Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रुग्णालयाने पतीला मृत घोषित करताच पत्नीने केली आत्महत्या; मग कळले पती तर अजून जिवंत.

रुग्णालयाने पतीला मृत घोषित करताच पत्नीने केली आत्महत्या; मग कळले पती तर अजून जिवंत.


भुवनेश्वर येथे एक दुर्दैवी प्रकार घडल्याची माहिती समोर आली. एसीचा स्फोट होऊन तुमच्या नवऱ्याचा मृत्यू झाला, असा संदेश एका रुग्णालयाने संबंधित व्यक्तीच्या पत्नीला दिल्यानंतर तिला दुःख अनावर झाले. या दुःखातून तिने स्वतःला संपवले. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा पती जिवंत असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा नाहक जीव गेला. या निष्काळजीपणाविरोधात आता रुग्णालयाविरोधात पीडित कुटुंबियांनी आंदोलन सुरू केले आहे.

३४ वर्षीय दिलीप सामंतराय हा आपल्या तीन सहकऱ्यांसह २९ डिसेंबर रोजी हाय-टेक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या छतावर एसी कम्प्रेसर दुरूस्तीचे काम करत होता. यावेळी अचानक स्फोट होऊन सर्व कामगार भाजले गेले. दिलीप सामंतराय, ज्योतीरंजन, सीमांचल आणि श्रीतम साहू असे चार कामगारांचे नाव आहे. दुरुस्तीचे काम करत असताना अचानक स्फोट झाल्यामुळे चारही जणांवर याच रुग्णालयात उपचार सुरू होते. ३० डिसेंबर रोजी रुग्णालयाने दिलीपचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे जाहीर केले. ज्यामुळे त्याची पत्नी सोना (२४) हीला मोठा धक्का बसला. दिलीपच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिने स्वतःचे आयुष्य संपविले.

दिलीप यांचे सासरे यांनी या घटनेची माहिती देताना रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ३० डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता डॉक्टरांनी दिलीपला मृत घोषित केले. त्यानंतर जळालेल्या अवस्थेतील त्याचा मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला. दुसऱ्या दिवशी आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. रुग्णालयाने म्हटले की, हा दिलीपचा मृतदेह आहे. त्यामुळे माझ्या मुलीला हा धक्का पचवता आला नाही आणि तिनेही स्वतःचे आयुष्य संपविले. 
गुरुवारी सायंकाळी उपचार घेत असलेल्या इतर कामगारांपैकी एकाला शुद्ध आली.  तेव्हा त्याने स्वतःचे नाव दिलीप असल्याचे सांगितले. यानंतर सदर धक्कादायक प्रकार समोर आला. रुग्णालयाच्या सीईओ स्मिता पाधी यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, एसी कम्प्रेसरची दुरूस्ती करण्याचे काम एका एजन्सीला दिले होते. स्फोट झाल्यानंतर एजन्सीच्या अधिकाऱ्यानेच चार कर्मचाऱ्यांबद्दल आम्हाला माहिती दिली. नातेवाईकांनाही याबाबत माहिती देण्यात आली. ३० डिसेंबर रोजी दिलीप सामंतराय यांचा मृत्यू झाल्यानंतर रितसर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला होता. आम्हाला एजन्सीने जी माहिती दिली, तीच आम्ही जाहीर केली.

आता हाती आलेल्या माहितीनुसार, दिलीपच्या कुटुंबियांनी ज्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले, त्याचे नाव ज्योतीरंजन असल्याचे कळत आहे. तसेच ३ जानेवारी रोजी श्रीतम साहू याचाही मृत्यू झाला. आता ज्योतीरंजनच्या कुटुंबियांकडून त्याच्या मृतदेहाची मागणी केली जात आहे. पण त्यावर आधीच दिलीपच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले आहेत. दिलीपच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे सर्वच कामगारांच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.