Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची कनार्टकातून केली सुटका

अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची कनार्टकातून केली सुटका

सांगली : सांगलीतील काळीवाट परिसरात अल्पवयीन मुलीच्या आईवर कोयत्याने खुनी हल्ला करून मुलीचे अपहरण करण्यात आले होते. सांगली शहर पोलिस तसेच एलसीबीच्या पथकाने अपहृत मुलीची कर्नाटकातुन सुखरूप सुटका करत हल्ला करणाऱ्या गुंडासह चौघाना अटक केली. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. यात संशयितांनी वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. 

समर्थ भारत पवार (वय २२, रा. जुना बुधगाव रस्ता), राहुल संजय साळुंखे (वय १९, रा. जामवाडी), आदित्य गणेश पवार (वय २०, रा. जामवाडी), शुभम नामदेव पवार (वय २२, रा. गावभाग, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील समर्थ पवार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास समर्थ त्याच्या साथीदारांसह मुलीच्या घराजवळ गेला. तेथे गेल्यावर त्याने मुलीच्या आजोबांना कोयत्याचा धाक दाखवून धक्का देत खाली पाडले. नंतर संशयित पीडित मुलीच्या घरात जबरदस्तीने घुसले. 

पीडित मुलीशी लग्न करणार आहे असे म्हणत मुलीला ओढत नेऊन कारमध्ये बसवले. त्यावेळी मुलीच्या आईने त्याला विरोध केल्यानंतर समर्थ याने मुलीच्या आईवर कोयत्याने हल्ला केला. नंतर संशयित मुलीला कारमधून घेऊन गेले. त्यानंतर मुलीच्या आईने याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयितांना शोधण्यासाठी सांगली शहर पोलिसांचे तसेच एलसीबीचे वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपासानंतर कर्नाटकातील हरिहर येथून पथकाने समर्थसह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. तसेच अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार (क्र. एमएच १० सीएक्स ६७९७) जप्त करण्यात आली आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे सहायक निरीक्षक संजय गोडे, एलसीबीचे सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पोवार, बिरोबा नरळे, संदीप गुरव, विक्रम खोत, संदीप पाटील, श्रीपाद शिंदे, सचिन शिंदे, गौतम कांबळे, संतोष गळवे, अभिजित माळकर, योगेश सटाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.