Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मणिपुरातून राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू

मणिपुरातून राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू

मणिपूरमध्ये भडकलेल्या हिंसाचारात लाखो लोकांनी खूप काही गमावले. मात्र येथील लोकांचे अश्रू पुसायला मोदी आजपर्यंत आले नाहीत. त्यांनी तुमचा हात हातात घेऊन तुम्हाला धीर दिला नाही. तुमच्या वेदना या त्यांच्या वेदना नाहीत. तुमचे दुःख हे त्यांचे दुःख नाही. कदाचित मोदी, आरएसएस आणि भाजपासाठी मणिपूर हे हिंदुस्थानातच नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. ही यात्रा पायी आणि बस अशा दोन्ही माध्यमातून होईल. यात्रेत लोकांना भेटणार, त्यांच्याशी बोलणार. मी 'मन की बात' नाही तर 'जन की बात' करणार, लोकांच्या व्यथा ऐकणार, असा सणसणीत टोलाही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला आज रविवारी मणिपूरच्या थौबलमधून सुरुवात झाली.

यात्रेच्या सुरुवातीला त्यांनी येथील सभेला संबोधित केले.दिल्लीतून अनेक नेत्यांसह विमानातून राहुल गांधी इंफाळ येथे पोहोचले. दाट धुक्यामुळे त्यांचे विमान इंफाळमध्ये उतरण्यासाठी बराच विलंब झाला. त्याबद्दल राहुल गांधी यांनी येथील लोकांची माफीही मागितली. थौबल यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच खोंगजोंग येथील शहीद जवानांच्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन अभिवादन केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. मणिपूरमधील वांशिक हिंसाचार संपवून येथे शांतता नांदेल आणि लोकांमध्ये सुसंवाद घडेल असे प्रयत्न करण्याचे आश्वासनही राहुल गांधी यांनी यावेळी दिले. मणिपूरमधील लोकांना कोणत्या बिकट परिस्थितीतून जावे लागले, त्यांचे दुःख काय आहे हे मी जाणतो, असेही राहुल म्हणाले.

राहुल यांच्याबरोबर काँग्रेस नेते अशोक गेहलोत, सचिन पायलट, दिग्विजय सिंह, सलमान खुर्शीद, आनंद शर्मा, राजीव शुक्ला हे नेतेही इंफाळ येथे पोहोचले. 11 दिवसांत उत्तर प्रदेशच्या 20 जिह्यांमध्ये 1,074 किलोमीटरचा प्रवास करण्यात येईल. यादरम्यान अमेठी, रायबरेली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसी येथेही लोकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात येईल.

…म्हणून मणिपूरमधून यात्रेला सुरुवात

निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे पायी चालण्याबरोबरच बसने यात्रा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही यात्रा कुठून सुरू करायची हा प्रश्न होता. पण भाजपने मणिपूरमध्ये द्वेषाचे राजकारण सुरू केले त्या मणिपूरमधूनच यात्रेला सुरुवात होऊ शकते असे मी ठामपणे सांगितले, असे राहुल गांधी म्हणाले.


29 जूननंतर मणिपूर राहिलेच नाही

2004 नंतर मी पहिल्यांदा एका अशा प्रदेशात गेलो जेथील प्रशासन आणि पायाभूत सोयीसुविधांचे जाळे सर्व काही उद्ध्वस्त झालेले आहे. ज्याला आपण मणिपूर म्हणायचो ते मणिपूर आता राहिलेलेच नाही. राज्याच्या कानाकोपऱयात द्वेष पसरलाय. लाखो लोकांचे नुकसान झाले. भाऊ-बहीण, माता-पिता डोळय़ादेखत मारले गेले, पण आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपुरात तुमचे अश्रू पुसायला मोदी आले नाहीत, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

'मोहब्बत की दुकान' पोस्टर लावलेल्या बसमधून यात्रा

राहुल गांधी बसमधूनही 'भारत जोडो न्याय यात्रा' करणार आहेत. त्यांच्या बसवर मागच्या बाजूला 'मोहब्बत की दुकान' असे लिहिलेले भव्य पोस्टर लावण्यात आले आहेत. या बसवर मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चित्रे काढण्यात आली आहेत.

यात्रेत कमी बोलायचो, जनतेचे अधिक ऐकायचो

'भारत जोडो' यात्रेत रोज सात ते आठ तास चालायचो. यावेळी मी कमी बोलायचो, जनतेचे अधिक ऐकायचो. शेतकरी, मजूर, दुकानदार, महिला, तरुण यांचे ऐकायचो आणि हेच यात्रेचे लक्ष्य आहे. हिंदुस्थानचे पुढील व्हिजन हिंसेचे, द्वेषाचे, हुकूमशाहीचे नाही तर सौहार्द, एकता, समानता आणि बंधुभावाचे असेल, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

केवळ मतांसाठी ईशान्येकडील राज्यांचा वापर - मल्लिकार्जुन खरगे

ईशान्येकडील राज्यांचा मोदी सरकारकडून केवळ मतांच्या राजकारणासाठी वापर केला जात आहे. येथील लोकांच्या वेदनांवर साधी फुंकर घालण्याचे कामही मोदी सरकारने केले नाही, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यांना समुद्रकिनारी फिरण्यासाठी आणि समुद्राच्या पोटात जाऊन भ्रमंती करण्यासाठी वेळ आहे, पण मणिप्tैरमधील लोकांसाठी नाही. भाजप धर्म आणि राजकारण यांची भेसळ करत असून लोकांच्या श्रद्धेशी खेळ सुरू आहे. भाजपवाल्यांच्या मुखात राम आहे, परंतु प्रत्यक्षात ते हातात शस्त्र घेऊन फिरत आहेत, असा घणाघातही त्यांनी मोदी सरकारवर केला. राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू केल्याचेही खरगे म्हणाले.

'भारत जोडो न्याय यात्रे'त तब्बल 6 हजार 713 किलोमीटर अंतर कापण्यात येणार आहे. 100 लोकसभा मतदारसंघ आणि 337 विधानसभा मतदारसंघ तसेच 110 जिह्यांमध्ये कधी पायी तर कधी बसने फिरून राहुल गांधी जनतेशी संवाद साधणार आहेत व त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. मणिपूर, नागालॅण्ड, अरुणाचल, आसाम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र असा यात्रेचा प्रवास. यात्रेचा समारोप 67 दिवसांनंतर 20 मार्च रोजी मुंबईत होणार.

अन्यायाविरुद्ध लढत राहणार

देशात भयंकर अन्याय सुरू आहे. जनता त्रासली आहे. या अन्यायाविरुद्ध लढत राहणार… पुढे चालत राहणार… न्याय मिळेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार अशी गर्जना राहुल गांधी यांनी केली. द्वेष, हिंसाचार आणि एकाधिकारशाहीला कोणताही थारा असू नये. समानता, बंधुभाव आणि सद्भावना यातून समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्राची निर्मिती हेच आमचे व्हिजन आहे, असे राहुल गांधी म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.