मिरजेतील एमआयआयच्या कथित पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
मुंबई : कुर्ला येथे राहणाऱ्या एका २२ वर्षांच्या विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला धमकी देण्यात आल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मिरज येथील एमआयआयचा कथित पदाधिकारी असलेला महेश महादेव कांबळे (५०) याच्याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
पीडित महिलेला नोकरीसह आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे आमिष दाखवून महेश कांबळेने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेसाठी विलेपार्ले पोलिसांची एक टीम मिरजेकडे रवाना झाली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेणुका बुवा यांनी दुजोरा दिला असला, तरी याबाबत माहिती देण्यास नकार दिला. २२ वर्षांची पीडित महिला गेल्या चार महिन्यांपासून कुर्ला येथे तिच्या एका मैत्रिणीसोबत राहते. जून २०१९ मध्ये तिचा एका तरुणासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर ती पतीसोबत सांताक्रूज येथे राहण्यासाठी आली होती, तिचा पती एका सॅलोनमध्ये नोकरी करतो.
तिथेच तिची शादाब नावाच्या एका तरुणासोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. ते नेहमी एकमेकांच्या संपर्कात होते. शादाबने तिची ओळख महेश कांबळेशी करून दिली होती. महेश हा मिरज येथे राहत असून, आयएमआय पार्टीचा वरिष्ठ पदाधिकारी आहे. त्याची अनेक राजकीय नेत्यांशी ओळख असून, तो तिला चांगली नोकरी मिळवून देईल, तिला आर्थिक स्थैर्य मिळवून देईल, असे शादाबने सांगितले होते. दि. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी ती शादाबला भेटण्यायसाठी गेली होती. त्यानंतर ते टॅक्सीतून विलेपार्ले येथील राष्ट्रीय विमानतळावर आले होते. तिथेच तिची महेश कांबळेशी ओळख झाली होती. महेश हा स्वतःच्या कारमधून तिथे आला होता. त्यानंतर ते तिघेही विलेपार्ले येथील सहार रोड, पीएनटी कॉलनीजवळ आले होते.
या ठिकाणी आल्यानंतर शादाब हा काही महत्त्वाचे काम आहे, असे सांगून निघून गेला. त्यानंतर महेश हा तिच्यासोबत पीएनटी कॉलनीजवळील एका निर्जनस्थळी आला. रात्री पावणेदहा वाजता त्याने तिच्यावर जबदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिला धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने तसे केले नाही, तर तिचे आयुष्य बर्बाद करण्याची धमकी देत त्याची ओळख वरपर्यंत आहे. ती त्याचे काही वाईट करू शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर त्याने तिच्यावर जबदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता.
हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाही तर परिणाम वाईट होतील, अशी धमकी देत त्याने तिला सोडून दिले होते. बदनामीसह महेश कांबळेच्या राजकीय दबावामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही; मात्र महेशकडून झालेल्या प्रकारानंतर तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने १८ जानेवारीला विलेपार्ले पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी महेश कांबळेविरुद्ध लैंगिक अत्याचारासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असून, त्याची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. महेशच्या अटकेसाठी विलेपार्ले पोलिसांचे टीम मिरजेकडे रवाना झाली आहे. लवकरच त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.