Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चिपळूणचे कृषी-प्रदर्शन कोकणाने अनुभवले भव्य-दिव्य-अपूर्व - मधुकर भावे

चिपळूणचे कृषी-प्रदर्शन कोकणाने अनुभवले भव्य-दिव्य-अपूर्व - मधुकर भावे

 
कोकणात काय नाही? महाराष्ट्रातील अनेक तालुके आणि जिल्हेच्या जिल्हे पावसाअभावी तडफडत असताना कोकणामध्ये धुँवाधार पडणारा पाऊस... सह्याद्रीच्या रांगांनी चहूबाजुला हिरवा गार असणारा कोकण जागतिक किर्तीचा आंबा, काजू, फणस... देशातील सर्वोत्तम तांदूळ पिकवणारा प्रदेश... दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि ७०० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा... मासेमारीचा व्यवसाय... उत्तम भातशेती... उत्तम भाजीपाला...  महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री देणारा हा प्रदेश... भारतरत्न विनोबा....  भारतरत्न पा. वा. काणे... आणि कितीतरी मोठे साहित्यिक या कोकणातीलच... ती यादी हा वेगळ्या लेखाचा विषय होईल... कोकणात भरभरून सर्वकाही आहे... तरीही शेकडो वर्षे मागासलेला भाग म्हणून कोकणचा उल्लेख होतो... ‘मनीआर्डरवर जगणारा प्रांत....’ अशीच कोकणाची जुनी ओळख.... माणसं वरून फणसासारखी काटेरी... पण, मनाने देवगडच्या आंब्यासारखी गोड... या कोकणात अनेक दिग्गज नेते झाले... पण, त्यातील बहुसंख्य नेत्यांचे मोठेपण मान्य करूनसुद्धा, कोकणला नेमके काय हवे... याची नस त्यांना सापडली नव्हती... इथं नेमकं काय घडू शकते.... दिशा कशी देता येईल... आणि कोकणच्या कर्तृत्त्वात नेर्तृत्त्व दडलेले आहे. याची जाणीव निर्माण करून देण्यात कोकणची अनेक वर्षे वाया गेली. त्यामुळे कोकण मागास राहिला... अल्पसंतुष्ट राहिला... पण, गेल्या काही वर्षांत सहकारातील एक नेता त्याच्यात दडलेला कार्यकर्ता आणि त्याने कोकणात फुलवलेला सहकार.... ते आहेत सुभाषराव चव्हाण.... चिपळूण नागरी  सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष.... १९९२ साली रत्नािगरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महाव्यवस्थापक म्हणून ते निवृत्त झाले. या राज्य बँकेचे त्या-त्या जिल्ह्यातील अनेक महाव्यवस्थापक निवृत्त झाल्यावर घरी बसले असते. पण, सुभाषरावांनी जो प्रकल्प हाती घेतला त्यातून सहकाराचे नवे पर्व कोकणात सुरू झाले. ‘चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था’ सुभाषरावांमुळे उभी राहिली. आज त्या संस्थेच्या ५० शाखा विस्तारल्या आहेत.... पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराडमध्ये म्हणजे.... पश्चिम महाराष्ट्रातील ‘सहकाराच्या बालेकिल्ल्यात’ एका कोकणातील कार्यकर्त्याने चिपळूण नागरी पतपेढीच्या शाखा उघडून पराक्रम करावा, त्याला तुडुंब प्रतिसाद मिळावा.... हा सगळा चमत्कार  सुभाषरावांनी करून दाखवला. चिपळूणच्या बहाद्दूर शेख नाक्यावरील पतपेढीचे त्यांचे कार्यालय हे केवळ ‘कर्जवाटप किंवा कर्जवसुली’ यासाठीचे कार्यालय नाही...  कोकणाच्या परिवर्तनाची ती पवित्र वास्तू ठरली आहे. एक लाख ४० हजार सभासद.... एक हजार कोटींच्या वर ठेवी... नफ्यात चालणारी पतपेढी... ‘आपली माणसं.... आपली संस्था....’ या घोषवाक्याने साऱ्या कोकणाचा कायापालट करून शब्दश: हजारो माणसांना सुभाषरावांनी शून्यातून घडवले. ज्यांच्यावळ काही नव्हते... अशी अनेक कुटुंबे आज संपन्न झाली... स्वत:च्या उद्योग सुरू करून स्वत:च्या पायावर उभी राहिली....  अशा या चिपळूण नागरी पतसंस्थेने, संस्थेत कसलेही राजकारण आणू न देता... कोकणाचा आधार म्हणून मिळवलेला नावलौकीक आणि त्याला साथ देणारी सुभाषरावांची संपूर्ण टीम.... त्या पतपेढीच्या कार्यकारी संचालक सपना यादव या कर्तबगार महिलेने ‘सहकारात महिला किती प्रभावीपणे काम करू शकतात...’ हे दाखवून दिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे सहकारातील महाराष्ट्रातील आजची सर्वात प्रभावी कामगिरी करणारी महिला म्हणून सपना यादव यांचा उल्लेख करावा लागेल.... 

