Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजारामबापूंच्या देखण्या पुतळ्याचे सांगलीत लोकार्पण - मधुकर भावे

राजारामबापूंच्या देखण्या पुतळ्याचे सांगलीत लोकार्पण - मधुकर भावे

सांगलीच्या स्टेशन चौकात राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ््याचे लोकार्पण झाले. गेल्या ५० वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणात, ६ फूट उंचीचे, गोरेपान, खादीचे पांढरे शुभ्र कपडे, टोकदार गांधी टोपी, स्वच्छ टापटीपित राहणारे, आयुष्यातील क्षण आणि क्षण झपाटल्यासारखे काम करणारे राजारामबापू यांचा हा पुतळा. बापूंच्या ४० व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला शरद पवारसाहेबांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले. सांगली शहरात बापूंचा पुतळा नव्हता. वसंतदादा आणि बापू हे जुना सातारा जिल्ह्यातील आणि नंतर सांगली जिल्ह्यातील नेते. दोघेही दिग्गज... दोघांचीही सामाजिक कामे आभाळाएवढी... तिकडे सातारा जिल्ह्यात बाळासाहेब देसाई... आणि या सर्वांचे गुरू यशवंतराव चव्हाण. असा जिल्हा महाराष्ट्रात सापडणे अवघड आहे. बापू या सगळ्यांमध्ये काहीसे वेगळे.  बापूंचे  अवघ्या ६४ व्या वर्षी अकाली निधन झाले. ६४ हे काही जाण्याचे वय नाही. पण, जवळपास ४० वर्षे बापू राब-राब राबलेत... महाराष्ट्रात पदयात्रा करणारा हा एकमेव नेता. १४ महिन्यांत सहकारी साखर कारखाना उभा करणारा हा एकमेव नेता.   त्यांचा मूळ तालुका वाळवा. ५०-६० वर्षांपूर्वी हा वाळवा तालुका हाणामारी याकरिता कुप्रसिद्ध... बापू लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले... आणि बापूंनी १९४५ साली जो विकास कामांचा झपाटा सुरू केला... त्याने केवळ सातारा जिल्हा नव्हे तर त्यावेळचे मुंबई सरकारही हादरले. बापूंच्या आगोदर लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते बाळासाहेब देसाई. त्यांनीही त्यांचा काळ गाजवला. बापूंनी लोकल बोर्ड आणि स्कूलबोर्ड दोन्हीही संस्थांचे अध्यक्षपद सांभाळले. एका-एका गावात चार-चार दिवसांत शाळा उभ्या केल्या. गावात जिथं खून-खराबा होत होता त्या गावातील मुलांच्या हातात पाटी-पेन्सील आली.  ज्या गावात आड (विहिर) नव्हते...  त्या गावात विहिरी खोदल्या गेल्या. बघता-बघता पिण्याच्या पाण्याच्या अडचणी संपल्या. आडाचे पाणी वर कसे काढायचे... बापूंनी आडांना रहाट लावले... दोन गावांत जायला रस्ते नव्हते... रस्ते केले... साकव  (लाकडी पूल) केले... लोकांचे प्रश्न समजून घ्यायला त्या काळात पदयात्रा केल्या. जिथं रात्र होईल तिथंच मुक्काम... महाराष्ट्रातील लोकजीवनात खेड्या-पाड्यांत चालत जाणारा बापूंएवढा दुसरा नेता नाही. शेवटी सातारा जिल्हा लोकलबोर्डाने बापूंची ही पायपीट बघून सर्वसाधारण सभेत ठराव केला की, अध्यक्षांसाठी जीप गाडी खरेदी करावी. त्या गाडीची किंमत होती १४ हजार रुपये. जीप खरेदी झाली... मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. त्यांच्यापर्यंत तक्रार गेली. ‘एका लोकलबोर्ड अध्यक्षाने एवढा खर्च करावा?’ सरकारने मुंबईहून चौकशी समिती पाठवली. समितीने पूर्ण माहिती घेतली आणि बापूंनी उभी केलेली विकासाची कामे पाहून समिती थक्क झाली. सरकारला अहवाल सादर झाला. मुंबई सरकारने निर्णय केला की, ‘सर्वच लोकल बोर्डांच्या अध्यक्षांना जीप गाडी देणे आवश्यक आहे.’ त्या काळात ज्या-ज्या अध्यक्षांना गाड्या मिळाल्या त्या राजारामबापू यांच्यामुळेच. बापूंचा लोकसंग्रह अफाट होता. गावागावांत बापूंनी कार्यकर्ते उभे केले. असे गाव नसेल जिथं बापूंचे चार-दोन कार्यकर्ते बापूंना सर्वस्व माननारे होते. बापू हे मूळचे वाळवा म्हणजे इस्लामपूरचे. पण, बापूंचे खरे प्रेम जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ या तालुक्यांवर. जुना सातारा आणि नंतरचा सांगली जिल्हा याचे सगळे चित्र बापूंनी पालटून टाकले. कवठेमहांकाळच्या दुष्काळी भागात बापूंनी कारखाना उभा करून दिला. नानासाहेब सगरे, पंडितराव जाधव या नेत्यांना बापूंनी शक्ती दिली. जत तालुक्यातील रामराव सावंत, बसवराज पाटील, अजित घोरपडे, मिरजमध्ये व्यकप्पा पत्की, शरद पाटील, खानापूरमध्ये लालासाहेब यादव, कराडमध्ये युनूस कच्ची, तासगावमध्ये हरिभाऊ खुजट, औरंगाबादमध्ये नामदेव गाडेकर आणि आजचे दिग्गज नाव असलेले डी. वाय. दादा पाटील हे मूळचे बापूंचेच कार्यकर्ते. 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सगळा पश्चिम महाराष्ट्र अक्षरश: पेटला होता. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त सहा आमदार निवडून आले. त्यात यशवंतराव चव्हाण (कराड), वसंतदादा पाटील (तासगाव), बॅ. जी. डी. पाटील (मिरज), बाळासाहेब देसाई (पाटण) आणि  शंकरराव बाजीराव पाटील (इंदापूर) आणि तिकडे निर्मलाराजे भोसले (अक्कलकोट)....  बापू अवघ्या ४०० मतांनी पराभूत झाले. मतदानाच्या दिवशी त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. बातमी पसरवली गेली की, बापूच गेले. पराभव झाल्याने बापूंचे काम थांबले नाही.  याच काळात म्हणजे १९५९ साली यशवंतराव चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बापूंची नेमणूक केली. अख्खा महाराष्ट्र काँग्रैसच्या विरुद्ध... १९५७ला बारामती मतदारसंघातून काँग्रेसचे केशवराव जेधे विजयी झाले होते. त्यांचे दु:खद निधन झाले.  पोट निवडणूक लागली. काँग्रेसने गुलाबराव जेधे यांना उमेदवारी दिली. बाूपू तेव्हा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष. बापूंची सगळ्यात मोठी परीक्षा होती. सगळा महाराष्ट्र काँग्रेस विरोधात.... एकप्रकारे पेटलेलाच... त्या अवघड परिस्थितीत बापूंनी बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून दिला... पंडित नेहरूंनीही बापूंचे अिभनंदन केले. त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्यालय पुण्यात होते. स. का. पाटील यांचा हे कार्यालय मुंबईत आणायला विरोध होता. बापूंनी तो विरोध हाणून पाडला. प्रदेश काँग्रेसचे मुख्य कार्यालय मुंबईत आणले. निर्णय घेण्यात बापू धडाडीचे होते. देशमुख आणि देशपांडे यांची इनामे रद्द करण्याचा निर्णयही बापू महसूल मंत्री असतानाच झाला आहे. खंडकरी शेतकऱ्यांना १४ हजार एकर जमीन देणारे बापूच आहेत. 

