- मधुकर भावे
२८ जानेवारीला बेळगावचे साहित्य संमेलन अगदी दणक्यात झाले. ‘प्रगतिशील लेखक संघा’चे हे तिसरे साहित्य संमेलन होते. एक उद्देश समोर ठेवून बेळगावातील मराठी लेखक, मराठी रसिक आणि सीमा प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी अजूनही तळमळत असलेल्या, मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या बेळगावकरांची ही भावना कोणत्याच तागडीत तोलता येणार नाही. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी हा सीमा भाग जवळपास ४० लाख मराठी भाषिक लोकवस्तीचा आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला तेव्हा जी मुख्य घोषणा होती त्या घोषणेची सुरुवात..
‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ ही घोषणा होती. याच एका घोषणेमुळे सारा मराठी मुलुख १९५५ ते १९६० पर्यंत लढत होता. १०६ सत्याग्रहींचे बलिदान झाले. त्यांच्या नावाचे हुतात्मा स्मारक मुंबईत उभे राहिले. त्या स्मारकात एक चेहरा शेतकऱ्याचा आणि एक चेहरा कामगाराचा आहे. हे जबरदस्त आंदोलन लढवले ते शेतकरी आणि कामगारांनी. सीमा भागातही तमाम मराठी माणूस लढला. त्या लढाईतही काहींचे बलिदान झाले. हजारो लोक तुरुंगात गेले. साराबंदी चळवळीत अनेक नेत्यांसह हजारो सीमावासियांना सक्त मजुरीच्या शिक्षा झाल्या. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाला, पण बेळगाव, कारवार, निपाणी हा मराठी भाषिक भाग महाराष्ट्रापासून तोडला गेला. सर्व कसोट्या लावल्या तरी बहुसंख्येने मराठी भाषिक असलेल्या या भागातील मराठी जनतेला न्याय मिळाला नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आणि ‘आता लढा संपला’, असे समजून समितीमधील प्रजा समाजवादी पक्षाने लढ्यातून अंग काढून घेतले. सीमाप्रश्न वाऱ्यावर सोडला. आचार्य अत्रे यांनी सीमा प्रश्नाचा निर्णय झाला नाही म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला. कम्युनिष्ट आणि शे. का. पक्ष या दोनच पक्षांनी तब्बल तीस वर्षे सीमा प्रश्नासाठी आकाश-पाताळ एक केले. त्यानंतर स्थापन झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने सीमा लढा हा पुन्हा जिवंत केला. सीमा लढ्यासाठी शिवसेनेने अनेक उग्र निदर्शने केली. शे. का. पक्षाने आणि कम्युनिस्ट पक्षाने साराबंदीचा मोठा लढा लढवला. या दोन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांनी तुरुंगवास भोगला. