वकील दाम्पत्याचा निर्घृण खून
राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेल्या आढाव दाम्पत्याचा आज शुक्रवारी (दि.२६) निर्घृण खून झाल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पती – पत्नीचा मृतदेह उंबरे (ता.राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहिरीत आढळून आला.
अॅड. राजाराम जयवंत आढाव (५२) व अॅड. मनिषा आढाव असे या दाम्पत्याचे नाव आहे. सायंकाळी त्यांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. दोघांनाही दगड बांधून विहीरीत टाकून दिल्याचे निदर्शनास आले आहे. पैशाच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव हे दाम्पत्य गुरूवारी (दि.२५) दुपारपासून बेपत्ता होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. राहुरी न्यायालय परिसरात आज शुक्रवारी (दि.२६) अॅड. आढाव यांचे चारचाकी वाहन (क्र. एम एच १७ एइ २३९०) बेवारस अवस्थेत आढळून आले. या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता या वाहनात हातमोजे व एक बूट आढळून आला. तसेच अॅड. आढाव यांचे एटीएम आयसीआय बँकेसमोर बेवारस आढळून आले.
त्यामुळे या घटनेबाबत शंका – कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. या वाहनाची तपासणी करीत असताना या वाहनाजवळ असणाऱ्या एका चारचाकी वाहनातील चालकाने पोलिसांना पाहून पळ काढला. त्यांनंतर पोलिसांना तपासाची चक्रे फिरवत तपासाला गती दिली. मोबाईल फोन व सीसीटिव्ही कॅमेर्याच्या सहाय्याने एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीतून दाम्पत्याचा खून करून विहिरीत टाकल्याची माहिती समोर आली. या खून प्रकरणामध्ये चार आरोपींचा समावेश असल्याचेही माहिती समोर आली आहे. उंबरे (ता.राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहिरीत दुपारी तीन वाजल्यापासून दोघांचा शोध सुरू होता. रात्री उशिरा दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. मृतदेहांना दगड बांधून विहिरीत टाकण्यात आले होते. दरम्यान, या खून प्रकरणामुळे राहुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.