Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'भगवान राम मांसाहार करत होते'; धार्मिक भावना दुखावल्याने नयनताराच्या 'अन्नपूर्णानी'च्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल

'भगवान राम मांसाहार करत होते'; धार्मिक भावना दुखावल्याने नयनताराच्या 'अन्नपूर्णानी'च्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल

अभिनेत्री नयनतारा  चा 'अन्नपूर्णानी'  चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.  तसेच आता मुंबई पोलिसांनी  या प्रकरणी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. शिवसेनेचे माजी नेते रमेश सोळंकी  यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला असून पोलिसात तक्रार दाखल केली. निर्मात्यांनी भगवान रामाचा  अपमान केल्याचा आरोपही रमेश सोळंकी यांनी केला आहे.

शनिवारी रमेश सोळंकी यांनी हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचंही म्हटलं आहे. त्यांनी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चित्रपटाच्या निर्मात्यांवर तसेच नेटफ्लिक्स इंडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई करण्याची आणि एफआयआर नोंदवण्याची विनंती केली.

चित्रपटात प्रभू रामाचा अपमान -

रमेश सोळंकी यांनी म्हटलं आहे की, 'ज्या वेळी संपूर्ण जग भगवान श्री राम मंदिराच्या अभिषेकच्या अपेक्षेने आनंदात आहे, अशा वेळी झी स्टुडिओ, नाद स्टुडिओ आणि ट्रायडेंट आर्ट्स निर्मित नेटफ्लिक्सवर अन्नपूर्णानी हा हिंदूविरोधी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. एका हिंदू धर्मगुरूची मुलगी बिर्याणी शिजवताना नमाज पढते. या चित्रपटात लव्ह जिहादचे प्रमोशन करण्यात आले आहे. भगवान श्रीराम हे देखील मांसाहारी असल्याचे सांगून अभिनेता फरहानने अभिनेत्रीला मांस खाण्यास प्रवृत्त केले. चित्रपटात अभिनेत्री हिंदू असूनही मांस शिजवते, मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडते, रमजान इफ्तारसाठी जाते आणि नमाज अदा करते.

आपल्या तक्रारीची छायाचित्रे शेअर करताना ते म्हणाले, 'नेटफ्लिक्स इंडिया आणि झी स्टुडिओजने जाणूनबुजून हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे आणि तो प्राण प्रतिष्ठाच्या आसपास प्रदर्शित केला आहे. मी मुंबई पोलीस, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल या व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करावा.

रमेश सोळंकी यांनी 'अन्नपूर्णानी'चे दिग्दर्शक नीलेश कृष्णा, अभिनेत्री नयनतारा, निर्माते जतिन सेठी, आर रवींद्रन आणि पुनित गोएंका, झी स्टुडिओचे मुख्य व्यवसाय अधिकारी शारिक पटेल आणि नेटफ्लिक्स इंडियाचे प्रमुख मोनिका यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. तथापि, अद्याप निर्माते आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने तक्रारीला प्रतिसाद दिलेला नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.