गायक राहत फतेह अली खान यांनी बाटलीसाठी नोकराला चपलाने मारलं; Video
राहत फतेह अली खान यांच्याकडून मारहाण होत असताना ती व्यक्ती विनंती करताना दिसतेय. मला मारू नका, असं ती व्यक्ती म्हणतेय. मात्र तरीही ते थांबत नाहीत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पाकिस्तानी आणि जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘हे अत्यंत लज्जास्पद आहे’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘हे चांगले गायक असतील, पण चांगला माणूस तर नक्की नाही’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. हे प्रकरण वाढल्यानंतर त्यावर राहत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
आपली बाजू मांडण्यासाठी राहत यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये ते म्हणतायत, “ही उस्ताद आणि शागिर्द (गुरू-शिष्य) यांच्यातील गोष्ट आहे. जेव्हा तो चांगला काम करतो, तेव्हा आम्ही त्याचं कौतुक करतो आणि जेव्हा तो चूक करतो, तेव्हा आम्ही त्याला शिक्षासुद्धा देतो.” व्हिडीओमध्ये राहत ज्या बाटलीबद्दल बोलत होते, ती दारूची बाटली असल्याचं नेटकरी म्हणत होते. मात्र त्यात दारू नसून पवित्र पाणी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
राहत फतेह अली खान अशाप्रकारे वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी 2019 मध्ये त्यांच्यावर भारतात परकीय चलनाची तस्करी केल्याचा आरोप होता. त्यामुळे अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने त्यांना नोटीस बजावली होती. राहत फतेह अली खान यांनी भारतात तीन वर्षांपासून परकीय चलनाची तस्करी केल्याचा आरोप होता.
राहत फतेह अली खान यांची गायकी केवळ पाकिस्तानातच नाही, तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. त्यांच्या असंख्य गाण्यांना भारतातही प्रचंड लोकप्रियता मिळाली. राहत यांनी 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘पाप’ या चित्रपटातील गाणं त्यांनी गायलं होतं. ‘लागी तुमसे मन की लगन’ हे त्यांचं गाणं आजही तुफान लोकप्रिय आहे. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमधील अनेक गाणी गायली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.