Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

२३ संपले... २४ सुरू झाले...!मधुकर भावे

२३ संपले... २४ सुरू झाले...!मधुकर भावे

२०२३ संपले. २०२४ सुरू झाले. मित्रमंडळींना फोनवर शुभेच्छा देता-देता आणि घेता-घेता दुपार उलटली. घड्याळात दुपारचा १ वाजला होता. म्हणजे नवीन वर्षाचा अर्धा दिवस संपून गेला.  हा लेख वाचकांच्या हातात जाईपर्यंत संध्याकाळ होईल. म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस संपला... काळ असा वेगाने पुढे सरकतोय...  काळाची गती जबरदस्त आहे. मनाची गतीही जबरदस्त आहे. २०२३ वर्षाला निरोप द्यायला आणि २०२४ च्या उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यायला मुंबईच्या गेट वे अॅाफ इंडिया येथे खूप गर्दी होती. जुहू, वांद्रे, समुद्र किनारे रात्रभर गर्दीने तुडूंब होते. रस्त्यावर फिरायला जागा नव्हती. जवळपास अर्धी मुंबई रस्त्यावर होती. हा उत्साह चांगला आहे. आयुष्यातील दु:ख, अडचणी सगळं काही विसरून माणसांचा उत्साह नवी ऊर्जा देणारा असतो. ही गर्दी मुंबईत होतीच.. आता हे लोण सर्वच शहरांमध्ये जवळपास पोहोचले आहे. मनुष्याची प्रकृतीच अशी आहे की, गर्दीत सामावून घ्यायला त्याला आवडते. 

कोराेनाच्या काळात जवळपास ३ वर्षे घरात बसून घुसमट झाली होती. कोरोना संपल्यावर एखाद्या वारूळातील मुंग्यांसारखी माणसं रस्त्यावर आली. अर्धी मुंबई तर अशी आहे की, माणसं कशी राहतात... कुठे राहतात... जगण्यासाठी किती धावपळ करतात... प्रवास कसा करतात.... कामावर पोहोचणे म्हणजे रोजची लढाई कशी असते... या कष्टकरी अर्ध्या-पाऊण मुंबईची कल्पनाही करता येणार नाही. माझे काही मित्र आहेत, जे उत्तनहून रोज मुंबईला येतात. उत्तन कुठे आहे?... चर्चगेटहून लोकलने वसईला उतरायचे... वसईहून एस. टी. ने उत्तनला जायचे. तेथून त्यांचे खेडेगाव तीन किलोमीटर... शेअर रिक्षा करायची... संध्याकाळी कामावरून सुटल्यावर घरी पोहोचायला रात्री १०.३० ते ११ रोज... या धावपळीत महिलाही आहेत. पाठ टेकायला घरी जायचे... उजाडले की, पुन्हा पळापळ सुरू... अशा या धावपळीच्या विलक्षण मुंबईत सरलेल्या वर्षाला निरोप देताना सामान्य माणसांचा उत्साह, ऊर्जा वाढवतो हे नक्की... छोट्या-छोट्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या माणसांची संख्या बघितली तर खरं वाटणार नाही.... अशा या दाटीवाटीत खुराड्यासारखी माणसं राहत आहेत..  जे टोलेजंग फ्लॅट आहेत त्यातील सुखी माणसं कोणते नशीब घेवून जन्माला आली, माहिती नाही... पण ती टक्केवारी फार कमी आहे. कष्टकऱ्यांची टक्केवारी जास्त आहे...  पूर्वीची मुंबई तर अधिक कष्टाची होती. आता मध्यमवर्ग थोडासा सधन झाला. पण या सधन मध्यमवर्गातील काहीजणांना प्रकृतीच्या बरोबर विकृतीनेही झपाटून टाकले आहे. याच मध्यमवर्गातील १०० तरुण-तरुणी ठाण्यातील रेव्ह पार्टीत पकडले गेले. व्यसनांच्या आहारी जाण्याची ही वृत्ती फार वेगाने मध्यमवर्गात वाढत चाललेली आहे. गांजा, चरस, एलएसडी अमली पदार्थांचे पेपर, एस्कॅट्सी गोळ्या अशा व्यसनाधीन अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले मध्यमवर्गीय आहेत. हे ऐकल्यावर आणि वाचल्यावर डोकं बधीर होऊन गेले. 

