Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुशीलकुमारजी, ‘ऑफर’ धुडकावलीत... अभिनंदन!- मधुकर भावे

सुशीलकुमारजी, ‘ऑफर’ धुडकावलीत... अभिनंदन!- मधुकर भावे




सुशीलकुमार शिंदेसाहेब,   तुमचे अभिनंदन.... एक वेळ नाही तर दहा वेळा...  भाजपाने तुम्हाला त्यांच्या पक्षात येण्याचे ‘आमंत्रण’ दिले... प्रणितीलासुद्धा दिले. तुम्ही दोघांनीही ते आमंत्रण धुडकावून लावलेत... तुम्हाला हे ‘आमंत्रण’ (ऑफर) का आले? कारण उघड आहे. तुमच्या मागे ‘ईडी’ लावण्याएवढे खुसपटसुद्धा त्यांना मिळाले नसेल... जिथं ‘ईडी’लावून काम होईल, तिथे ई. डी. .... ई. डी. लावूनही बधत नाहीत... त्यांना तुरुंगाची भिती दाखवायची... पवारसाहेब म्हणालेच आहेत... ‘ई.डी.चा धाक दाखवून फोडाफोडी सुरू आहे.’ आणि हे वाक्य त्यांनी सोलापूरातच सांगितले. तुम्हाला आमंत्रणही दिले. जिथं जमीन भुसभूशित लागेल तिथे कोपराने खणायचे... जिथे जमीन कठीण असेल तिथे हातातील यंत्रणांचा वापर करायचा... महाराष्ट्रातील भाजपाची आजची स्थिती अशी आहे की, त्यांच्याकडे दोन-पाच हजार माणसे सभेला जमतील असा एकही नाव घेण्यासारखा नेता- वक्ता त्यांच्याकडे नाही. सर्रास मोदी आणि शहा यांना महाराष्ट्रभर फिरावे लागत आहे.

विधानसभेच्या निवडणुकीला पंतप्रधान सहसा फिरत नाहीत. पण, महाराष्ट्राच्या भाजपाचे राजकीय दारिद्र्य आता उघडे पडल्यामुळे पंतप्रधानांनाच सगळे अंगावर घ्यायला लागले आहे. तुम्हाला जी ऑफर आली ती त्यामुळेच... शरद पवारसाहेब बधत नाहीत... आता तुम्हीही सत्तेच्या प्रलोभनाचे झुरळ झटकून टाकलेत... आणि भाजपाचे सरकारी यंत्रेणेचा सर्रास वापर करण्याचे त्यांचे धोरण उघडले पाडलेत... यादी तपासा महाराष्ट्रात त्यांनी कोणा कोणाला ‘पावन’ करून घेतले. देशाचे पंतप्रधान स्वत: ज्यांच्यावरती आदल्या दिवशी ७० हजाराच्या घोटाळ्याची उघड चर्चा करतात... त्या पक्षाला ‘करप्ट’ पार्टी म्हणतात... त्यांचा त्यावेळचा विरोधी पक्षनेता लगेच उपमुख्यमंत्री म्हणून भाजपाला चालतो... महाराष्ट्रात तरी भाजपामध्ये सरकार चालवण्याच्या कुवतीची आणि आवाक्याची माणसं नाहीत...  त्यामुळे सुशीलकुमार यांच्यासारख्या सभ्य, सुसंस्कृत, सौजन्यपूर्ण आणि  खूप काही करून दाखवण्याची ताकद असलेल्या नेत्याला आमंत्रण.... तुम्ही त्याचा जाहीरपणे स्फोट करून टाकलात... शिवाय तो इतक्या शांतपणे की, भाजपाची राजकीय लबाडी तुमच्या त्या शांतपणे केलेल्या निवेदनाने एखाद्या फटाक्यासारखी महाराष्ट्रभर वाजून गेली. दोन वाक्यच तुम्ही बोललात.... त्याच्या पुढचे वाक्य महत्त्वाचे आहे की, ‘मी ज्या काँग्रेस पक्षात आहे, ते माझे घर आहे... काँग्रेस माझ्या रक्तात आहे... घर सोडून जाणार नाही...’  