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावरही सीमा प्रश्नाची लढाई कित्येक वर्ष सुरू होती. सीमा भागातील मराठी लोकांचे मराठीवर जेवढे प्रेम आहे तेवढे महाराष्ट्रातील लोकांचे मराठीवर प्रेम आहे की नाही, अशी शंका यावी, इतपत त्यांचा जीव मराठी भाषा आणि महाराष्ट्रात सामील होण्यासाठी घुटमळत आहे. त्याचे प्रत्यंतर त्या साहित्य संमेलनात दिसले. सर्व बाजूंनी लढाई लढून झाली. केंद्रीय कायदामंत्री पाटसकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जे निकष लावले होते, त्या निकषामध्ये ‘सीमाभाग १०० टक्के महाराष्ट्राचाच आहे’, हे सिद्धही झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमदारांनी निवडणुका जिंकल्या. लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या. बेळगाव महापालिका, कारवार पालिका जिंकली. बेळगाव पालिका स्थापन झाल्यापासून गेली १५० वर्षे त्या पालिकेचे सगळे दप्तर मराठीत आहे. १०० वर्षांपेक्षा अधिक काळ व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची सगळी लिखा-पढी मराठी भाषेत आहे. व्यवहारातही मराठीच भाषा वापरली जाते. कानडी भाषेची सक्ती शाळा आणि महाविद्यालयांत झाल्यानंतर ४० लाख मराठी भाषिक कानडी शिकले. तीन पिढ्या कानडी भाषा शिकल्या. त्याचा थोडासा परिणाम असा झाला की, सीमा प्रश्नाच्या लढ्याची धार थोडी कमी झाली... परंतु सीमा भागातील मराठी भाषकांचे मराठी प्रेम एक इंचानेही कमी झालेले नाही. बेळगावच्या साहित्य संमेलनात त्याचा प्रत्यय आला. मराठी भाषा आणि महाराष्ट्र यावर सीमा भागातील लोकांचे किती प्रेम आहे... त्याचा जिवंत पुरावा म्हणजे ते संमेलन होते. जगदिश कुंटे या व्यंगचित्रकाराने जवळपास १०० व्यंगचित्रांचे प्रदर्शन मांडले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा कुंचला जणू त्याच्या हातात आलेला आहे. इतक्या हुबेहूबपणे महाराष्ट्रावरील अन्याय कुंटे यांनी त्या चित्रांतून चित्रित केला होता. किती जीव लावून, मेहनत घेवून त्यांनी हे काम केले होते. त्याला कोणी पाच रुपयेही दिले नसतील. मराठी भाषेवरील प्रेम आणि झालेल्या अन्यायाची सल त्या प्रत्येक व्यंगचित्रात तरारून जाणवत होती.
हे साहित्य संमेलन घेण्यात प्रेरणा कुणाची?... स्वातंत्र्य लढ्यासाठी तुरुंगवास भोगलेले, नंतर गोवामुक्तीसाठी तुरुंगवास भोगलेले, मग संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा आणि तुुरुंगवास, मग सीमा प्रश्नासाठी तुरुंगवास असे ९७ वर्षांचे कॉ. कृष्णा मेणसे हे या सगळ्या साहित्य संमेलनामागची प्रेरणा... शरीर थकल्यामुळे त्यांचे हे काम तरुणांनी अंगावर घेतले. त्यांचे सुपूत्र प्रा. आनंद मेणसे, बेळगावचे माजी महापौर अॅड. अजय सातेरी, पत्रकार कृष्णा शहापूरकर, अनिल अजगावकर, मधु पाटील, प्रा निलेश शिंदे. अशा अनेकांनी हे साहित्य संमेलन ‘आपल्या घरचे कार्य आहे’, असे समजून केले. महाराष्ट्रात मराठी जनतेला आचार्य अत्रे यांची आठवण राहिलेली नाही. पण हे वर्षे आचार्य अत्रे यांच्या रौप्य महोत्सवी शताब्दी वर्ष आहे. (१२५) ही या साहित्य संमेलनाची मूळ प्रेरणा. हे तिसरे संमेलन. यापूर्वीच्या दोन संमेलनाची कल्पना त्याही पेक्षा भन्नाट... आचार्य अत्रे तर महाराष्ट्रातीलच...