समाज कुठे चालला... आणि याला थांबवणारे कोण? वाढणारा पैसा कुठे खर्च केला जातोय... ज्या तरुण तरुणींना अटक केली आहे, त्यांच्या पालकांना कल्पना आहे की नाही? याचीही शंका येईल. काही घरांत आज अशी स्थिती आहे की, ‘रात्री कुठे जाणार, घरी कधी येणार... पार्टी कोणाकडे आहे...’ हा तपशील सांगण्याची पद्धत आता बंद झाली आहे. ‘मला हवं ते मी करीन...’ ही वृत्ती वाढत चाललेली आहे. हातातल्या मोबाईलवर झोमाटाला चमचमीत पदार्थांची अॅार्डर करून, आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याची वाढलेली संख्या मध्यमवर्गीयांचीच आहे.  आणि त्याबद्दल आता कोणाला काही वाटत नाही. कुटुंबातील सर्वांनी वर्षाच्या शेवटच्या दिवशी  एकत्र भोजन करावं... रात्री एकत्र गप्पा कराव्यात... हे सगळे आनंदाचे क्षण आता बऱ्याचशा कुटुंबात शोधावे लागत आहेत. ज्यांच्याकडे दोन खोल्या किंवा तीन खोल्या आहेत.. त्या त्या खोल्यांतील माणसं घरात असून, मोबाईलवर एकमेकांना मेसेज देत आहेत... ही एक नवीन संस्कृती (किंवा विकृतीच म्हणा) एक जीवनशैली होत चालली आहे. कुटुंबातील संवाद जवळपास संपलेला आहे. भांडणं संपलेली नाहीत. आपसात प्रेम संपलेलं आहे.  काहीतरी बिघडले आहे, एवढे नक्की.... आणि जे बिघडले आहे ते प्रामुख्याने मध्यमवर्गीयांमध्येच बिघडलेले आहे. आणि त्याबद्दलची खंत कोणालाही नाही. 

रेव्ह पार्टीचे उदाहरण अपवादात्मक आहे हे मान्य. पण, समाज विकृतीकडे चालल्याचे  हे लक्षण आहे. त्याहीपेक्षा अितशय भयानक अशी गोष्ट म्हणजे  गेली तीन-चार दिवस दारूविक्रीची जेवढी दुकानं मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि महाराष्ट्रभर त्या दुकानातील गर्दी पाहिल्यानंतर मनामध्ये पुन्हा हाच प्रश्न आला की, ‘ही तरुण पिढी नेमकी कुठं चालली आहे’? विरोधाभास असा आहे की, शिर्डीला ही गर्दी आहे... अक्कलकोट, शेगावला गर्दी आहे.... आणि दारूंच्या दुकानातही गर्दी आहे.... पण, तरुण पिढीची जास्त गर्दी दारूच्या दुकानात आहे.  गोव्यातील एक मित्र सांगत होते की, ‘२० डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यंत गोव्यातील सगळी हॉटेल्स फुल्ल झालेली आहेत. आणि यातील ७० टक्के लोक महाराष्ट्रातील आहेत...’ गोव्यामध्ये जायचे म्हणजे धिंगाणा घालायलाच जायचे....  हे ठरवून गेल्यासारखे आहे. सगळ्यात चिंता वाटते ती दारूच्या दुकानांतील तरुणांच्या गर्दीची. १५-१५ वर्षांपासून ते २५-३० च्या वयोगटातील सर्व तरुणाईची ही गर्दी आहे. हे सगळे मध्यमवर्गीय आहेत. फार मोठी कमाई असेल, असा हा वर्ग नाही. त्यांच्या दारूच्या व्यसनाचे कुटुंबावर काय परिणाम होतात का? याची माहिती घेतलेली नाही... पण, व्यसनाधीन झालेला तरुण घरी अडचणीचा होतो, हे नक्कीच. अनेक कुटुंबातील संबंध िबघडतात आणि केवळ ही गर्दी दोन दिवसांची, चार दिवसांची आहे, अशी स्थिती नाही. तसे असते तर दारूची दुकाने चाललीच नसती. व्यसनात खर्च होणारा पैसा किती प्रचंड प्रमाणात आहे... शिवाय आणखी एक विरोधाभास म्हणजे विविध मंदिरांना  दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे..  आणि दारू पिऊन सरते वर्ष साजरे करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या सगळ्याचा मेळ कसाकाय बसणार...  

