Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कौटुंबिक वादात महिलेचा दगडाने ठेचून खून

कौटुंबिक वादात महिलेचा दगडाने ठेचून खून


सागंली : भावा-भावाच्या वादात एका महिलेचा दगडाने ठेचून खून करण्याचा प्रकार कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे शनिवारी सायंकाळी घडला. या मारामारीत महिलेच्या पतीसह दीरही जखमी झाला असून या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना रविवारी पोलीसांनी ताब्यात घेतले. नेवरी (ता. कडेगाव) येथे कौटुंबिक कारणातून अजय महाडिक व शरद महाडिक यांच्यात वाद झाला. या वादात प्रियांका अजय महाडिक (वय २५) हिच्यासह पती अजय महाडिक आणि चुलत दीर नवनाथ बाबूराव महाडिक यांच्यावर हल्ला करण्यात आला. महिलेला दगडाने ठेचून धारदार हत्याराने वार करण्यात आले. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत कडेगाव पोलिसात नोंद झाली आहे. याप्रकरणी मृत महिलेची सासू तारामती आप्पासाहेब महाडीक, दीर शरद आप्पासाहेब महाडीक, जाऊ उवला शरद महाडीक, पुतण्या अभिषेक शरद महाडीक या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शरद व अजय महाडिक हे सख्खे भाऊ आहेत. शरदचा मुंबई येथे रिक्षाचा व्यवसाय आहे. तो पंधरा दिवसांपूर्वी नेवरी येथे आला. शनिवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबात भांडण सुरू झाले. रागाच्या भरात दीर शरद आणि पुतण्या अभिषेक याने धारदार शस्त्राने प्रियांकाच्या डोक्यावर व गळ्यावर तसेच, तिचा पती अजयच्याही डोक्यावर वार केले. त्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला. तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मयत महिलेचा चुलत दीर नवनाथ महाडीक जखमी झाला. त्यास स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास कडेगाव पोलीस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.