ही सगळी प्रस्तावना याकरिता केली की, याच चिपळूण नागरी सहकारी पतपेढीने शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायासाठी कर्ज वाटप केल्यामुळे, चिपळूणमध्ये वर्षभरापूर्वीच सुरू केलेल्या वाशिष्ठी दूग्ध प्रकल्पाला शेतकऱ्यांनी उचलून धरले. हा प्रकल्प प्रशांत यादव या तरुणाच्या संकल्पनेतून साकार झाला... कोकणात पी. के. सावंत हे कृषीमंत्री असताना त्यांनी दुग्ध प्रकल्पाचा प्रयत्न केला होता...  शेतीला कृषी-उद्योगाची साथ असल्याशिवाय हा व्यवसाय फायद्याचा होणार नाही.... हे मुख्य शास्त्र कोकणातील शेतकऱ्यांना समजलेले नाही. जगातील न्युझिलंड, डेनमार्क आणि हॉलंड या देशातील चाऱ्याइतका कसदार हिरवा चारा कोकणात आहे... त्यामुळे दुग्धउत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकते...  कोकणात एक सहकारी डेअरी होती... २० वर्षांपूर्वी ती बंद पडून गंजून गेली... ती सुरू करण्याचे प्रयत्न झाले... पण कोकणाकडे लक्ष द्यायला कोणत्या सरकारला वेळ आहे? कोकणचे मंत्री खूप झाले... चार मुख्यमंत्री झाले... ते आपापल्या परिने मोठे होते. पण,  कोकणाला मोठे करण्याचे काम त्यांनी फारसे केले नाही.  हे सत्य आहे... प्रशांत यादव या तरुणाच्या संकल्पनेतून या डेअरीची कल्पना अशी काही मूर्त स्वरूपात एक वर्षाच्या आत पूर्ण झाली. या डेअरीने दुधाचे संकलन सुरू केले. चिपळूण परिसरातील एक टीम तयार करून या संकलनाच्या कामाला सुरुवात झाली. वर्षभरात डेअरी उभी राहिली... त्या डेअरीला नाव दिले ते चिपळूणमधून खळाळून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीचे....  ‘वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रोडक्ट प्रा. लि.’ ही संस्था स्थापन झाल्यावर कोकणात चमत्कार घडला. कोकणातील नैराश्याचे एक वातावरण शेतकऱ्यांनी झटकून टाकले. चिपळूण नागरी पतपेढीने कोकणातील शेतकऱ्याला २४ तासांत गायी-म्हशींसाठी कर्ज उपलब्ध करून दिली... आणि बघता बघता या वाशिष्ठी डेअरीने दररोज ३० हजार लिटर दूधाचे संकलन करण्याचा उपक्रम सुरू केला. आज बघता बघता ही डेअरी संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रतिष्ठेची दुग्धव्यवसायातील महत्त्वाची संस्था बनली. 

