माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंशी चर्चेत राज्यसभेसाठी चाचपणी??
भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधींना मुलाखत दिलेले रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. या चर्चेच्या वेळी तेथे रश्मी, आदित्य आणि तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. रघुराम राजन यांनी मातोश्रीत जाऊन ठाकरे परिवाराची भेट घेतल्याने त्यांनी आपल्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चाचपणी केली किंवा काय??, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्यसभेसाठी 24 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातून त्यासाठी 5 जागांची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेतले बलाबल लक्षात घेता महाविकास आघाडीचा 1 आणि भाजप प्रणित महायुतीचे 4 असे खासदार निवडून येऊ शकतात. मात्र ही निवडणूक बिनविरोध झाली तरच वर उल्लेख केल्याप्रमाणे खासदार निवडून येऊ शकतात, अन्यथा महाविकास आघाडी आणि महायुती यांनी कोणतीही तडजोड न करता निवडणूक घेतली तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकते.
शिवसेनेचे अमराठी खासदार
या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यसभा उमेदवारीची चाचपणी करण्यासाठी रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेने एरवी मराठी माणसांचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर कायम ठेवला असला, तरी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने कायमच अमराठी उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा इतिहास आहे. चंद्रिका केनिया, राजकुमार धूत, राम जेठमलानी आदी नेत्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवल्याची इतिहासात नोंद आहे. यातच आपलाही नंबर लागू शकतो, असा रघुराम राजन यांचा होरा असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची राजकीय वर्तुळात अटकळ बांधली गेली आहे.
- कट्टर मोदी विरोधक
रघुराम राजन हे कट्टर मोदी सरकार विरोधी अर्थशास्त्रज्ञ आहेत. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांविरुद्ध ते सातत्याने टीका करतात. मोदी सरकारने औद्योगिक उत्पादनाच्या मागे न लागता सेवा क्षेत्रावर भर द्यावा. कारण चीनशी स्पर्धा करणे भारताला शक्य नाही, अशी मते रघुराम राजन यांनी राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमधल्या चुका काढण्यात ते बाहेरून आघाडीवर राहिले. मात्र, आता राज्यसभेत शिरकाव करून थेट मोदी सरकारवर शरसंधान साधनांची तयारी रघुराम राजन यांनी चालवल्याचे दिसत आहे. म्हणूनच त्यांनी मातोश्री मध्ये जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची राजकीय वर्तुळात अटकळ बांधली गेली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.