Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नसोहळ्यात अक्षतांसाठी तांदळाऐवजी फुलाच्या पाकळ्या वापरा, सांगलीतील चिकुर्डे ग्रामसभेत ठराव

लग्नसोहळ्यात अक्षतांसाठी तांदळाऐवजी फुलाच्या पाकळ्या वापरा, सांगलीतील चिकुर्डे ग्रामसभेत ठराव


एतवडे बुद्रुक : हिंदू धर्मियांनी विवाह सोहळ्यात अक्षता म्हणून तांदळाचा वापर बंद करावा, अन्नधान्याची नासाडी थांबवावी असा ठराव चिकुर्डे (ता. वाळवा) येथील ग्रामसभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच रणजित पाटील होते.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विविध अनुचित सामाजिक प्रथा, परंपरांबद्दल ग्रामसभेत चर्चा झाली. सरपंच पाटील यांनी लग्नसोहळ्यातील तांदळाच्या नासाडीचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले, देशात लाखो लोकांना एकाच वेळचे अन्न मिळत असल्याच्या अन्नधान्याची नासाडी करण्याचा अधिकार आपल्याला नाही. लग्नसोहळ्यात कित्येक किलो तांदूळ अक्षतांच्या स्वरुपात उधळल्या जातात. उपस्थितांच्या पायदळी तुडविले जातात. यामुळे अक्षतांचे पावित्र्यही नाहीसे होते. 

या स्थितीत अक्षतांऐवजी अन्य पर्यायांचा विचार हिंदू धर्मियांनी करावा. तांदळाचा सरसकट वापर बंद करावा. वधु-वराशेजारी उभे असणारे मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी अक्षता टाकाव्यात. अन्य उपस्थितींना टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करावा.

सरपंच पाटील यांच्या प्रस्तावाचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. चांगल्या परंपरा सुरु करण्यात चिकुर्डे गाव नेहमीच अग्रेसर असल्याच्या भावना व्यक्त केल्या. प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावेळी उपसरपंच अलका मिरजकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कृष्णात पवार, सोसायटीते अध्यक्ष बाबासाहेब खाेत, दौलत पवार, अशोक सरनाईक, बाबासाहेब मिरजकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

फुलांच्या पाकळ्यांचा वापर व्हावा

सरपंच पाटील म्हणाले, अक्षता म्हणून तांदळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचाही वापर करता येईल. यातून धान्याची नासाडी टळेल, शिवाय फुलांच्या वापराने फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळतील. लग्नासारख्या विविध सोहळ्यांतील अनुचित प्रथा, परंपरा बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी नेहमीच पाठबळ दिले आहे. तांदूळ न वापरण्याच्या आवाहनालाही प्रतिसाद मिळेल याचा विश्वास आहे. - रणजीत पाटील, सरपंच.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.