महाप्रसादामुळे 500 पेक्षा अधिक जणांना विषबाधा
बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील लोणार तालुक्याच्या सोमठाणा गावामध्ये मंगळवारी 500 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली आहे. एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. हाच महाप्रसाद खाऊन 500 जणांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे बुलढाण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर, या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांच्या नाकी नऊ आले आहेत.
मंगळवारी एकादशी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये महाप्रसाद म्हणून भगर आणि आमटी भाविकांना वाटण्यात आली. मात्र भगर आणि आमटी खाल्ल्यामुळे या भाविकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. यातूनच अंदाज लावला गेला की महाप्रसाद खाल्ल्यामुळे 500 पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे. आता या सर्वांवर, बिबी, लोणार, मेहकर, सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर एकाच वेळी इतक्या भाविकांना विषबाधा झाल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विषबाधा झाल्यानंतर ज्या रुग्णांवर त्वरित उपचार करण्यात आले त्यातील 100 ते 120 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 400 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. यातील वृद्ध भाविकांचे प्रकृती नाजूक सांगितली जात आहे. सांगितले जात आहे की, ज्यावेळी सर्व रुग्णांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हलवण्यात आले त्यावेळी तेथे डॉक्टर उपस्थित नव्हते. या कारणामुळे भाविकांचा संताप झाला. आता त्यांनी या डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
दरम्यान, यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव आश्रम शाळेतील 96 विद्यार्थ्यांना दूध पिल्यामुळे विषबाधा झाली होती. खुलताबादमधील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाल्याची ही घटना घडली होती. या घटनेमुळे प्रशासन व्यवस्थेवर ताशेरे ओढण्यात आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.