वसंतदादांनी राजकीय सन्यास घेतला होता... त्याला आता ४० वर्षे झाली... १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. दादा सन्यासाची वस्त्रे खाली उतरवून पुन्हा पक्षात आले. आणि छान वाक्य सांगून गेले... ‘घराला आग लागली आहे... घरात कसा बसू...’ तुम्हीही नेमकं तेच बोललात... काँग्रेसने तुम्हाला एवढे काही दिले आहे की, तुम्ही कृतज्ञा आहात.  तुम्ही अनेक विक्रम मोडलेत... नरसिंहराव पंतप्रधान असताना मंत्रीपद सोडून तुम्हाला काँग्रेसने  भारतातील सात राज्यांचे जनरल सेक्रेटरी  म्हणून पाठवले.  मनमोहनसिंग पंतप्रधान असताना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार तु्म्ही होतात... तुम्ही एकमेव असे आहात की, ज्यांना २००४ साली राज्यपाल केले गेले त्याच नेत्याला २०१२ साली केंद्रात गृहमंत्रीपद दिले गेले.  असे यापूर्वी कधीही घडलेले नाही. मंत्र्याचा राज्यपाल होतो... पण, राज्यपालाचा गृहमंत्री या देशात कधीच झाला नाही... तो विक्रमही तुमच्याच नावावर आहे...  तुम्ही काँग्रेसमध्ये ज्या परिस्थितीत आलात... पोलीस खात्यातील नोकरी सोडून आलात... विधानसभेचे आमदारपद तुम्हाला मिळेल, असे आश्वासन काँग्रेसने तुम्हाला दिले... पण, काही अडचण आली. त्या निवडणुकीत तिकीट मिळाले नाही. पण, नशिब तुमच्या सोबत होते. त्याच मतदारसंघात  (करमाळा) पोटनिवडणूक लागली. तुम्हाला तिकीट मिळाले... तुम्ही निवडूनही आलात... पोटनिवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेसचे मुख्यमंत्री कधीही जात नव्हते. वसंतराव नाईक मनाने फार मोठे... ते तुमच्या प्रचाराला आले. प्रचारातच त्यांनी सांगून टाकले की, ‘सुशीलकुमार यांना निवडून द्या... बाकीचे माझ्यावर सोपवा...’ आपण निवडून आलात... तुम्हाला लगेच राज्यमंत्री केले गेले... जे-जे. खाते तुमच्याकडे आले ते तुम्ही प्रभावीपणे सांभाळलेत... तुमचे लहाणपणापासूनचे सगळे जीवन कष्टाचे... शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या जातीला फारसे महत्त्व नाही, अशा उपेक्षित समाजात जन्माला येवूनही तुम्ही तुमच्या हातावरच्या रेषा बदलून दाखवता येतात, हे कष्टाने सिद्ध केलेत... ५० वर्षांत तुमच्या चेहऱ्यावरील हसू कधीही मावळले नाही. सदा सर्वप्रिय असे तुम्ही आणि विलासराव... तुमची मैत्रीही प्रख्यात... कोर्टात एक चपरासी म्हणून काम केलेला एक तरुण हिम्मत... जिद्द या जोरावर किती मोठा होतो, हे तुम्ही दाखवून दिलेत...  पक्षाशी तुम्ही नेहमी कृतज्ञा राहिलात... आणि तीच कृतज्ञाता भाजपाचे आमंत्रण धुडकावताना तुम्ही जाहीरपणे व्यक्त करून टाकलीत... हे सोपे नव्हते... आजचा काळ प्रलोभनांचा आहे. भले-भले त्या जाळ्यात फसले... कोणाला मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत... कोणी आपल्यावरील ‘तुरुंगवारी टळावी’, म्हणून सामील झाले आहेत... कारणे वेगळी-वेगळी... पण, सत्तेचा हव्यास सगळ्यांचा एकच... तुम्ही १९७४ पासून सत्ता पाहिली आहे. तुम्ही राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रात मंत्री, आंध्रचे राज्यपाल, नंतर देशाचे गृहमंत्री... तुम्हाला आमंत्रण देणारे भाजपावाले याच्यापेक्षा तुम्हाला काय देणार आहेत. आणि त्याचा लोभ तुम्हाला आहे कुठे? काँग्रेसने तुम्हाला इतके दिले त्याची कृतज्ञाता तुम्ही भरभरून व्यक्त केलीत... जाती-पातीच्या पलिकडचे राजकारण तुम्ही केलेत...

