Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनोज जरांगेंच्या लढ्याला यश! मध्यरात्री नवा अध्यादेश सुपूर्द

मनोज जरांगेंच्या लढ्याला यश!  मध्यरात्री नवा अध्यादेश सुपूर्द 


नवी मुंबई : राज्य सरकारच्या  शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली.

यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान, अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन थोड्याच वेळात उपोषण सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार : मनोज जरांगे

"समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. उद्या सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत.", असं मनोज जरांगेंनी सांगितलं. तसेच, मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलं आहे. उद्या आम्ही येथे सभा घेणार असून मुंबईत जाणार नसल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचंही मनोज जरांगेंनी यावेळी जाहीर केलं.

रात्री उशीरा राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेतली आणि त्यांच्याकडे सुधारित अध्यादेश सुपूर्द करण्यात आला. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्याचं मराठा बांधवांना सांगितलं. तसेच, सर्व मागण्यांचे अध्यादेशही निघाल्याचं सांगितलं. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावं, तसेच त्यांच्या कुटुंबानासुद्धा प्रमाणपत्र द्यावं, ही मागणी मान्य झाली आहे. तसेच, सरकारनं सगे सोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढले आहेत. सुधारित अध्यादेश मला देण्यात आल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे आंतरवली सराटीत मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, तेसुद्धा मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमचं आरक्षणचं काम केलंय : मनोज जरांगे

"वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं आरक्षणचं काम केलं आहे.", असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

मनोज जरांगेंच्या लढ्याला यश : दीपक केसरकर

मराठा आंदोलक मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द केल्यानंतर दीपक केसरकरांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "राज्य सरकारच्या वतीनं मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्यासंदर्भातील सर्व कागदपत्र त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. मनोज जरांगेंनी खूप मोठी लढाई आपल्या समाजासाठी लढली, मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आलं आहे. त्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रं त्यांच्याकडे सुपूर्द करुन त्यांनी विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं. मात्र, त्यांचं म्हणणं असं आहे की, ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातत्यानं माझ्याशी संपर्क साधला आणि हे काम करण्यामध्ये त्यांनी आपल्याला मदत केली, त्यांनी समाजाला भेटायला आणि माझं उपोषण सोडायला स्वतः इथे यावं. त्यांचं हे म्हणणं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवलं आहे. त्यानुसार सकाळी 8 वाजता स्वतः मुख्यमंत्री जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी इथे येणार आहेत. एकादृष्टीनं हा विजय साजरा करण्यात येणार आहे."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.