मला आणखी एक मोठी गंमत वाटली. वृत्तपत्रसृष्टीमध्ये आता जवळपास ६०-६५ वर्षे मी आहे. ६० वर्षांपूर्वीच्या वृत्तपत्रांमध्ये वर्ष सरत आल्यावर पहिल्या पानावर मी अशा बातम्या कधीही पाहिल्या नाहीत.... संपादक झाल्यावर प्रसिद्ध करू दिल्या नाहीत... मटक्याचे आकडेही छापू दिले नाहीत. अनेक संपादकांनी हे पथ्य पाळले... अनेक पत्रकार आजही ते पथ्य पाळताहेत... पण परवा म्हणजे २३ डिसेंबरचे वृत्तपत्र असेल.... पत्रकारितेच्या भाषेत आम्ही ज्याला ‘सेकंड लीड’ म्हणतो.... म्हणजे मुख्य शिर्षकाच्या बाजुची बातमी... त्या ठिकाणी त्या वृत्तपत्राने काय छपावे?.... हा कोलाज बघा.... समाजात निर्ढावलेपणा आलेलाच आहे... धटींगणपणा वाढलेलाच आहे... पण या सर्व प्रवृत्ती-अपप्रवृत्तीला आम्ही पत्रकार नकळत पाठींबा देत आहोत. आणि आमच्याच बातम्यांनी आम्ही प्रोत्साहनसुद्धा देत आहोत. इथपर्यंत आता आमची मजल गेलेली आहे. समाजातील हे सर्व अपप्रवृत्तीचे लोण रोखणे पत्रकारांच्या हतात आता राहिलेले नाही हे मान्य. कारण तसा धाक असलेले वृत्तपत्रही नाही... संपादकही नाही... आणि वृत्तपत्राचे चारित्र्यही नाही. सामाजिक वातावरणही नाही. समाजात तसा दरारा असलेला... धाक असलेला... नेताही नाही... पण या सर्व अपप्रवृत्तींना पहिल्या पानावर छापण्याचे धारिष्ठ्य दाखवणे म्हणजे पत्रकारितेने सभ्य सामाजिक मर्यादा न पाळण्यासारखे आहे. निदान पत्रकाराने तरी या अपप्रवृत्तींना रोखले पाहिजे. अाता सांगण्यात येत आहे की, सरकारने याबद्दलचे पत्रक काढले आहे... म्हणजे हे पत्रक निघाले नसते तर दारू विकत घेणाऱ्यांना रात्रभर दारूची दुकाने उघडी राहणार आहेत, याची माहिती जणू झालीच नसती. ‘महाराष्ट्र सरकारने दारूची दुकाने रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत उघडी ठेवण्यास अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे...’ नशीब शासनाने अधिकृत परवानगी एक पत्रक काढून दिली... आणि वृत्तपत्रांनी ते पत्रक छापले. सरकारने त्यासाठी पानभर जाहिरात दिली नाही.... ही मोठी मेहरबानी झाली समजायचे... कारण अलिकडे पानभर जाहिराती दिल्याशिवाय सरकारचे पान हलत नाही आणि सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचतच नाही.  