महाराष्ट्रासाठी शेवटपर्यंत लढणारे... पण, पहिले साहित्य संमेलन २०२२ साली झाले. ते कुणाला लोकार्पण करावे...? तर... प्रख्यात हिंदी कवी साहिर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दीचे ते संमेलन होते. २०२३ साली दुसरे साहित्य संमेलन झाले... त्यावेळी महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाच्या निर्मिती आणि कामाला सुरुवात झाली होती. त्याला १५० वर्षे झाली. महाराष्ट्रतील कोणत्याही संस्थेला अाणि साहित्यिकांना सत्यशोधक समाजाच्या १५० वर्षांचा वेध यावा, असे मनातसुद्धा आले नाही. कार्यक्रमाची गोष्ट नंतरची. अत्रेसाहेबांच्या बाबतीतही तीच स्थिती... मुंबई मराठी पत्रकारसंघाने मात्र सत्यशोधक समाजाच्या १५० वर्षांची दखल घेवून कार्यक्रम आयोजित केला आणि आचार्य अत्रे यांची १२५ वी जयंतीही जोरात साजरी केली. महाराष्ट्रातील असंख्य मराठी साहित्यिक संस्थांना या कशाचीही आठवण राहिलेली नाही. पिंपरीमध्ये नाट्य परिषदेचे १०० वे अधिवेशन झाले. पण, मराठी रंगभूमी जिवंत ठेवणाऱ्या आचार्य अत्रे यांची आठवण ना नाट्य परिषदेला झाली... ना अध्यक्ष प्रशांत दामले यांना झाली. या दृष्टीने पाहिले तर बेळगावातील मराठी जनता खूप ‘सोच’ असलेली आहे. ‘सोच’ हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे. मराठीत या शब्दाला तेवढा नेमका पर्यायी शब्द नाही. ‘दूरदृष्टी’ किंवा ‘विचार’ या पर्यायी शब्दांमधून ‘सोच’चा अर्थ ध्वनीत होत नाही. वैचारिक खोली म्हणता येईल... पण, बेळगावकरांची ही ‘सोच’ थक्क करणारी हाेती. मी स्वत:ला तर धन्य समजतो की, या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बेळगावकरांनी मला दिले, माझे आयुष्य धन्य झाल्यासारखा तो दिवस होता. त्या तीन-चार दिवसांत संयुक्त महाराष्ट्राचा लढा... आणि सीमा प्रश्नासाठी नंतर ३० वर्षे सुरू राहिलेला लढा हे यातील सगळे टप्पे, मोर्चे, लाठीमार, गोळीबार, संसदेवर धडकलेला मोर्चा, ते शाहीर अमरशेख, त्यांचे ते कलापथक... असंख्य नेते, कार्यकर्ते... एखाद्या चित्रपटांसारखे चार दिवस डोळ्यांसमोरून सरकत होते. त्यामुळे कोणतीही तयारी न करता अध्यक्ष भाषणाकरिता उभा राहिल्यावर जणू अत्रेसाहेबांनीच डोक्यावर हात ठेवला आणि दीड तासाच्या भाषणात थेट न्यायदेवतेलाच आवाहन केले. लाेकशाही मार्गाचे सगळे लढे लढून झाल्यानंतर... महाराष्ट्राच्या बाजूने १०० टक्के न्याय आहे, अशी खात्री असताना, लोकेच्छा सिद्ध झाल्यानंतर, हा प्रश्न लोकशाहीने सुटत नाही. निवडणुका जिंकूनही सुटत नाही. म्हणून २००४ साली त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सर्व पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल, अशी अपेक्षा केली पण गेली २० वर्षे महाराष्ट्राचा सीमा प्रश्न सुनावणीसाठीसुद्धा अजून सर्वोच्च न्यायालयाच्या यादीवर आलेला नाही. कर्नाटकचे यात काही नुकसान नाही... ‘अ’ माणसाची जमीन ‘ब’ माणसाच्या ताब्यात असेल तर आणि ‘अ’ माणूस कोर्टात गेला तर ‘ब’ माणसाचे काय नुकसान आहे? सीमा प्रश्नाची नेमकी तीच अवस्था आहे. ‘न्याय मिळत नाही’ म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या दरवाजात सीमा प्रश्न नेला. १५ पंतप्रधानांनी आश्वासने दिली होती. त्यात सर्वपक्षांची सरकारे आणि पंतप्रधान होते. लोकशाहीचे सगळे मार्ग संपले... मराठी माणसं लढून थकली. त्यातले अनेकजण स्वर्गवासी झाले. नवीन पिढी लढून थकली. किती दिवस लढायचे? न्याय महाराष्ट्राच्या बाजूने असताना लढा महाराष्ट्राने करायचा... आताच्या महाराष्ट्र सरकारने सत्तेवर आल्यापासून सीमा प्रश्न काही शिल्लक आहे... सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार गेलेले आहे... ती जबाबदारी आपली आहे...
