राजू शेट्टी भाजप कार्यालयात; राजकीय चर्चेला उधाण...
सर्वत्र लोकसभा निवडणुकीची चर्चा जोरदार चालली असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आष्टा येथील भाजप कार्यालयास भेट दिली.
यावेळी भाजपाकडून राजू शेट्टी यांचा सन्मान करण्यात आला. मात्र या भेटीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.
शेट्टी यांनी भाजपपासून फारकत घेतली आहे. तसेच त्यांचे इंडिया आघाडीशी जमेनासे झाले आहे. आगामी निवडणूक 'एकला चलो रे'च्या भूमिकेत लढवणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यातच शेट्टी भाजप कार्यालयात गेल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. शहरात ग्रामदैवत शाकंभरी महोत्सव सुरू आहे. यानिमिताने राजू शेट्टी यांनीही चौंडेश्वरी देवीचे दर्शन घेतले.
यावेळी भाजप युवा मोर्चा वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीण माने यांनी शेट्टी यांना कार्यालयास भेट देण्याची विनंती केली. शेट्टी यांनी या विनंतीला कसलेही आढेवेढे न घेता संमती दिली आणि काही वेळातच शेट्टी यांनी आष्टा येथील भाजप कार्यालयात पाऊल ठेवले. यावेळी माने यांच्या हस्ते शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध विषयावर गप्पा रंगल्या. शहरात सुरू असलेल्या विकासकामाबाबत समाधानही व्यक्त केले.यावेळी स्वाभिमानीचे अरुण कवठेकर, नितीन चौगुले, अभय बसुगडे, भाजपचे उदय कवठेकर, संजय सावंत, रविराज चव्हाण, दत्ता कोळेकर, नरेश घाडगे, शिवप्रसाद भोसले, स्वप्नील मुळीक, कन्हैया मंडले, अविनाश औताडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष माने यांनी भाजप तसेच निशिकांत पाटील यांच्यावतीने शहरात सुरु असलेल्या विकासकामांबाबत तसेच सर्वसामान्य जनतेसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिती.गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून जोरदार हालचाली सुरू आहेत. शेट्टी यांनी महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांनी शेट्टींचा लवकरच इंडिया आघाडीत प्रवेश असल्याचे संकेत दिले होते.
त्यानंतर महायुतीच्या एका बड्या नेत्याने शेट्टी महायुतीबरोबर येण्यास इच्छुक असतील तर त्यांना सोबत घेऊ असे सांगितले होते. त्यानंतर शेट्टी यांच्या भाजपा कार्यालय भेटीची चर्चा रंगली. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तर भाजपपासून फारकत घेवूनही त्यांच्याच कार्यालयाला भेट दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
शेतकरी हितासाठी साथ देण्याची अपेक्षा
साखर कारखानदारांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी हितासाठी लढा देत आहे. आष्टा परिसरात माने आणि त्यांचे सहकारी कौतुकास्पद काम करीत आहेत. सामान्यांना आधार देत आहेत. ऊस दर लढ्यात सक्रिय सहभाग घेताना शेतकरी बांधवांना दिलासा दिला होता. त्यांनी शेतकरी हितासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा शेट्टी यांनी व्यक्त केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.