१९५७ च्या पराभवाचा वचपा काढून बापू १९६२ साली विधानसभेत निवडून आले. महसूल खात्याचे उपमंत्री झाले. वसंतराव नाईक यांनी त्यांना महसूलमंत्री केले. महसूलमंत्री म्हणून बापूंनी जी कामे केली त्याला तोड नाही. काय काय करावे बापूंनी....  ब्रिटीश काळापासून मुंबई राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासाठी वेगवेगळे महसूल कायदे होते. या सगळ्या किचकट कायद्याचा अभ्यास करून बापूंनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक महसूल कायदा खूप मेहनतीने सादर केला. बापूंच्या या कामगिरीला तोड नाही. बापूंनी महसूलमंत्री म्हणून शेतकऱ्यांना खाते पुस्तिका दिल्या. पूर्वी ७/१२ उताऱ्यावर फेरफार करण्याचे अधिकार तलाठ्याला होते. तलाठ्याने अनेकांना नागवले. बापूंनी ते अधिकार काढून मामलेदारांना दिले. ३०० पेक्षा अिधक वस्ती असलेल्या गावाला ‘वाडी’चा दर्जा दिला. ज्या शेतकऱ्याच्या शेतात झाडे आहेत त्या झाडांची मालकी शेतकऱ्याची नव्हती. शेताचा मालक हा फक्त जमिनीचा मालक.... झाडांची मालकी सरकारची... बापूंनी कायदा बदलला. ज्याच्या शेतात जी झाडे आहेत ती शेतकऱ्याच्या मालकीची. शहरी लोकांना याचे काही महत्त्व वाटणार नाही. हा कायदा बदलणे ही एक क्रांती होती. दुसरा महत्त्वाचा निर्णय  बँकांचे कर्ज काढून  न फेडणाऱ्या शेतकऱ्याची जमीन जप्त करण्याचे अधिकार सरकारला होते. बापूंनी या कायद्यात महत्त्वाची दुरूस्ती करून थकबाकी किंवा कर्जवसुली यासाठी ‘जमिनीची जप्ती करता येणार नाही,’ अशी दुरूस्ती आणली.  मागासवर्गीयांच्या जमिनीचे हस्तांतरण करण्यास बंदी घातली. ‘कसेल त्याची जमीन’ कायदा होता... पण सातारा-सांगली जिल्ह्यातील जमीन नावावर असलेले शेतकरी सैन्यांत दाखल झाले त्यांच्या जमिनी मूळ कुळाने मागितल्या. कारण ते कसत नव्हते... बापूंनी मुलभूत बदल करणारे विध्येयक आणले आणि सैन्यांत असलेल्या सैनिकांच्या जमिनी ते प्रत्यक्ष कसत नसले तरी, त्यांच्याच नावावर राहतील, असा कायदा केला. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील १६००० सैनिकांना याचा फायदा झाला, अशी कागदोपत्री नोंद आहे.  बापू वीजमंत्री झाले. ७००० खेड्यांना बापू वीजमंत्री असल्याच्या काळात वीज मिळाली. बापू उद्योगमंत्री असताना अनेक एम.आय.डी.सींना पाणी आणि विजेच्या सवलती मिळाल्या. १९६२ ते १९७२ पर्यंत बापू मंत्री होते. १९७२ ला वसंतदादा मंत्रिमंडळात आले. पाटबंधारे मंत्री झाले. बापूंना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. काँग्रेसच्या बाकावरील आमदार बापू पाच वर्षांच्या काळात सहा हजार प्रश्न सरकारवर बाणासारखे सोडले. 