महाराष्ट्राच्या अॅडव्होकेट जनरलला कामाला लावून महाराष्ट्र सरकारची ही जबाबदारी आहे की, हा प्रश्न किमान सुनावणीला घेतला जाईल, न्याय-अन्यायाचे नंतर.... कोर्टात न्याय मिळतोच असे नाही... तारखा मिळतात... पण सीमा प्रश्नात तारीखही मिळाली नाही... तेव्हा हा न्याय देणार कोण? सुनावणीला प्रश्न घेणार कधी? कोण घेणार? कोण पाठपुरावा करणार? ४० लाख सीमावासिय मराठी बांधवांचा आक्रोश... महाराष्ट्र शासनालाच ऐकू आला पाहिजे. आमच्याच सरकारला ऐकायला कमी येते का? किती जोरात ओरडावे लागेल...? सर्वोच्च न्यायालयात आवाज कसा पोहोचणार? म्हणून भाषणात स्पष्ट भूमिका मांडली की, ‘हे न्यायदेवते, आता तुझ्या डाेळ्यांवरची पट्टी काढ... ४० लाख मराठी भाषकांची मान या प्रश्नात अडकलेली आहे. एकतर आम्हाला फाशी देवून टाक... नाही तर न्याय तरी दे...’ २० वर्षे झाली हा कोणा एका व्यक्तीचा प्रश्न नाही. एका राज्यातील ४० लाख मराठी भाषकांचा प्रश्न आहे. त्याची २० वर्ष सुनावणी होणार नसेल तर सर्वोच्च न्यायालयाखेरीज आता कोणते न्यायालय आहे? हेग च्या अंतरराष्ट्रीय न्यायालयात जायचे का? जनतेच्या न्यायालयाचा पूर्ण कौल मराठी भाषिकांच्या बाजूने लागल्यावरसुद्धा जर न्याय मिळणार नसेल, तर हा मराठी भाषिकांचा पराभव आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही... मराठी भाषेचाही पराभव नाही. आमची भूमिका न्याय्य आहे.. सुनावणीच होत नसेल तर लोकशाहीतील न्यायव्यवस्थेचा हा पराभव आहे, असे मानावे लागेल. किमान सुनावणी घ्या... म्हणणे ऐका... जे दस्तावेज सादर केलेत त्यानुसार न्याय करायचा ठरला तर सीमा भाग महराष्ट्राचाच आहे... मराठी भाषिकांचाच आहे... इथली बोलीभाषा मराठीच आहे... कामकाजाची भाषा मराठीच आहे... याच मुद्यावर न्यायपीठाचे एकमत होईल, ही खात्री होती म्हणून तर सर्वोच्च न्यायालयात विलासराव देशमुख यांनी प्रश्न नेला. पण २० - २० वर्षे जर सुनावणीच नसेल तर तर सुनावणी होण्याचा मार्ग कोणता? तो तरी सांगा... त्यासाठी जो टाहो फोडावा लागेल त्याला सीमा भागातील मराठी माणसांची तयारी आहे. आणि महाराष्ट्रात ज्यांना या प्रश्नाची आस आहे ती जनता सीमा भागाला निश्चित पाठींबा देईल, म्हणून या साहित्य संमेलनात शेवटचा महत्त्वाचा ठराव झाला की....
