Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सात मैत्रिणींनी ८० रुपयांच्या मदतीनं सुरू केला व्यवसाय, आज आहे १६०० कोटींचा टर्नओव्हर

सात मैत्रिणींनी ८० रुपयांच्या मदतीनं सुरू केला व्यवसाय, आज आहे १६०० कोटींचा टर्नओव्हर

'शादी, उत्सव या हो त्योहार लिज्जत पापड़ हो हर बार… कर्रम कुर्रम - कुर्रम कर्रम...।' हे जिंगल तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल. त्यावेळी ही जाहिरात सर्वांच्याच ओठावर होती. जाहिरातीसोबतच पापडाची चवही लोकांना आवडली. त्या काळात पापड म्हणजे लिज्जतच असं समीकरण बनलं होतं. सध्या पापड तयार करणारे अनेक ब्रँड्स असले तरी आजही पापड खरेदी करायला दुकानात गेलात तर तोंडातून पहिलं नाव निघतं ते म्हणजे लिज्जत. आज कोट्यवधींची असलेली लिज्जत ही कंपनी अवघ्या ८० रुपयांमध्ये सुरू होती हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

आपला फावला वेळ घालवण्यासाठी सात महिलांनी असं काही केलं ज्याच्या परिणामाचा कोणालाच अंदाज आला नसेल. साधारण १९५९ सालची गोष्ट आहे. मुंबईतील गिरगाव येथे राहणाऱ्या जसवंती बेन, पार्वतीबेन रामदास थोडाणी, उजमबेन नारनदास कुंडलिया, बानुबेन तन्ना, लागूबेन अमृतलाल गोकाणी, जयाबेन विठलानी या ७ मैत्रिणींनी दिवसभरातील मोकळ्या वेळेत काही काम करायचे ठरवलं.त्यांनी घराच्या गच्चीवर पापड बनवून विकायचा निर्णय घेतला. त्यांना पुरुषोत्तम दामोदर दत्तानी यांनी मदतही केली. आपल्याच लोकांकडून ८० रुपये उसने घेऊन उडीद डाळ, हिंग, मसाले वगैरे विकत घेतले आणि घराच्या गच्चीवर पापड बनवायला सुरुवात केली.


पहिल्या दिवशी त्यांनी एकूण ५ पाकिटं पापड बनवले. बाजारात ते विकून त्यांनी यातून ५० पैसे कमावले. त्यावेळी आठ आणे ही मोठी रक्कम होती. पहिल्या कमाईनं सातही मैत्रिणींचा उत्साह अजून वाढला. त्यानंतर नफा हळूहळू १ रुपये, १० रुपये, १०० रुपये आणि ६००० रुपयांपर्यंत वाढला. १९५९ मध्ये लिज्जत पापडनं ६००० रुपये कमावले. हा पैसा त्यांनी मार्केटिंग किंवा जाहिरातीऐवजी पापडाचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी वापरला. हळूहळू कामं वाढत गेली, माणसं जोडायला लागली. त्यानंतर त्यांनी सहकारी संस्थेची नोंदणी केली. लिज्जत पापडचे संपूर्ण ऑपरेशन ही सोसायटी करते. १९६२ मध्ये संस्थेचे नाव 'श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड' असं ठेवण्यात आलं.

आज ४५ हजारांहून अधिक महिला लिज्जत पापडशी जोडल्या गेल्या आहेत. त्या कंपनीत निरनिराळ्या भूमिका बजावत आहेत. संस्थेतील सर्वजण एकमेकांना 'बहीण' म्हणून संबोधतात. पहाटे साडेचार वाजल्यापासून येथे काम सुरू होतं. देशभरात ६० हून अधिक केंद्रे आहेत ज्या ठिकाणी पापड बनवण्याचं काम केलं जातं. पण विशेष बाब म्हणजे चव सगळीकडे सारखीच असते. २००२ साली लिज्जत पापडनं ३०० अब्ज डॉलर्सची कमाई केली. २०२२ मध्ये त्याची एकूण संपत्ती १,६०० कोटी रुपये होती. लिज्जतच्या नावावर आतापर्यंत ५.५ अब्ज पापड विकले गेले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.