तक्रारीची प्रत न मिळाल्याने निखिल वागळेंनी मुंबई पोलिसांसाठी वापरला 'नालायक' शब्द
तक्रारीची प्रत न मिळाल्याने निखिल वागळेंनी मुंबई पोलिसांसाठी वापरला 'नालायक' शब्द; पोलिसांनी पोस्ट करत म्हटलं...
तक्रार दाखल करून 48 तास उलटूनही तक्रारीची प्रत मिळाली नसल्याचा आरोप पत्रकार निखिल वागळे यांनी शुक्रवारी मुंबई पोलिसांवर केला.
वागळे यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मुंबई पोलीस नालायक आहेत. तक्रारीची पोचही 48 तासात नाही. माहीम पोलीस स्टेशन तर भंगारात विकलं पाहिजे. आमेन.' दरम्यान, त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, मुंबई पोलिसांच्या अधिकृत खात्याने वागळे यांचे आरोप फेटाळून लावले असून त्यांना योग्य भाषा वापरण्याचा सल्ला दिला आहे.
तथापी, मुंबई पोलिसांनी वागळे यांच्या या पोस्टला प्रत्यूत्तर दिलं आहे. या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी सांगितले आहे की, 'आम्ही सखोल माहिती घेतली आहे. आपल्या तक्रारीवरून दि. 24/01/24 रोजी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून आपणास कळविण्यात आलेले आहे. अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपण भेटण्यास नकार दिला. तक्रारीची प्रत पोलीस ठाणे येथून प्राप्त करून घेण्याबाबत सुध्दा आपणास कळविण्यात आलेले आहे. व्यक्तीविशेषसाठी घरपोच प्रत पोहचविण्याचे प्रावधान नाही. आपण शिक्षित आहात, संयमित भाषा वापरणे अपेक्षित आहे.'
पोलिस विभागाने वागळे यांना पोलिस ठाण्यातून तक्रारीची प्रत घेण्यास सांगितले आहे. 'तक्रारची प्रत एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या घरी पोहोचवण्याची कोणतीही तरतूद नाही,' असंही पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच वागळे यांच्या पोस्टच्या भाषेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे की, त्यांनी 'सभ्य' शब्दांची निवड करावी कारण ते 'सुशिक्षित' व्यक्ती आहेत.
वागळे विरुद्ध मुंबई पोलीस -
23 जानेवारी रोजी वागळे म्हणाले होते की, काही उपद्रवी व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना प्रतिसाद न दिल्याचा आरोप केला होता. मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष पूर्णपणे निरुपयोगी आहे. अतिशय उद्धट. उच्च अधिकारी गेल्या 2 दिवसांपासून योग्य प्रतिसाद देत नाहीत. नागरिक, पत्रकार हतबल आहेत. कालपासून काही उपद्रवी घटक मला त्रास देत आहेत, असं वागळे यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.निखील वागळे यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, मुंबई पोलिसांनी प्रत्युत्तर देत म्हटलं होत की, 'प्रिय निखीळ वागळे, तुम्हाला झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपया त्वरित कारवाईसाठी तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनला या प्रकरणाची तक्रार करा. तुमची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि आम्ही तुम्हाला खात्री देतो की तक्रार योग्यरित्या नोंदवली जाईल.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.