Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलाच्या हळदीत सुरू होता डीजे, वडिलांचा नाचताना झाला मृत्यू, पंढरपुरातील घटना

मुलाच्या हळदीत सुरू होता डीजे, वडिलांचा नाचताना झाला मृत्यू, पंढरपुरातील घटना


पंढरपूर: पंढरपुरातून एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलाच्या लग्नाच्या वरातीमध्ये नाचताना बापाचा मृत्यू झाला आहे. सुभाष देवमारे असं आपल्या मुलाच्या वरातीमध्ये मृत्यू झालेल्या बापाचं नाव आहे. सुभाष देवमारे यांच्या मृत्यूमुळे लग्नमंडपात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे.


घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा आज दुपारी लग्नसोहळा होता. दरम्यान काल रात्री नवरदेवाची हळद होती. हळदी समारंभाचं जंगी आयोजन करण्यात आलं होतं. हळदी समारंभासाठी डीजेची व्यवस्था करण्यात आली होती. डॉल्बीच्या दणदणाटामध्ये नवरदेवाची हळदीची वरात सुरू होती. वरात आल्यानंतर डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे वर पिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले.

त्यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान देवमारे यांचा मृत्यू झाला. डॉल्बिचा कर्कश आवाज आणि दणदणाटामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. लग्नाच्या दिवशीच आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याने वराने टाहो फोडला. लग्नाघरातील आनंद अचानक दु:खाच्या छायेत बुडून गेला.

सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. लग्नाच्या वरातीमध्ये सर्रासपणे डॉल्बीचा वापर केला जात आहे. डॉल्बीच्या दणदणाटामुळे यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतु याविरोधात पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. नियमापेक्षा जास्त डेसिबल आवाज करणाऱ्या डॉल्बीवर कडक कारवाई करावी अशी मागणी या घटनेनंतर केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.