कार्ला येथील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे यांचा मेणाचा पुतळा
कार्ला गावातील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे यांचा मेणाचा पुतळा बनवला आहे. एका मराठा तरुणाने हा पुतळा साकारला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने पायी निघालेले मनोज जरांगे पाटील उद्या (दि.24) कार्ला फाटा येथूनच पुढे जाणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी येथील वॅक्स म्युझियममध्ये त्यांचा मेणाचा पुतळा तयार झाला आहे. अतिशय हुबेहूब अशीही मेणाची ही प्रतिकृती बनवण्यात आली आहे.
याकरिता मनोज जरांगे पाटील यांच्या शरीर यष्टीचे मोजमाप घेऊन त्यानुसारच ही पाच फूट सात इंच उंचीची मेणाची प्रतिकृती या ठिकाणी अशोक म्हाळसकर यांनी अवघ्या तीन महिन्यांमध्ये तयार केली आहे.
मनोज जरांगे पाटील याठिकाणी भेट देऊन आपला मेणाचा पुतळा पाहणार का याबाबत अजून काही स्पष्टता नसली तरी सर्वांना उत्कंठा निर्माण झाली आहे. याविषयी बोलताना अशोक म्हाळसकर व त्यांचा मुलगा ऋषी म्हाळसकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मोठी लढाई लढत आहे.अशा या संघर्ष योद्धाचे स्मरण कायम रहावे याकरिता सदरचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. ही सर्व सकल मराठा समाजासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. हा पुतळा साकारण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, अशी भावना म्हाळसकर यांनी व्यक्त केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.