‘महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नाची सुनावणी तातडीने होईल, यासाठी सर्वोच्च न्यायालयात सर्व कायदेशीर मार्ग चोखाळून आता ही न्यायालयीन लढाई लढण्याकरिता सर्व शक्ती पणाला लावावी... अन्यथा २० वर्षे उलटून गेली... अजून पुढची २५-३० वर्षे अशीच गेली तर... लोकशाहीत मराठी माणसाला न्याय मिळणार नाही, अशी पाटी सीमा भागात मराठी माणसांना लावावी लागेल. आणि सीमा भागाची हद्द सुरू होते, तिथेच ही पाटी मराठी भाषेत लावावी लागेल.’ महाराष्ट्रात न्याय देणाऱ्याचा पत्ता हवा आहे... सीमा भागातील जनता तो पत्ता विचारत आहे... महाराष्ट्र सरकारला गदगदा हालवून आता पुन्हा जागे करावे लागणार आहे... बेळगावातील संमेलनाने पुन्हा एकदा सीमाप्रश्नाचा जागर केला आहे. या संमेलनात मला सहभागी होता आले, हे माझ्या जीवनातील अखेरच्या टप्प्याचे सगळ्यात मोठे सार्थक आहे... असेच मी मानतो. संयुक्त महाराष्ट्र झाला त्या दिवशी म्हणजे १ मे १९६० रोजी शिवाजी पार्क येथील विजयी सोहळयाला आचार्य अत्रे उपस्थित राहिले नाहीत... सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाला नाही म्हणून ते बेळगाच्या सीमा भागातील जनतेच्या सोबत दिवसभर होते. आणि तेथूनच त्यांनी सीमा प्रश्नाचा लढा खांद्यावर घेवून पुन्हा लढण्यासाठी ‘संपूर्ण महाराष्ट्र समिती’ स्थापन केली होती. ते आचार्य अत्रेही १९६९ साली देवाघरी गेले. आता लढायला कोण राहिले आहे? तीन पिढ्या लढून थकल्या... सीमा भागातील मराठी माणूस तरीही मराठी भाषेवर प्रेम करतोच आहे... साहित्य संमेलने भरवतो आहे... आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून संमेलनाची सुरुवात करतो आहे... आचार्य अत्रे यांची ५२ पुस्तके समोर मांडून ठेवली आहेत... आता ते आचार्य अत्रेही नाहीत... ती वाणी नाही... ती लेखणी नाही... तरीही बेळगावातील मराठी माणूस महाराष्ट्राला, मराठी भाषेला आणि सीमा भागासाठी लढाई लढवणाऱ्या अत्रेसाहेबांना विसरला नाही. या संमेलनातून परत येताना बेळगावकरांची ही कृतज्ञाता हृदयात वाहणाऱ्या रक्तासोबत जपून ठेवावी, इतक्या मोलाची वाटली. महाराष्ट्रातील साहित्यिकांना बेळगावचे काय पडले आहे? महाराष्ट्रासाठी आणि सीमा प्रश्नासाठी लढणाऱ्या इतर नेत्यांचे तरी काय पडले आहे? कोट्यवधी रुपयांच्या सरकारी अनुदानावर साहित्य संमेलने आणि नाट्य संमेलने वाजत-गाजत होत राहतील... पण, मराठी माणसाला न्याय मिळण्यासाठी या संमेलनांचा आवाज सत्तेच्या झगमगाटात ऐकूसुद्धा जाणार नाही. सीमा भागातील लढाऊ जनतेने महाराष्ट्रातील आम्हा सर्वांना माफ करावे... आम्ही तुमच्या तळमळीला, जिद्दीला आणि मराठीसाठी जीव टाकणाऱ्या तुमच्या तडफडणाऱ्या मनाची बरोबरी करू शकत नाही... याचीच लाज वाटते....
या संमेलनात कॉ. भालचंद्र कांगो... यांचे ‘आज आचार्य अत्रे हवे होते...’ या विषयावरील भाषण सारा इितहास डाेळ्यांसमोर उभा करून गेले. कोल्हापुरच्या राजाराम कॉलेजमधील राज्यशास्त्राचे प्राध्यापक अवनिश पाटील यांचे भाषण देशातील आजच्या राजकारणाचे सणसणीत पोस्टमॉर्टम होते. ‘फॅसिझमचा लोकशाहीला धोका केव्हा असतो?’ असा त्यांचा विषय होता. त्यांनी तो नेटकेपणाने मांडला.