अनेकांना रोजगार मिळाला. पुण्यासारख्या नगरीत झी चॅनलतर्फे एका परिषदेत या डेअरीला अवघ्या एक वर्षातच  सन्मानित केले. शेतकऱ्याला पूरक व्यवसाय मिळवून देण्याकरिता आणि रोजगार निर्माण व्हावा म्हणून ७ सप्टेंबर २०२१ रोजी भूमिपूजन झालेली डेअरी ५ फेब्रुवारी २०२३ रोजी दुग्धोत्पादन सुरू करते अाणि या डेअरीने घोषणा केली... ‘कणा कणांत कोकण... मनामनात कोकण...’ हा डेअरी प्रकल्प पहायला महाराष्ट्रातील अनेक दुग्धव्यवसायतील तज्ञा.... म्हणजे अगदी ‘गोकुळ’पासून ते ‘महानंदा’ पर्यंत सर्वांचे मोर्चे चिपळूणकडे वळले. चिपळूण नागरी पतपेढीने सावकाराच्या तडाख्यातून गरीब शेतकऱ्याची सुटका २५ वर्षांपूर्वीच केली होती. आता या दुग्धप्रकल्पामार्फत कोकणातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याला फार मोठा पूरक व्यवसाय  उभा राहिला आहे. सरकारी दरापेक्षा अधिक दर या डेअरीमार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जातो... आणि दर आठवड्याला त्यांच्या खात्यात चेकद्वारे पैसे जमा होतात...  हा प्रकल्प आता महाराष्ट्राचा एक प्रभावी प्रकल्प अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली आहे आणि त्याचे सगळे श्रेय सुभाषराव चव्हाण... प्रशांत यादव... आणि सपना यादव यांना आहे.  त्यांच्यासोबत राबणारी टीम... अशी निष्ठावान टीम मिळणे हे आजच्या काळात अितशय दुर्मिळ आहे. 

या वाशिष्ठी डेअरीने ५,६,७ जानेवारी २०२४ असे सलग तीन दिवस चिपळूण शहरात भरवलेले कृषी आणि पशुधन प्रदर्शन खूप गाजले. केवळ चिपळूण तालुका नव्हे तर अख्ख्या कोकणातील हजारो लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली... उत्साहाने माहिती घेतली... शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्याख्यानांना गर्दी केली. त्या निमित्ताने उभ्या केलेल्या स्टॉलमध्ये बचत गटाच्या महिलांनी त्यांच्या कर्त़ृत्त्वाने फार मोठे काम उभे करून दाखवले. याच प्रदर्शनात ६० लिटर दूध देणारी गाय... म्हैस... बछड्याचे पालन-पोषण....  कसे करावे, याचे प्रात्यक्षिक... पशूधनाचे प्रदर्शन पहायला... एवढी गर्दी झाली की, या प्रदर्शनातील १२५० किलोचा रेडा... हा सगळ्यात मोठा प्रदर्शनातील ‘हिरो’ ठरला. त्याची विक्री दीड कोटींना झाली...  प्रशांत यादव आणि सपना यादव यांनी जवळपास एक महिना मेहनत घेऊन या प्रदर्शनाचे जे नियोजन केले होते ते पाहून सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील कार्यक्रमाचे उद्घाटन करताना म्हणाले की, ‘मी अनेक प्रदर्शने पाहिली... पण कोकणामधील हे तुमचे काम थक्क करणारे आहे... रात्री १२ वाजता हाक मारा.... तुम्हाला विकासाच्या कामात कधीही मदत करू....’ 

या प्रदर्शनाला जवळपास ३ दिवसांत २ लाखांच्या वर शेतकरी आणि शहरी लोकांनी भेटी दिल्या.  कोणत्याही प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे नेहमीच होतात. पण एकदा का उद्घाटन झाले की त्या संपूर्ण प्रदर्शनातील आकर्षण संपून जाते... इथे उलटे झाले... उद्घाटनानंतरच्या प्रत्येक व्याख्यानाला, ‘डॉग शो’, ‘संगित रजनी’ला तुडुंब प्रतिसाद मिळाला. चिपळूणकरांनी असे कार्यक्रम कधी पाहिलेच नव्हते... पण, मला भावलेली गोष्ट अशी की, या प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी संवाद साधला गेला. ६ व्याख्याने झाली... ती राजकीय व्याख्याने नव्हती...  शेती आणि शेतीचे विषय... वक्तेही नामवंत नव्हते.... पण, कृषी विद्यापीठातील अभ्यासू होते....  दापोलीचे कृषी विद्यापीठ ही त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कोकणाला दिलेली मोठी देणगी... याच नाईक साहेबांनी महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे निर्माण केली. त्यात राहूरी (पश्चिम महाराष्ट्र) , अकोला(विदर्भ), दापोली (कोकण) आणि परभणी (मराठवाडा).... या चारही कृषी विद्यापीठांनी फार मोठे मोलाचे काम आणि संशोधन केलेले आहे. 