१९७८ साली बापू जनता पक्षात गेले. १९८० साली इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या.  बापूंना इंदिराजींकडून निमंत्रण आले... ‘पक्षात या...’ बापू पुन्हा गेले नाहीत. तो राजकीय निर्णय चुकला की बरोबर होता, हा भाग वेगळा... पण, बापूंनी पुन्हा काँग्रेस प्रवेश केला असता तर बापू पुन्हा मंत्री झाले असते... कदाचित मुख्यमंत्रीसुद्धा. पण, बापू सत्तेकडे फिरकले नाहीत. बापूंचे पूत्र जयंतराव यांच्यामध्येही मला हाच संस्कार दिसतो.  बापूंनी अनेक संस्था उभ्या केल्या. पण, कोणत्याही संस्थेत बापू ना सदस्य राहिले ... ना कार्यकारिणीत राहिले... ना साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले. वाळवा कारखान्याला बापूंचे नाव द्यावे, असा ठराव कारखान्याच्या कार्यकारणीने मंजूर केला. बाबासाहेब पाटील कारखान्याचे अध्यक्ष होते. त्यांनीच तो मांडला. बापूंनी त्याला साफ नकार दिला. बापूंनी ढीगभर संस्था उभ्या केल्या... पण कोणत्याही संस्थेत बापू कोणत्याही पदावर नव्हते. आणि आज जयंतराव पाटीलही त्याच ढीगभर संस्थांपैकी एकाही संस्थेत पदावर नाहीत. एवढेच नव्हे तर आता अजितदादांनी जी फाटाफूट केली त्या फाटाफूटीत जयंत पाटील अजितदादांबरोबर गेले असते तर राज्याला कदाचित ‘तीन उपमुख्यमंत्री’सुद्धा  दिले गेले असते. पण, बापू जसे विचारावर ठाम राहिले तसे जयंत पाटीलही विचारांवर ठाम आहेत. बापू सतत लोकांमध्ये राहिले. जयंतरावही लोकांमध्येच आहेत. बापू मंत्री असताना कोणी बापूंचे चेंबर कोणते, असे विचारले, तर त्यांना सांगितले जायचे.... ‘सगळ्यात जास्त गर्दी तिथेच बापूंचे चेंबर...’ बापूंएवढा उमदा... प्रसन्न राजकारणी मी पाहिला नाही. कोणताही ताणतणाव नाही... आणि चेहऱ्यावरचे हसू कधी मावळले नाही. कासेगाव हे बापूंचे मूळगाव. १९४५ साली बापूंनी तिथे शाळा काढली. आणि साने गुरुजी यांना तिथे बोलावले. आज बापूंनी ढीगभर संस्था उभ्या केल्या आहेत. आझाद विद्यालय, कला, वाणिज्य महाविद्यालय, तंत्र महाविद्यालय, सूत गिरणी, साखर कारखाना, या सगळ्या संस्था आज उत्तमरित्या चालू आहेत. 