डॉ. हमीद दाभोळकर यांचे ‘निर्भय जीवन कसे जगावे’ या विषयावरचे भाषण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केले पाहिजे, तसे मी त्यांना सांगूनही आलोय... १०-२० ठिकाणी तरी मीच पुढाकार घेवून आयोजन करतो. शेवटचा कार्यक्रम कवी संमेलनाने झाला. जयसिंगपूरच्या ज्येष्ठ कवयत्री डॉ. सुनंदा शेळके यांनी छान संचलन केले. अनेक कविता त्यांच्या पाठ आहेत... दोन कविंच्या कवितांमधील त्यांची संचलन म्हणून टिपण्णी खूप प्रतिसाद मिळवून गेली. बेळगावच्या संमेलनाने सीमा वासीयांच्या मराठी प्रेमाला उधाण आले. आिण सीमाप्रश्नाच्या लढ्यालाही काहीसे पुन्हा बळ मिळाले. प्रा. आनंद मेणसे आणि त्यांच्या सर्व टीमचे मन:पूर्वक अभिनंदन.... अनेक कार्यक्रमांत भोजनापर्यंतचा कार्यक्रम यशस्वी होतो... श्रोते टिकतात... भोजनानंतरच्या कार्यक्रमाला फार गर्दी नसते. इथे उलटे झाले... भोजनानंतरही सभागृह तुडुंब भरले होते. आणखी एक सांगतो... कोणत्याही संमेलनात इतके रूचकर भोजन असणे फारच दुर्मिळ... (अपवाद पिंपरी-चिंचवडच्या ८९ व्या साहित्यसंमेलनाचा) वालपापडीच्या शेंगा आणि वांग्याची अशी बेळगावच्या संमेलनातील भाजी खायला पुन्हा बहुतेक बेळगावलाच जावे लागेल... या संमेलनासाठी कष्ट घेतलेल्या अनेकांची नावे माहिती नाहीत... असंख्य हात मदतीला आले... आणि हे संमेलन खूप दिवस लक्षात राहिल असे झाले...
सध्या एवढेच...
साहिर लुधयानवी यांच्या शताब्दीनिमित्ताने पहिले संमेलन...‘जाये तो जाये कहाँ’बेळगावला पोहोचल्यावर आनंद मेणसे यांना विचारले, ‘आजचे तिसरे साहित्य संमेलन आहे... पहिले साहित्य संमेलन कधी झाले?’ ते म्हणाले, ‘पहिल्या साहित्य संमेलनाची प्रेरणा साहीर लुधयानवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने घेवून २०२२ साली पहिले साहित्य संमेलन भरवले. कारण साहीर फार मोठा कवी होता...’का कुणास ठाऊक... बेळगावच्या सन्मान हॉटेलमध्ये येताना मला साहिर आठवत राहिला... हिंदी चित्रपटसृष्टीत साहिर लुधयानवी, मजरूह सुलतानपुरी, शकील बदायुनी, शैलैंद्र, राजेंद्र कृष्ण, कैफी आझमी, भरत व्यास, कवी प्रदीप आणखी खूप नावे आहेत... ज्यांच्या लेखणीतून उतरलेल्या गितांनी केवळ शब्दांचा आनंद नव्हे तर एक संदेश दिला जात होता. हिंदी चित्रपटांचे यश प्रामुख्याने हे गीतकार आणि त्याला ज्यांनी संगीत दिले ते नैाशाद, मदन मोहन, रोशन, सचिनदा, कल्याणजी- आनंदी, लक्ष्मी पॅरे, मराठी संगीतकार सी रामचंद, वसंत देसाई अशा अनेक संगीतकार यांचे आहे. अर्थात रफी, तलत, मुकेश, मन्ना डे, नूर जहाँ, लतादीदी, आशा, सुमन कल्याणपूर अशा अनेक गायक-गायिकांचे श्रेय मोठेच आहे. पण मूळचे शब्द लिहीणारा कवी मोठा