Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा राडा; दारु पिऊन घातला गोंधळ

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा राडा; दारु पिऊन घातला गोंधळ


पुणे : पुण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने थर्टीफस्टच्या रात्री वडिल राहत असलेल्या सोसायटीत मद्याच्या नशेत तुफान राडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तिने अश्लील भाषेत शिवीगाळ तर केलीच परंतु, पोलिसांच्या गाडीच्या काचा देखील फोडत वाहन चालविणाऱ्या कर्मचाऱ्याचा गळा दाबला. तर, सोसायटीतील नागरिकांना शिवीगाळ देत त्यांच्यामागे दगड घेऊन धावल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

जवळपास दोन ते अडीच तास हा सर्व प्रकार सुरू होता. कंट्रोलच्या माहितीनुसार पोलीस सोसायटीत गेल्यानंतर पोलिसांना देखील तिने मारहाण केली. याप्रकरणी संबंधित ३० वर्षीय मुलीवर वानवडी पोलीस ठाण्यात शिवीगाळ, मालमत्तेचे नुकसान व मद्य पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, संबंधित मुलगी पुण्यात कर्तव्यास असलेल्या पोलीस निरीक्षकांची आहे. पोलीस निरीक्षक शहर पोलीस दलात एका शाखेत कर्तव्य बजावतात. पोलीस निरीक्षक वानवडीतील एका उच्चभ्रु सोसायटीत राहण्यास आहेत. तर, मुलगी दुसरीकडे राहते.

दरम्यान, थर्टीफस्टच्या रात्री मुलगी त्यांना भेटण्यासाठी सोसायटीत आली होती. ती दारूच्या नशेत होती. त्यामुळे तिला गेटवर आडवण्यात आले. तेव्हा तिने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. हा गोंधळ काहीच वेळात इतका वाढला की या सोसायटीतील सर्व रहिवाशी खाली जमा झाले. तिने सुरक्षा रक्षकांना हमरी-तुमरी केली. त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. मोठ-मोठ्या आरडाओरडा करत ती मारण्यास देखील धाऊ लागली. त्यामुळे रहिवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.

हा गोंधळ वाढल्याने नागरिकांनी पोलिसांच्या नियत्रंण कक्षाला माहिती कळवली. तेव्हा वानवडी पोलिसांचे पथक त्याठिकाणी दाखल झाले. परंतु, तरीही ती ऐकण्याच्या मनस्थिती नव्हती. तिची आई खाली आल्यानंतर तिनेही आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती कोणाचीही ऐकत नव्हती. तिने पोलिसांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तत्पुर्वी सोसायटीतील महिलांना शिवीगाळ करत त्यांच्या मागे दगड घेऊन धावली. त्यामुळे तर गोंधळ आणखीनच उडाला.

पोलिसांना हेप्रकरण जरा जास्तच वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी महिला अंमलदार व पोलीस व्हॅन बोलवली तिला पोलीस व्हॅनमधून नेण्यास सुरूवात केल्यानंतर तिने आणखीच गोंधळ घातला. वाहनाची काच फोडली. त्यासोबतच चालक असलेल्या पोलिसाचा खिडकीतून हात घालून गळा देखील दाबल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतरही ती गोंधळ घालत होती. पोलिसांनी शेवटी तिच्यावर गुन्हा नोंद केला. तिला नोटीस देऊन सोडण्यात आले. दरम्यान, तिला पोलीस निरीक्षक असलेल्या वडिलांनी फोन केला असता त्यांनाही तिने उलट-सुलट बोलत वाद घातला असल्याचे समोर आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.