Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू तशी वाईटच! पण देशी भिंगरी इतका वास का मारते?

दारू तशी वाईटच! पण देशी भिंगरी इतका वास का मारते?

मुंबई : अल्कोहोलबद्दल चर्चा करायचं म्हटलं तर, व्हिस्की, रम किंवा व्होडका असे शब्द समोर येतात. देशी दारूची आवड असणारे बहुतांश मद्यप्रेमी लहान शहरं किंवा खेड्यापाड्यांमध्ये आढळतात. देशी दारूची दुकानंही वेगळी असतात. सामान्य संभाषणात या दुकानांना ठेका किंवा दारूचा अड्डा म्हणतात. याउलट विदेशी दारूची दुकानं सहसा श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय जनता राहत असलेल्या भागात असतात. देशी दारूची दुकानं अशा भागांत असतात जिथे लोकसंख्येचं आर्थिक उत्पन्न कमी असतं. ही दारू स्थानिक पातळीवर तयार केली जाते. ज्या ठिकाणी ही दारू तयार केली जाते, त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये तिची विक्री होते. भारतात देशी दारू पिणाऱ्यांची संख्या आजही जास्त आहे.

मळी किंवा इतर कृषी उत्पादनांपासून निर्मिती

देशी आणि विदेशी दारूच्या चवीमध्ये फरक असला, तरी त्यांच्या निर्मितीमध्ये कोणताही विशेष फरक नाही. दोन्ही प्रकारची दारू बनवण्याची पद्धत जवळपास सारखीच आहे. अनेक दशकांपासून चालत आलेल्या पारंपरिक प्रक्रियेतून देशी दारू तयार केली जाते. मळी किंवा इतर कृषी उत्पादनांपासून तिची निर्मिती होती. फर्मेंटेशन आणि डिस्टिलेशन प्रक्रियांचा वापर दारू निर्मितीमध्ये केला जातो. देशी दारू पॉलिथिनच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये उपलब्ध असते. देशी दारूला देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत.


प्युरिफाइड स्पिरिट म्हणजे देशी दारू

देशी दारू हे एक प्रकारचं प्युरिफाइड स्पिरिट असतं किंवा ते डिस्टिल्ड असतं. विदेशी दारूच्या उत्पादक कंपन्यादेखील स्थानिक दारू उत्पादक कंपन्यांकडून हे स्पिरिट खरेदी करतात. नंतर त्यात वेगवेगळे फ्लेव्हर्स घालून विदेशी किंवा इंग्रजी दारू बनवली जाते. देशी दारूमध्ये कोणताही फ्लेव्हर वापरला जात नाही. ज्या कच्च्या मालापासून ती बनवली जाते तीच चव या दारूला असते. त्यामुळेच देशी दारूचा वास उग्र असतो.

विक्रीमध्ये दर वर्षी वाढ

भारतात विकल्या जाणार्‍या एकूण दारूमध्ये दोन तृतीयांश प्रमाण देशी दारूचं आहे. एका माहितीनुसार, भारतात देशी दारूच्या सुमारे 242 दशलक्ष बाटल्यांची विक्री होते. हे प्रमाण देशातल्या मद्य उद्योगाच्या 30 टक्क्यांहून अधिक आहे. तसंच त्यात दर वर्षी सात टक्के वाढ होत आहे. देशी दारूमध्ये अल्कोहोलचं प्रमाण 42.5 टक्के इतकं असतं. या दारूचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. कारण, ही दारू फक्त एकदा डिस्टिल्ड (शुद्ध) केली जाते.


देशी दारूची विविध नावं

हिरो, जॉय, कॅप्टन आणि दिल से हे भारतातले देशी दारूचे सर्वांत मोठे ब्रँड आहेत. पश्चिम बंगाल आणि झारखंडसारख्या पूर्वेकडच्या राज्यांमध्ये ‘टॉल बॉय’ची सर्वाधिक विक्री होते. काही ठिकाणी या दारूला हीर रांझा, घूमर, जीएम संत्री आणि जीएम लिंबू पंच असंही म्हणतात.

भारतात सर्वाधिक देशी मद्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ग्लोबस स्पिरिट्सने दिलेल्या माहितीनुसार, देशी दारूच्या सुमारे डझनभर ब्रँड्सकडे एकूण बाजारपेठेचा 30 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा आहे. उर्वरित हिस्सा आयएफबी अॅग्रो लिमिटेड, हरियाणा डिस्टिलरीज लिमिटेड, असोसिएटेड अल्कोहोल अँड ब्रुअरीज लिमिटेड आणि पिकॅडिली अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्याकडे आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.