Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मम्मी-पप्पा मला माफ करा' JEE ची तयारी करणाऱ्या निहारिकाच्या पत्राने सगळेच रडले

'मम्मी-पप्पा मला माफ करा' JEE ची तयारी करणाऱ्या निहारिकाच्या पत्राने सगळेच रडले

कोटा : राजस्थानमधल्या कोटा शहरातून आणखी एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे. कोटा शहरात जेईई मेन परीक्षेची तयारी करत असलेल्या 12वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. निहारिका सिंह असं तिचं नाव आहे. जेईई मेनचा पेपर 30 जानेवारीला होणार होता. त्याआधीच तिने जीवन संपवलं. ही घटना बोरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या शिवमंदिर 120 फूट रोडवर घडली.

बोरखेडा पोलीस स्टेशनचे एएसआय रेवतीरमन यांनी सांगितलं, की शिवमंदिर 120 फूट रोड बोरखेडा इथले रहिवासी विजय सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांची मुलगी निहारिका ही 18 वर्षांची होती व बारावीत शिकत होती. तिचा जेईई ॲडव्हान्सचा पेपर मंगळवारी होणार होता. तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला एमबीएस रुग्णालयात नेण्यात आलं; पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अभ्यासामुळे ती तणावाखाली होती, असं कुटुंबीयांनी सांगितलं. मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. कुटुंबीयांच्या रिपोर्टच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.


आत्महत्येपूर्वी निहारिकाने सुसाइड नोट लिहून ठेवली होती. 'मम्मी, पप्पा, मी जेईई करू शकले नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे, मी लूजर आहे, मी चांगली मुलगी नाही. मम्मी पप्पा मला माफ करा," असं त्यात लिहिलं होतं. तिचा चुलत भाऊ विक्रम याने मीडियाला सांगितलं, की 'निहारिका तीन बहिणींमध्ये सर्वांत मोठी होती. त्यांचे वडील विजय बँकेत गनमॅन आहेत. विजय सकाळी ड्युटीसाठी निघाले, निहारिका दुसऱ्या मजल्यावर तिच्या खोलीत अभ्यास करत होती. घरातले इतर सदस्य खाली होते. सकाळी दहाच्या सुमारास आजीने खोलीचा दरवाजा ठोठावला. निहारिकाने दार उघडलं नाही. आजीने ओरडून सर्वांना बोलावलं आणि आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा निहारिका फासावर लटकलेली दिसली.'


तणावाखाली होती निहारिका

निहारिका हुशार होती; पण गेल्या वर्षी तिला 12वीमध्ये कमी गुण होते. त्यामुळे ती पुन्हा 12वी आणि JEE ची तयारीही करत होती. तिची जेईई मेन परीक्षा 30 जानेवारीला होती. परीक्षेमुळे ती खूप तणावाखाली होती. ती रोज 6-7 तास अभ्यास करायची. तिचे ऑनलाइन क्लासेसही सुरू होते. ती अनेकदा अभ्यासात व्यग्र असायची. दरम्यान, कोटामध्ये आठवडाभरात विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी NEET ची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने 23 जानेवारीला आत्महत्या केली होती. मोहम्मद जैद (19) हा उत्तर प्रदेशमधला मुरादाबादचा रहिवासी होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.