आंचल तिवारीसह 9 जणांचा अपघातात मृत्यू
'पंचायत' या सीरिजच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री आंचल तिवारीसह 9 जणांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अभिनेत्रीसह भोजपुरी गायक छोटू पांडेचादेखील मृत्यू झाला आहे. अभिनेत्रीच्या निधनाने भोजपुरी इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.
बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील देवकली गावाजवळ 25 फेब्रुवारी 2024 रोजी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात लोकप्रिय अभिनेत्री आंचल तिवारीसह आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या नऊ जणांमध्ये भोजपुरी इंडस्ट्रीतील काही कलाकारांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. कलाकारांच्या मृत्यूनंतर भोजपुरी इंडस्ट्रीतून शोक व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
बिहारमधील देवकली गावाजवळ ट्रक, एसयूव्ही आणि मोटारसायकल यांची टक्कर झाली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. अनेक भोजपुरी कलाकारांचा यात समावेश आहे. दोन महिलांसह आठ लोक एका एसयूव्ही गाडीमधून प्रवास करत होते. यावेळी या गाडीला एका दुचाकीला धडकली. यानंतर,एसयूव्ही आणि दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या लेनमध्ये गेले, तेथे एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकासह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.या घटनेनंतर NH 2 वर ट्रॅफिक जाम झाले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी भभुवा येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे.
कोण होती आंचल तिवारी?
आंचल तिवारी भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती मुंबईतील तिलक नगर भागात राहायला होती. आंचल इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री होती. प्राईम व्हिडीओच्या गाजलेल्या 'पंचायत' या सीरिजमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. या सीरिजमध्ये तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. भोजपुरी इंडस्ट्रीमध्येही आंचल चांगलीच अॅक्टिव्ह आहे. अनेक भोजपुरी गाण्यांना तिने आपला आवाज दिला आहे.
गायक छोटू पांडेचं निधन
भोजपुरी गायक छोटू पांडेचंदेखील निधन झालं आहे. भोजपुरी गाण्यांसह त्याने सिनेमांतही काम केलं आहे. 'फोन काटतारु दोसरा से पट गइलू का' या गाण्यामुळे छोटू पांडेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. 'सबकर दुलरुआ हवन' या भोजपुरी सिनेमांतही त्याने काम केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.