Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून खून

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून खून

मुंबई : मुंबईतील कुर्ला इथं मीठी नदीच्या किनाऱ्यावर 5 जानेवारीला एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. त्या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचच्या युनिट 5नं केला व त्याचा छडाही लावला. कुर्ला इथल्या मीठी नदीच्या किनाऱ्यावर 5 जानेवारीला अमान अब्दुल शेख या व्यक्तीचा मृतदेह सापडला.

तो रिक्षा चालवत होता. रिक्षाचा मालक नफीस खान यानं प्रतिदिन 300 रुपयांच्या भाड्यानं अमान याला रिक्षा चालवायला दिली होती. नफीसनं एकूण 6 रिक्षा भाड्यानं दिल्या होत्या. अमानचं नफीसच्या घरी येणं-जाणं होतं, मात्र 23 वर्षांचा अमान आणि नफीसची बायको यांचं अफेअर असल्याचा संशय नफीसला होता. त्यामुळे नफीसनं बायकोशी भांडण केलं. त्याची बायको माहेरी निघून गेली होती.

याच रागातून नफीसनं ताकिब आणि मुकेश या दोन साथीदारांच्या साह्यानं अमानच्या हत्येचा कट रचला. अमान पैसे देण्यासाठी 5 जानेवारीला गोवंडीतल्या घरी आला, तेव्हा तिघांनी त्याचा गळा दाबला आणि त्याचा मृतदेह त्याच्याच रिक्षात ठेवून मीठी नदीजवळ ती रिक्षा घेऊन गेले. मृतदेह त्यांनी नदीत फेकला आणि रिक्षा थोड्या अंतरावर पार्क केली. नफीसनं त्या रिक्षेची किल्ली स्वतःकडे ठेवून घेतली.

अमान बहिणीसोबत गोवंडीला राहायचा. नफीसही त्याच्या बहिणीला ओळखत होता. तिनं भाऊ हरवल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. मीठी नदीत मृतदेह सापडल्यावर कुर्ला क्राइम ब्रांचचे वरिष्ठ इन्स्पेक्टर घनःश्याम नायर यांनी मुंबईच्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली. तेव्हा तो अमानचा मृतदेह असल्याची खात्री पटली.


नफीस खान अमानच्या बहिणीकडे गेला असल्याचं अमानच्या बहिणीकडून पोलिसांना समजलं. अमान रिक्षा घेऊन कुठे गेलाय याची चौकशी नफीसनं केली होती. पोलिसांनी नफीसकडे चौकशी केली असता, कोणी व्यक्तीनं रिक्षा मीठी नदीजवळ उभी असलेली पाहिली व आपण दुसरी किल्ली घेऊन ती रिक्षा घेऊन आल्याचं त्यानं सांगितलं.

क्राइम ब्रांचला नफीस खानच्या बोलण्याबाबत संशय आला. त्यांनी 5 तारखेचं लोकेशन ट्रेस केलं, तेव्हा गोवंडी ते मीठी नदीपर्यंतचं लोकेशन त्यांना मिळालं. पोलिसांनी त्या रस्त्यावरचं सीसीटीव्ही फूटेजही तपासलं. त्यात नफीस, त्याचे सहकारी एका मृतदेहासोबत रिक्षात असलेले दिसले. त्यावरून तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्यांनी गुन्हा कबूल केला. क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी 2 किल्ल्यांच्या संशयावरून आरोपी नफीस खान व त्याच्या 2 सहकाऱ्यांना शिताफीनं अटक केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.