Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुरुजींच्या बँकेत राजकारण उफाळले; नोकरभरतीच्या चौकशीचे आदेश...

गुरुजींच्या बँकेत राजकारण उफाळले; नोकरभरतीच्या चौकशीचे आदेश...


गुरुजींचा राजकीय अड्डा बनलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत बेकायदेशीर नोकरभरती सुरू आहे. त्याविरोधात तक्रार करण्यात आली असून त्याअनुषंगाने सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष लेखापरीक्षकांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करून बँकेची दप्तर तपासणी व चौकशी अहवाल देण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. या भरतीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने आले आहेत.

प्राथमिक शिक्षक बँकेच्या चौकशी आदेशाबाबतची माहिती माजी अध्यक्ष जगन्नाथ कोळपे, यू. टी. जाधव, पोपटराव सूर्यवंशी, बँकेचे संचालक सचिन खरमाटे, शिवाजी लेंगरे, यशवंत गोडसे, संजय कबीर, शाम ऐवळे, जनार्दन मोटे, किरण सोहनी, विजय पवार यांनी दिली. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत 2021 च्या वार्षिक सभेत कर्मचारीसंख्या 150 ही निर्धारित करण्यात आली होती. त्याला सभासदांनी मंजुरी दिली होती. आमदार कानडेंचा हल्लाबोल

त्या निर्णयाला धाब्यावर बसवून सत्ताधाऱ्यांनी कर्मचारी भरती केली आहे. शिक्षक बँकेतील भरतीबाबत शासनाचे निर्णय, नियम धाब्यावर बसविण्यात आले. कर्मचारी संघटना, कामगार न्यायालय आणि बॅंक यांच्या करारान्वये भरती झाली नाही. सर्व काही कारभार नियमबाह्य सुरू असून त्याविरोधात सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांसह संचालकांची गोची झाली आहे.

स्वतःचे हात ओले करून घेण्यासाठी सत्ताधारी संचालकांनी बेकायदेशीर कर्मचारीभरती आरंभली असून या चौकशीमुळे भरतीला लगाम लागणार आहे. आम्ही इतक्यावरच न थांबता न्यायालयात धाव घेऊन सत्ताधाऱ्यांचे डाव हाणून पाडणार आहोत. येणाऱ्या कालावधीत बेकायदेशीर कामाबाबत संचालकांना न्यायालयात जाब द्यावा लागेल, असा इशाराही तक्रारदार माजी अध्यक्ष जगन्नाथ कोळपे, यू. टी. जाधव, पोपटराव सूर्यवंशी यांनी दिला.

सहकार आयुक्तांनी शिक्षक बँकेच्या बेकायदेशीर कर्मचारीभरतीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी त्याबाबत विशेष लेखापरिक्षकांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे निर्देश असून त्यानिमित्ताने भरतीचा गैरव्यवहार चव्हाट्यावर येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

जागा खरेदीची चौकशी होणार...

मिरज येथे सत्ताधाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने जागा खरेदीचा उद्योग केला आहे. त्याचीही लवकरच चौकशी होणार असल्याचे कोळपे यांनी सांगितले. सभासदांच्या पैशांचा गैरवापर आणि नियमबाह्य उद्योगामुळे बँकेचा कारभार चर्चेत आहे. सभासदांच्या हिताला हरताळ फासणाऱ्या शिक्षक बँकेतील सत्ताधाऱ्यांचे कारनामे उजेडात आणून सनदशीर मार्गाने आम्ही लढा उभारत असल्याचे त्यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.