सोलापूर हा  लोकसभेचा सर्वसाधारण मतदारसंघ असताना तुम्ही त्या मतदारसंघातून तीनवेळा मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आलात...  जेव्हा केंद्रात भाजपाची सत्ता होती... पंतप्रधानपदी अत्यंत सुसंस्कृत, सभ्य, विरोधी पक्षाला सन्मानाने वागवणारे आदरणीय अटलबिहारी वाजपेयी होते... युनोला पाठवल्या जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळाचे वाजपेयीजींनी तुम्हाला नेते केले. तुम्ही काँग्रेस पक्षाचे खासदार... पण, वाजपेयींचा पंतप्रधान म्हणून असलेला पोत उच्चदर्जाचा होता. त्यांच्या मनात दुष्टपणा नव्हता. गुजरातच्या भूकंपात वाजपेयीसाहेबांनीच शरद पवारसाहेबांना ‘अपत्ती आस्थापना’ (डिझास्टर मॅनेजमेंट)चे अध्यक्ष करून गुजरातला पाठवले. ती माणसं फार मनाने फार उंचीची होती. आताचे सगळेच काही वेगळे आहे. तुम्ही त्या मोहजालात फसला नाहीत आणि तुमचे राजकीय नाणं खणखणीतपणे वाजतेय हे तुम्ही दाखवून दिलेत... म्हणून तुमचे अभिनंदन... असाही एक नेता निघाला, जो भाजपच्या सत्तेमागे धावला नाही. तुम्ही राजकारणातील एवढं काही पाहिले आहे... ही सर्व माणसं तुमच्यापुढे खूप छोटी आहेत. फडणवीस, तावडे, शेलार यांची आणि तुमची कुठे बरोबरी होणार? तुम्ही कोसो मैल उंच आहात...  आता एक विनंती आहे... ज्या काँग्रेसचा विचार घेवून तुम्ही ठामपणे उभे आहात, तोच झेंडा खांद्यावर घेवून फक्त आणि फक्त २०२४ च्या शेवटच्या लोकसभा निवडणुकीसाठी तुम्हीच सोलापूरातून उभे रहा... मागच्यावेळच्या विजयी उमेदवाराने जातीच्या खोट्या दाखल्यांचे काय दिेवे लावले आणि सोलापूर कसे अंधारात गेले ते मतदार पाहात आहेत.

तुम्ही एकदा उभे रहा...

नक्की निवडून याल... हवा बदललेली आहे.  रामनामाचा कितीही जप झाला तरी... मंदिर पूर्ण होण्यापूर्वीच प्रतिष्ठापना झाली तरी.... ही घाई का आहे? हे मनापासून रामभक्त असलेल्या सर्वांना समजते आहे. २०१४ ला आणि २०१९ ला रामाची आठवण झाली नव्हती. आता बाकी सांगण्यासारखे काही नाही. म्हणून पुन्हा रामरायांना राजकारणात आणले गेले. निवडणूक झाली, की पुन्हा वनवासात पाठवून देतील... हे आजचे नाही आहे... १९६७ च्या निवडणुकीत याच भाजपाचा जो जनसंघ होता, त्या जनसंघाची घोषणा काय होती....

‘देश-धरम का नाता है..
गाय हमारी माता हैं...’

१९६७ साली निवणडणुकीत गायीचा वापर झाला. देशातील करोडो गायींना त्याचा त्यावेळी पत्ताही नसेल... गायींनाही वापरले... नंतर आली निवडणूक त्यात आली पवित्र गंगानदी... ती स्वच्छ करण्याच्या घोषणा झाल्या... त्यातून प्रेते वाहून गेलीत... नंतर राम मंदिराच्या विटा वाहण्याचा कार्यक्रमही निवडणुकीचाच भाग ठरला. आता पूर्ण बांधून न झालेल्या राममंदिर पुन्हा प्रचारासाठी वापरले जाणार...  ज्याचा-ज्याचा उपयोग आहे, ते वापरायचे... वापूरन नंतर बाजूला ठेवायचे... असा हा अनेक वर्षांचा कार्यक्रम. नवीन लोकसभा भवन बांधले... उद्घाटनाला महामहिम राष्ट्रपतींनाही आमंत्रण नाही. राममंदिर पूर्णपणे उभे होण्यापूर्वी रामलल्लाची प्रतिष्ठापना... त्याचे आमंत्रण लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना नाही. देशातील चार पीठांच्या शंकराचर्यांचा विरोध.  कारण काय तर... शंकराचार्यांच्या मते ‘मंदिर पूर्ण होण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठापना शास्त्रीय नाही.’ पण, सरकारच्या लेखी शास्त्रीय-अशास्त्रीय हा विषय त्यांच्या उपयोगावर आहे.  आज जे उपयोगी ते सगळे शास्त्रीय... आता शंकराचार्यांचे मतही धुडकावले गेलेच आहे...  कारण ते पाठींबा देत नाहीत.