‘पदयात्री’ बापू हा एक विलक्षण विषय आहे. विनोबांच्या पदयात्रेत बापू शेकडो मैल चाललेत... २० कलमी कार्यक्रमासाठी संपूर्ण सांगली जिल्हा त्यांनी पिंजून काढला तो पदयात्रेनेच... एक वेळा पदयात्रा नाही त सहा वेळा वेगवेगळ्या कारणांकरिता पदयात्रा केला. माझ्या पदयात्रेला विनोबांच्या विचारांचे अधिष्ठान आहे, असे ते सांगत.   १९८० साली शरद पवार यांनी ‘जळगाव ते नागपूर’ ही ४०० मैलाची ‘शेतकरी दिंडी’ काढली.  त्या दिंडीत तेव्हाचे ६० वर्षांचे बापू ४०० मैल चालले. २०० मैलानंतर त्यांचे पाय सूजले. अकोला येथे रात्री मुक्कामाला असताना ना. धो. महानोर हे बापूंच्या पायाला तेल चोळताना मी पाहिले आहे. दुसऱ्या दिवशी दिंडीसाठी पुन्हा बापू तयार... 

खूप लिहिता येईल... वसंतदादा आणि बापू यांच्यातील मतभेद खूप चर्चेत राहिले. दोघेही मोठे. त्यांची लहान-मोठी भांडणे सोडा... आपण एवढे लहान आहोत की, ती भांडणे आकाशातील ताऱ्यांची होती. छोटे कार्यकर्ते काजवे आहेत. विकास कामात दादा-बापू हे एक होते. बापूंच्या अॅसिटोन प्रकल्पाच्या उद्घाटनाला बापूंनी वसंतदादांना बोलावले. आणि दादांनी जाहीर करून टाकले की, ‘विकासकामात दादा-बापू एक आहेत’.... त्यावेळची ही माणसं मनाने मोठी होती.  

