Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्हीही फोन Dark Mode ऑन करून वापरता; तब्येतीसाठी योग्य का अयोग्य?

तुम्हीही फोन Dark Mode ऑन करून वापरता; तब्येतीसाठी योग्य का अयोग्य?

मुंबई : मोबाइल हा आपल्या आयुष्याचा अनिवार्य भाग झाला आहे, हे आता कोणीही नाकारण्याचं कारण नाही. मोबाइल कंपन्यांकडून ग्राहकांचा मोबाइल वापर सुखद व्हावा, त्यांच्या प्रायव्हसीचं उल्लंघन होऊ नये यासाठी नवनवीन अपडेट आणले जातात. तसाच एक अपडेट म्हणजे डार्क मोड. तुम्हीही डार्क मोडचा नियमित वापर करता का? ते योग्य आहे की अयोग्य? त्याचा तुमच्या तब्येतीवर काही परिणाम होण्याची शक्यता असते का? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

आपल्या आजूबाजूला मोबाइल फोन वापरणारे किती तरी जण डार्क मोडमध्ये मोबाइल वापरतात. त्यामुळे फोनचा लाइट आणि ब्राइटनेस कमी होतो. स्क्रीन बॅकग्राउंडही काळा होतो. तुम्हीही किती तरी वेळा हा डार्क मोड तुमच्या फोनमध्ये वापरत असाल. काही जणांच्या फोनमध्ये ऑटोमेटिक डार्क मोड ऑन होतो. संध्याकाळनंतर किंवा मोबाइल घेऊन एखाद्या अंधार असलेल्या भागात गेल्यानंतर डार्क मोड ऑटो ऑन होतो.

काही रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, डार्क मोडमध्ये फोन वापरणं शरीरासाठी चांगलं मानलं जातं. फोन डार्क मोडमध्ये ठेवून वापरला असता मोबाइलची बॅटरी वाचते. साहजिकच तो पुन्हा पुन्हा चार्ज करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या विजेची बचत होते. डार्क मोडमध्ये फोन वापरला, तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊ या. मोबाइल फोन डार्क मोडमध्ये वापरला असता डोळ्यांवर येणारा ताण कमी होतो. तुम्हाला कामाच्या निमित्ताने खूप वेळ मोबाइलमध्ये डोकं घालून बसावं लागत असेल, तरी डार्क मोडमुळे डोळे थकण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे डोळे चांगले राहतात. त्यांना कमीत कमी इजा होते.


फोनवर काही बघायचं असेल तर लाइट लागतेच. ती डोळ्यांवर पडली तर त्याचा परिणाम जाणवतो. संध्याकाळनंतर किंवा रात्रीच्या काळोखातही लाइट तीव्र असेल तर त्रास होतो. अशा वेळी डार्क मोड सुरू ठेवला असता डोळ्यांना त्याचा कमीत कमी त्रास होतो. वाचण्यासाठी तुम्ही मोबाइल फोनचा वापर करत असाल तर त्यासाठी डार्क मोड ऑन ठेवणं हा उत्तम पर्याय आहे. टेक्स्ट आणि बॅकग्राउंड यांच्यामध्ये कमीत कमी कॉन्ट्रास्ट असल्यामुळे डोळ्यांना वाचण्याचा त्रास जाणवत नाही. त्यामुळे तुम्ही खूप वेळ वाचू शकता.

अर्थात डार्क मोडमध्ये फोनचा वापर हा अधिकाधिक व्यक्तींसाठी सकारात्मक अनुभव असला तरी त्याचे परिणाम व्यक्तीप्रमाणे वेगळे असू शकतात. त्यामुळे डार्क मोड तुम्हाला उपयोगी वाटतो की नाही हे वापरल्यानंतरच तुम्हाला कळू शकेल. त्याचा त्रास होत असेल तर फोनचा ब्राइटनेस तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कमी जास्तही करू शकता. डोळ्यांना त्रास जाणवत असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.