Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'छगन भुजबळ तुमचा बाप...', राजीनाम्याच्या मागणीनंतर पडळकर भडकले

'छगन भुजबळ तुमचा बाप...', राजीनाम्याच्या मागणीनंतर पडळकर भडकले

ओबीसी मेळाव्याचं बीडमध्ये आयोजन करण्यात आलं आहे, त्यानिमित्त राज्यातले ओबीसी नेते बीडमध्ये येत आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा होत आहे, त्याआधी मराठा समाजाचे आंदोलक भुजबळांविरोधात आक्रमक झाले आहेत.

मराठा आंदोलकांकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या मागणीवर भाजप आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे. 'भुजबळ तुमचा बाप आहे, उगाच विरोधातील घोषणा देऊन काय होणार आहे?' असं प्रत्युत्तर पडळकर यांनी दिलं आहे.

या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झालेत. सभेपूर्वी छगन भुजबळ मुर्दाबाद, भुजबळ चले जावच्या घोषणा देण्यात आल्या. भुजबळ संवैधानिक पदावर असून त्यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष करू नये अशी मागणी या मराठा आंदोलकांनी केली. ओबीसींची सभा घ्यायची असेल तर त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि मग सभा घ्यावी असं आवाहन या आंदोलकांनी केलं. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

'ओबीसी समाज दहशतीखाली आहे, भीतीखाली आहे. जी भीती जाळपोळीमुळे निर्माण झाली होती ती नाहीशी करण्याचा प्रयत्न आम्ही या सभेच्या माध्यमातून करणार आहोत. ओबीसी एकवटून काहीतरी निर्णय होईल, काहीतरी त्यांच्या हिताच्या गोष्टी घडतील,' असा विश्वासही पडळकर यांनी व्यक्त केला.

बीडमध्ये ओबीसी मेळावा होत असूनही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सभेला का येणार नाहीत? असा सवालही पडळकर यांना विचारण्यात आला. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मोठे नेते आहेत. एखाद्या सभेला नाही आले म्हणून त्यांचं काम कमी होत नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आक्रमक झाला आहे. ही कुणबी प्रमाणपत्र द्यायला ओबीसी समाजाकडून विरोध केला जात आहे. यानंतर बीडमध्ये हिंसक आंदोलन झालं. बीडमधल्या नेत्यांच्या घरं आणि कार्यालयावर हल्ले करण्यात आले होते. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले, यामुळे भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातला वाद विकोपाला गेला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.