असल्याशिवाय संगीत आणि गायकाचा काय उपयोग? आधी शब्द मग संगीत... मग गायक.... साहिर तर फार मोठा कवी होता. साहिरचा मूळ अर्थच ‘जादूगार’ असा आहे. साहिर खरोखरच शब्दांचा जादूगार होता... आईवर नित्तांत प्रेम करणारा आणि सामाजिक भान असलेला साहिरची अनेक गीते डोळ्यांसमोरून जात राहिली... ‘नया दौर’मधील ‘साथी हाथ बढाना... एक अकेला थक जाएगा... मिलकर बोझ उठाना...’ हे गीत तर श्रमिकांचे जागतिक गीत बनले. हे गीत अनेक देशांत त्या त्या भाषेत गायले जाते. भारतात अनेक धर्म असतानाही साहीरच्या गीताने सांगितले की,‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा...इन्सान की औलाद हैं... इन्सान बनेगा...’साहिरने धर्म आणि जात कधीही मानली नाही. त्यावेळच्या परिस्थितीत साहिर लिहून गेला... ‘देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान... िकतना बदल गया इन्सान..’ वाजपेयी यांनीही लोकसभेत साहिरच्या गीतांचा उल्लेख केला होता. पक्षबदल होत असताना ते म्हणाले होते, ‘अाज की राजनिती में साहिर का गाना... ‘जाये तो जाये कहाँ’याद आता हैं... हे गाणे बिनाका गीतमालावर अनेक आठवडे आघाडीवर असायचे... त्यावेळी वाजपेयींचा हा किस्सा खूप गाजला होता. ‘मन रे.. काहे ना धीर धरें..’ ‘हम दोनों’ चित्रपटातील ‘अल्ला तेरो नाम...’ हे भजन िकती सुंदर आहे. किंवा ‘रातभर का महिमा अंधेरा’ यातील आध्यात्मिक आशय केवढा मोठा... ‘ना तो कारवाँ की तलाश हैं...’ आणि ‘वक्त’ चित्रपटातील गाजलेली कवाली ‘ये मेरे जोहराजबी’ किती जबरदस्त आहे. ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाए...’ हे ही सािहरचेच गाजलेले गीत... ‘कभी खूद पे... कभी हालात पें रोना आया...’ या त्याच्या गझलही अमर ठरलेल्या आहेत. ‘जिंदगीकी साथ निभाता चला गया...’ आणि ‘अभी ना जाओ छोडकर’ ही ‘हम दोनों’ चित्रपटातील दोन्ही गीते आणि जयदेव यांचे संगीत कधीही म्हातारे होऊ शकत नाही. ‘फिर सुबह होगी...’ या गीताने तर धूम केली होती. आणि आपल्या प्रेयसीच्या बाबतीत साहिरने लिहून ठेवलेल्या या चार ओळी... अनेक प्रियकरांचा प्रेमभंग झाल्यावर आजही खूप आधार वाटत असतील...‘तुम मुझे भूल भी जाओ....तो ये हक हैं तुमको..मेरी बात और हैं...मैने तो मोहोब्बत की हैं...’साहीरची अशी अनेक गाणी डोळ्यांसमोरून जातात. उत्तर प्रदेशातील या महान कवीची आठवण साहित्य संमेलनाची प्रेरणा बनते... आणि साहिरला साहित्य संमेलन अर्पण केले जाते... बेळगावकरांची ‘सोच’... खरोखरच त्या उंचीपर्यंत महाराष्ट्रातील कोणती साहित्य संस्था पोहोचवू शकेल.... त्याचाही पत्ता हवा आहे.📞9892033458
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.