एकूणच समाज जीवनातील विकृती वाढतच जाणार आहेत. मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा वेगाने येतो आहे... चांगले आहे... मुंबईच्या अनेक बिल्डरनी त्यांनी उभारलेल्या इमारतींच्या जागांच्या विक्रीचे फलक रस्तो रस्ती लावलेले आहेत. त्यात टू बी. एच. के म्हणजे दोन बेडरूमचा फ्लॅट आता कोटी-दीड कोटीच्या पुढे गेलेला आहे. आणि त्या किमतीपुढे ‘ओन्ली’ असे लिहिलेले आहे. हे फ्लॅट घेणारे मध्यमवर्गीयच आहेत. टाटा, बिर्ला नाहीत. किंवा मध्यमवर्गीयांची जी काही तरक्की होत चालली आहे त्याबद्दल असुया वाटावी, असेही नाही... परंतु  समृद्धी येत असताना काही तरी बिघडलेले आहे.... काहीतरी हरवलेले आहे... एवढे निश्चित... कुटुंबातील गोडवा तर कमी झालेला आहे... घरी एकत्र जेवणे... संवाद ठेवणे... एकमेकांबद्दलचे प्रेम... तो किंवा ती घरी येईपर्यंतची आतुरता... ओढ... ते वाट पाहणे... हे आता सगळे संपले आहे. सगळं काही मेसेजवर चालले आहे. समाज जीवन आणि कुटुंब इतक्या कृत्रिम अवयांवर जगत आहे की, त्यात गोडवा कसा राहणार?  आिण कुटुंबाची आत्मियतेची भावना कशी राहणार...  नवीन वर्षाचे स्वागत करताना सर्वांनाच आनंद आहे... आता १५ दिवसांनी संक्रांत येईल... मनापासून सांगा... या संक्रांत दिनाचे... त्या तिळगुळाचे... 

वडीलधाऱ्यांना तिळगूळ देवून नमस्कार करण्याचे, एक छान वातावरण होते...  आज ते वातावरण राहिले आहे का? घरात विजेचे दिवे प्रत्येक खोलीत चमकत आहेत...  पण, छोट्याशा देव्हाऱ्यातील नंदादीप तेवत राहण्याची जी एक मानसिक शांती होती ती आज टिकून आहे का? त्यामुळे कुठेतरी काहीतरी बिघडले आहे... आणि ते दुरूस्त कोण करणार त्याचे उत्तर सापडत नाही... आता घरी तिळगूळ करायला कोणाला वेळ नाही हे खरे... सगळं काही ‘रेडीमेड’ आहे... पण घरी केलेल्या तिळगुळात ‘तिळाची स्निग्धता’ होती... आणि ‘गुळाची माधुरी’ होती. आजच्या ‘रेडीमेड’ तिळगुळात ती नात्याची स्निग्धताही संपली आणि गुळाची माधुरीही संपली... खरं म्हणजे... ते गोड बोलणेसुद्धा संपतच आले आहे.. उरला आहे तो फक्त व्यवहार... आणि नात्याची औपचारिकता... कोणाचे कोणावाचून अडत नाही... हे तर खरेच आहे... पण, समाजातील आजच्या अस्वस्थतेचे पहिले कारण घरात आहे... याची जाणीव ज्या दिवशी होईल त्या दिवशी नववर्षाचे स्वागत दारूच्या दुकानावर गर्दी करून होणार नाही... कुटुंबात रात्रभर गप्पा मारून, हसून-खेळून येणाऱ्या नव्या वर्षाचे स्वागत होईल. पण ते दिवस आता हातातून पाऱ्यासारखे सांडून गेल्यासारखे वाटते आहे. 
सध्या एवढेच...

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.