पवासाहेबांच्या हस्ते बापूंच्या पुतळ्याचे अनावरण झाले. ‘यशवंतराव ते शरद पवार’ या परंपरेतील हे सगळे नेते यांनीच महाराष्ट्र उभा केला. आता सांगलीत दादा आणि बापू एकाच चौकात दोघांचेही पुतळे आहेत... त्यांची अपेक्षा हीच आहे, ‘आम्ही महाराष्ट्राची बांधणी जाहिरातबाजी न करता जशी केली... आजच्या कार्यकर्त्यांनी त्याच रस्त्याने चालावे... आणि तोच महाराष्ट्र पुन्हा समर्थ आणि संपन्न करावा.’

बापूंच्या पुतळ्याचे अनावरण होताना हाच विचार मनात होता... सध्या एवढेच... 

बापूंच्या प्रेरणेने उभे राहिलेले प्रभू राममंदिर (१९८२)

इस्लामपूर येथे बापूंच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी गेलो होतो... वेळ होता म्हणून बापूंच्या कारखान्यातील  राजारामनगर येथील बापूंनी उभे केलेल्या राम मंदिरात दर्शन करून आलो. सध्या  देशात ‘रामयणाचे’ वातावरण आहे. हे मंदिर बापूंनी वि. स. पागे यांच्या हस्ते भूमिपूजन करून  १९८२ साली   बांधायला घेतले. पण, राजकीय कार्यक्रमात कुठेही ‘राममंदिर’ आणि ‘बापू’ यांचा संबंध त्यांनी येऊ दिला नाही. ‘श्रद्धेची जाहिरात करायची नसते’, असे ते सांगत... धर्म, श्रद्धास्थाने हा तुमचा खाजगी विषय आहे. १९८४ ला बापू  अवघ्या सात दिवसांच्या दुखण्याने गेल्यानंतर हे मंदिर जयंतरावांनी १९८८ साली पूर्ण केले. मंदिरातील राम-सीतेची मूर्ती राजस्थानहून आणल्या. ५० लाख रुपये खर्च केले.  आजही तिथे रोज श्रद्धेने काकड आरती होते. 

बापूंच्या प्रेरणेने  पूर्ण केलेल्या या राममंदिराचा उल्लेख जयंतरावांनी त्यांच्या कोणत्याही निवडणुकीत कधीच केला नाही. आता सध्या जे काही चालेले आहे... त्यात देव आणि धर्म याच मुद्यांची चर्चा होते. मंदिर बांधून पूर्ण झाले नसतानाही रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार.... का? तर पुढे लगेच निवडणूक... मंदिर पूर्ण व्हायला अजून तीन वर्षे लागणार... राजकारणात देव-धर्माची एवढी भेसळ जाणीवपूर्वक केली जात आहे. तसे पाहिले तर आजच्या पक्षफुटीची सुरुवात रामायण काळातच झाली. रावणाची पार्टी सोडून बिभिषण श्रीरामाच्या पार्टीत आले, हा पहिला पक्षबदल... एक पक्ष सोडून आपल्या पक्षात आलेल्यांना काहीतरी द्यावे लागते, याची सुरुवात रामायण काळातच झाली... त्यामुळे बिभिषण महाराजांना रामरायांनी लंकेचे अख्खे राज्य दिले आणि निष्ठावंत हनुमाजींना..? हे मी म्हणत नाही... संत तुलसीदासांनी त्यांच्या तुलसी रामायणात स्पष्टच लिहून ठेवले आहे....

‘क्या रघुनाथजी तेरा खेल... 

बिभिषण को मिली लंका... 

हनुमाजीको तेल...’

आजच्या राजकारणामध्ये नेमके हेच सुरु आहे. निष्ठावंत पडले बाजूला आणि पक्षफोडे बसले पदांवर... म्हणून श्रद्धेची जाहिरात होऊ लागली... जाहिरात करणारे... पत्रिका वाटणारे... ‘हाय-हॅलो’ करणारे आहेत. जे श्री रामाला मनापासून मानणारे आहेत... ते कोणताही माणूस सकाळी समोर दिसला तर, ‘राम-राम’ म्हणणारे आहेत. प्रभुरामाला राजकारणात न मिसळता ज्यांच्या ओठावर रामनाम आहे तेच खरे रामभक्त.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.