प्रभू रामचंद्रांबद्दलची श्रद्धा देशात कोणा एका पक्षाची किंवा राजकारण्यांची मक्तेदारी नाही.  आजही ग्रामीण भागातील सकाळ  ‘राम-राम’ या शब्दांनीच होते. ज्या महात्मा गांधीजींना गोळ्या घालून विकृत विचारसरणीने मारले त्या महात्माजींच्या समाधीवर त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला शेवटचा शब्द... ‘हे राम’... हाच होता. आणि हाच ‘राम खरा’ आहे. बाकी तसा विचार करायचा झाला तर भाजपा आज ज्या पद्धतीने पक्षांतरे करून घेत आहे त्याची सुरुवात रामायणातच झालेली आहे.  बिभिषण महाराज रावणाचा पक्ष सोडून रामरायांच्या पक्षात आले.... हा जगातील पहिला पक्षबदल... आणि एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यावर, आलेल्या माणसाला काहीतरी द्यावे लागते... म्हणून रामरायांनी उदार मनाने बिभिषण महाराजांना लंकेचे राज्य दिले...  पण, ज्या रावणाशी प्रभू रामचंद्रांचे युद्ध झाले त्या रावणाला मारल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणाले... ‘लक्ष्मणा... आता रावणाचे श्राद्ध आपल्यालाच करावे लागेल... कारण मृत्यूनंतर वैर संपते...’ प्रभू रामचंद्रांची ही उदात्त शिकवण भारतीयांना अवगत आहे. भाजपवाल्यांनी ती शिकून घ्यावी... म्हणजे ७२ वर्षांपूर्वी खून झालेले गांधीजी ५५ वर्षांपूर्वी मृत्यू पावलेले नेहरू यांच्यावरील जहरी टीका रामरायांचे भक्तच करीत आहेत. रामापासून त्यांना अजून बरेच काही शिकण्यासारखे आहे. प्रभू रामचंद्र हे केवळ निवडणुकीपुरते नाहीत.  एवढे लक्षात घेतले तरी खूप झाले...

... तर सुशीलकुमारजी, तुम्ही पुन्हा उभे रहा... या निवडणुकीत खूप काही मुद्द्यांची चिरफाड करता येईल. तुमचा दोनदा पराभव झ्राला... त्याने काही फरक पडत नाही... तुमच्या पराभवानंतर संपूर्ण सोलापूर मतदारसंघाचाच पराभव झालेला आहे. आणि सोलापूर किती मागे गेले आहे, हे मतदार पाहात आहेत. आमदार म्हणून प्रणिती चांगलेच काम करीत आहे. शिवाय तिला पुढे खूप संधी आहे... आजच्या राजकीय स्थितीत काँग्रेसला तुमची गरज आहे. तुमच्या सोबतचा अनुभव कामाला येण्यासारखा आहे. आणि मतदारही आता पूर्वीच्या उमेदवारांना कंटाळलेले आहेत. म्हणून फक्त एकदाच...

सुशीलकुमारांनी ऑफर धुडकावली... मी एका पत्रकार मित्राला म्हटले... ‘अरे, सुशीलकुमारांच्या वक्तव्यावर तुम्ही काहीच लिहित नाही...? सत्तेची ऑफर धुडकावणे सोपे आहे का?’ तो हळूच म्हणाला, ‘सर, लिहू शकतो... पण...’ मी म्हटले, ‘पण, काय..’ तो म्हणाला, ‘कोणाला सांगू नका... आम्हाला असे काही लिहायला बंदी आहे...’आता बोला... कोणाच्या नळावर कोण पाणी भरत आहे....?
सध्या एवढेच...9869239977

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.