चिपळूणच्या सहा व्याख्यानांमध्ये डॉ. डी. टी. भोसले... डॉ. ज्ञाानेश्वर जगताप.... डॉ. प्रफुल्ल माळी यांची भाषणे मी एक श्रोता म्हणून नुसती ऐकली नाहीत तर माझ्या डोक्यात ‘सेव्ह’ करून घेतली... किती नवीन माहिती त्यांनी यावेळी दिली. एका हळदीच्या उत्पादनात शेतकरी कसा श्रीमंत होऊ शकतो... याचे डॉ. माळी यांनी केलेले विश्लेषण थक्क करणारे होते.  ंबा आणि काजू या बरोबरच हळदीची शेती अधिक उत्पन्न देणारी आहे. हे त्यांनी शेतकऱ्यांच्या मनात िबंबवले. पशु धनांना होणाऱ्या रोगांचे विश्लेषण करताना डॉ. भोसले यांनी अगदी सहजपणे सांगितले की, गाईचे दूध काढल्यानंतर तिला अर्धा-पाऊण तास बसू देवू नका... दूध काढून झाल्यावर गाय लगेच खाली बसली की, तिच्या आचळांची भोके मोठी असताना विषाणू त्यातून लगेच प्रवेश करतात.... त्यातून गाईला कॅन्सरही होऊ शकतो... प्रत्येक वक्त्याने अितशय चांगली माहिती देत हे कृषी प्रदर्शन बौद्धीकदृष्ट्या खूप उंचीवर नेले. ही सहाही व्याख्याने छोटीशी पुस्ितका करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प प्रशांत यादव यांनी जाहीर केला.... आणि तोही सर्वांना भावला... 

५ जानेवारी रोजी प्रशांत यादव यांचा ४९ वा वाढदिवस... या कर्तबगार तरुणाचा यानिमित्ताने अगदी उत्स्फुर्तपणे शेकडो लोकांनी सत्कार केला. कोकणाला सकारात्मक नेतृत्त्व कसे हवे आहे.... ते जाहीरपणाने याचवेळी काही तरुणांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी ६ जानेवारी दिवस होता.... हा दिवस म्हणजे पत्रकार दिन... बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती...  १८३२ साली पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ बाळशास्त्री यांनी सुरू केले.  त्याच दिवशी चिपळूणातील प्रदर्शनात चिपळूणच्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. पण त्याहीपेक्षा मनाला भिडलेला मोठा सत्कार म्हणजे ‘दैनिक सागर’ च्या संपादिका.... श्रीमती शुभदा नाना जोशी यांचा... त्यांच्या घरी जाऊन प्रशांत यादव यांनी सत्कार केला. दुर्दैवाने नाना गेल्यानंतर ज्यांनी खंबीरपणे ‘सागर’  त्याच प्रभावाने सुरू ठेवला त्या ‘नानी’ कुठेही बाहेर जात नाहीत.... पण नानांनी सुरू केलेला ‘सागर’ त्याच दर्जेदारपणे आणि कणखरपणे.... जाहिराती नसताना नानींनी ज्या हिंमतीने चालवला आहे.... या ज्येष्ठ पत्रकार बहिणीच्या पायावर डोकं ठेवावे... एवढी त्यांची पत्रनिष्ठा आम्हा सर्व पत्रकारांसाठी थक्क करणारी आहे.  चिपळूणचा तीन दिवसांचा कृषी प्रदर्शन  कार्यक्रम दणदणीत झाला... यशस्वी झाला... शेतकऱ्यांसाठी आत्मविश्वास वाढवणारा झाला... अंबा, काजू याखेरिज उत्पन्नाची नवीन साधन भाजी-पाला शेती आणि मसाला शेतीत कशी आहेत, याचे प्रात्यक्षिक पाहता आले. त्याचा  शेतकऱ्यांना खूप फायदा होईल.  चिपळूणमध्ये असा कार्यक्रम कधीच झाला नव्हता... हे सर्वमान्य...  या कार्यक्रमाचा समारोप नानींचा घरी जाऊन झालेला त्यांचा सत्कार हा अतिशय भावनात्मक आणि हृदयाला भिडणारा कार्यक्रम वाटला. याबद्दल प्रशांत यादव यांचे मन:पूर्वक अभिनंदन... त्यांच्या पुढील वाटचालीला मन:पूर्वक शुभेच्छा!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.