पहिली गर्भनिरोधक गोळी तयार करण्याऱ्या डॉ. नित्या आनंद यांचे निधन; वयाच्या 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पहिली गर्भनिरोधक गोळी 'सहेली' तयार करणारे डॉ. नित्या आनंद यांचे निधन झाले आहे. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी लखनऊ पीजीआयमध्ये अखेरचा श्वास घेतला.
गतवर्षी 29 नोव्हेंबर रोजी त्यांना लखनऊ पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. अनेक तज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. त्यांची प्रकृती खालावल्याने आणि संसर्गामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी लखनऊच्या निरालानगर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
कोण होते नित्या आनंद?
दरम्यान, डॉ. नित्या आनंद यांचा जन्म 1 जानेवारी 1925 रोजी झाला होता. ते केंद्रीय औषध संशोधन संस्थेचे (CDRI) संचालक होते. ते 1974 ते 1984 अशी 10 वर्षे सीडीआरआयचे संचालक होते. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. नित्या आनंद यांना तीन मुले आहेत. त्यांचा एक मुलगा नीरज नित्या आनंद याने आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले आहे. तो सध्या अमेरिकेत आहे. त्यांचा धाकटा मुलगा कॅनडामध्ये आहे. त्यांच्या धाकट्या मुलीचे नाव डॉ. सोनिया नित्या आनंद आहे. त्या KGMU च्या कुलगुरु आणि लोहिया संस्थेच्या संचालक आहेत.
नित्या आनंद हे महान संशोधन शास्त्रज्ञ होते
देशातील महान संशोधन शास्त्रज्ञांमध्ये नित्या आनंद यांची गणना होते. जगातील पहिली गर्भनिरोधक गोळी तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या पहिल्या नॉन एस्टेरॉयड कंट्रिसेप्टिव पिलला 'सहेली' असे नाव देण्यात आले होते. क्षयरोग, मलेरिया, कुष्ठरोग यांसारख्या आजारांवर औषधी बनवण्यातही त्यांचे योगदान आहे. त्यांच्याकडे उत्कृष्ट नेतृत्व गुण होते आणि ते एक विलक्षण वैज्ञानिक होते. एका अहवालानुसार, त्यांनी 400 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले होते आणि 130 वर पेटंट मिळवले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.